अयनदिन हे वर्षातील दोन दिवस (प्रत्यक्षातील दोन क्षण) असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील २१ जून व २२ डिसेंबर या दोन दिवशी अशी स्थिती असते. म्हणून या दोन दिवसांना ‘अयनदिन’ असे म्हणतात. ‘अयन’ या शब्दातील ‘इ’ या धातूचा अर्थ ‘जाणे’ असा आहे. सूर्याचे उत्तरेकडे जाणे म्हणजे ‘उत्तरायण’ आणि दक्षिणेकडे जाणे म्हणजे ‘दक्षिणायन’ होय. उन्हाळी किंवा उत्तर अयनदिन (विष्टंभ) आणि हिवाळी किंवा दक्षिण अयनदिन (अवष्टंभ) असे दोन अयनदिन असतात. पृथ्वीचे परिभ्रमण, तिच्या आसाचा तिच्या कक्षेशी असलेला ६६.५० चा कोन आणि आसाचा सतत एकाच दिशेकडे असलेला कल यांमुळे कोणत्याही ठिकाणी दररोज मध्यान्हीचा सूर्य आकाशात एकाच ठिकाणी दिसत नाही. २१ जूनपासून २२ डिसेंबरपर्यंत तो दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक दक्षिणेस गेलेला दिसतो; तर २२ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत तो दररोज आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक उत्तरेस गेलेला दिसतो. सूर्याच्या या उत्तरेकडून दक्षिणेकडे (२१ जून ते २२ डिसेंबर) आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे (२२ डिसेंबर ते २१ जून) होणाऱ्या भासमान भ्रमणाला अनुक्रमे दक्षिणायन व उत्तरायण म्हणतात. उत्तरायणाची कमाल मर्यादा कर्कवृत्त (२३.५० उ. अक्षवृत्त) आणि दक्षिणायनाची कमाल मर्यादा मकरवृत्त (२३.५० द. अक्षवृत्त) असते. २१ जून रोजी सूर्याचे उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते आणि २२ डिसेंबर रोजी दक्षिणायन पूर्ण होऊन उत्तरायन सुरू होते.
२१ जून रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. या दिवशी कर्कवृत्तावर सूर्य खस्वस्तिकी (थेट माथ्यावर) आलेला असतो आणि तेथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात. यास उन्हाळी अयनदिन म्हणतात. उन्हाळी अयनदिनाला उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र असते. त्याच वेळी दक्षिण गोलार्धात दिवस सर्वांत लहान व रात्र सर्वांत मोठी असते. याउलट, २२ डिसेंबर रोजी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. या दिवशी सूर्य मकरवृत्तावर खस्वस्तिकी आलेला असतो आणि तेथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात. यास हिवाळी अयनदिन म्हणतात. या दिवशी दक्षिण गोलार्धात दिवस सर्वांत मोठा व रात्र सर्वांत लहान असते. त्याच दिवशी उत्तर गोलार्धात दिवस सर्वांत लहान व रात्र सर्वांत मोठी असते.
उत्तरायणाच्या कालावधीत २१ मार्च रोजी आणि दक्षिणायनाच्या कालावधीत २३ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर आलेला असतो. या दोन दिवशी पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान असते. या दोन दिवसांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात.
समीक्षक : वसंत चौधरी