अंटार्क्टिक वृत्त. पृथ्वीगोलावरील विषुववृत्ताच्या दक्षिणेस ६६° ३०’ द. अक्षांशावरील काल्पनिक अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुववृत्त म्हणतात. ही पृथ्वीगोलावरील  एक काल्पनिक रेषा असून ती दक्षिण समशीतोष्ण कटिबंध व दक्षिण शीत कटिबंध यांच्यामधील सीमारेषा आहे. दक्षिण ध्रुववृत्त भौगोलिक दक्षिण ध्रुवापासून सुमारे २,६१३ कि.मी. अंतरावर आहे. हे अक्षवृत्त दक्षिण महासागरातून (सदर्न ओशन) जाते. दक्षिण ध्रुव मोठ्या खंडीय राशीच्या मध्यवर्ती बर्फाच्छादित अंटार्क्टिक पठारावर असून या पठाराने दक्षिण ध्रुववृत्तावरील जवळजवळ सर्व क्षेत्रे व्यापले आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ज्या क्षेत्रात दरवर्षी सूर्य एक वा अधिक दिवस क्षितिजाच्या वर असतो, त्या क्षेत्राची कडा दक्षिण ध्रुववृत्त दर्शविते. पृथ्वीचा आस २३° ३०’ ने कललेला आहे. पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा, पृथ्वीचे परिभ्रमण, उत्तरायण व दक्षिणायन यांमुळे पृथ्वीवर विविध ठिकाणी दिनमान व रात्रीमानात फरक पडतो. एखाद्या गोलार्धात दिनमान मोठे होते, याचा अर्थ दिवसाचा कालावधी १२ तासांपेक्षा मोठा होतो; तर रात्रीचा कालावधी १२ तासांपेक्षा कमी होतो. दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्यातील सर्वांत मोठ्या दिवशी (२२ डिसेंबर) सूर्य दक्षिण ध्रुववृत्तावर कधीच मावळत नाही. तसेच या गोलार्धातील हिवाळ्यातील सर्वांत लहान दिवशी (२१ जून) दक्षिण ध्रुववृत्तावर कधीच सूर्योदय होत नाही. जर ९०° दक्षिण अक्षवृत्तावर असणारा दक्षिण ध्रुव समुद्रपातळीच्या सुमारे ३,००० मी. वर असण्याऐवजी समुद्रपातळीवर असेल आणि जर वातावरणीय आविष्कार किंवा इतर अडथळे यांचा  निरीक्षणावर परिणाम होणार नसेल, तर उन्हाळ्यातील सर्वाधिक कालावधीच्या दिवसाच्या आधी व नंतर ९०-९० दिवस सूर्य क्षितिजाच्या वर दिसेल. हिवाळ्याच्या सर्वांत लहान दिवसाच्या आधी व नंतर ९० दिवस सूर्य क्षितिजाखाली असेल. सलग दिवसाचा किंवा रात्रीचा कालावधी दक्षिण ध्रुववृत्तावर एका दिवसाचा (२४ तासांचा) असतो. दक्षिण ध्रुववृत्तापासून दक्षिणेस हा कालावधी वाढत जाऊन दक्षिण ध्रुवावर तो सहा महिन्यांचा होतो. कोणत्याही दिवशी दक्षिण ध्रुववृत्तावरील दिवस व रात्र यांचा कालावधी हा उत्तर ध्रुववृत्तावरील दिवस व रात्र यांच्या नेमका उलट असतो. दक्षिण ध्रुववृत्त सर्वप्रथम कॅप्टन जेम्स कुक यांनी १७ जानेवारी १७७३ रोजी ओलांडले होते.

समीक्षक : वसंत चौधरी