कॅलेकी, मिशल (Kalecki, Michal) : (२२ जून १८९९ – १८ एप्रिल १९७०). प्रसिद्ध पोलिश अर्थतज्ज्ञ. मुख्यत: समष्टी अर्थशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र होते. त्यांचा जन्म पोलंडमधील लॉत्स येथे पोलीश-यहूदी (जेव्हीश) कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचा कापूस पिंजण्याचा छोटासा कारखाना होता. काही कारणात्सव तो बंद पडल्याने ते आपल्या भावाच्या कारखान्यात आर्थिक हिशेब ठेवण्याचे काम करू लागले. कॅलेकी यांनी सुरुवातीस वार्सा विद्यापीठात गणीत विषयाच्या शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गदान्यस्क विद्यापीठांतर्ग असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवीच्या शिक्षणाला सुरुवात केली; परंतु घरच्या हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शिक्षण अर्ध्यातूनच सोडावे लागले. त्यांच्या विचारांवर कार्ल मार्क्स; ॲल्फ्रेड मार्शल आणि जॉन मेनार्ड केन्स या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांचा प्रभाव होता.
एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा केन्सवादाचे वर्चस्व होते, तेव्हा कॅलेकी यांच्या अर्थशास्त्रातील संकल्पनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यांनी रूढपद्धतीच्या बाहेर जाऊन आर्थिक विचारांची तसेच मुलभूत संकल्पनांची मांडणी करून अनेक विभिन्नदर्शक तत्त्वे अर्शशास्त्राला दिली आहेत. त्यांच्या विचारसरणीचा आणि मार्क्स व मार्शल यांच्या विचारसरणीचा जवळचा संबंध आहे. त्यांनी निरीक्षणाद्वारे गणितीय समीकरणाच्या स्वरूपात अंतर्गत व्यापार चक्र सिद्धांत प्रस्तुत केला आहे. ज्याची श्रुंखला प्रभावी मागणीच्या तत्त्वाशी जुळलेली आहे. अर्थव्यवस्थेचा संबंध हा दीर्घकालीन प्रवृत्ती आणि व्यापार चक्र यांच्याशी आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाच्या अस्थिरतेमुळे व्यापार चक्र घडून येण्याचा निर्वाळा त्यांनी केला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक प्रवृत्ती असते. यानुसार स्थिर संतुलन घडून येते. चक्रीयता घडून येत असताना काही कालावधीपर्यंत अर्थव्यवस्थेला बाह्य धक्के बसत असतात; कारण अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलासही अस्थिरता असते. ‘थ्री सिस्टीम’ या संशोधनपर लेखामध्ये त्यांनी व्यापार चक्राबाबत निष्कर्षात्मक मांडणी केलेली आहे. तसेच त्यांनी अस्थिरतेचे विवेचन करताना बदलाचे अंतर्जात विश्लेषण (endogenous analysis) आणि स्थिर संतुलन (Stationary equilibrium) यांद्वारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि व्यापार चक्र यांना अनुसरून उपायही सुचविले आहेत.
कॅलेकी यांनी वास्तव आणि मौद्रिक क्षेत्रांची आंतरकृती अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे घडून येते, याचे विश्लेषण केले. सोबतच त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे सिद्धांतन करून किंमत निश्चिती आणि उत्पन्न वितरणाचे विवेचन केले आहे. गुंतवणूक होत असताना पारंपारिक पद्धतीने संतुलन घडून येते. गुंतवणुकीची पातळी आणि भांडवलाचा साठा दिलेला असताना भूतकाळात घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम घडून येतो, तसेच बाह्य स्वरूपात बदल घडून येतात. त्यामुळे कुठेतरी आंशिक संतुलन घडून येते. कॅलेकी यांनी आर्थिक गतिशीलतेचे प्रारूप वास्तवावर आधारित आहे आणि गणितीय मांडणीसाठी तार्किकता आवश्यक आहे, ही दोन महत्त्वाची नवप्रवर्तने प्रस्तूत केली आहेत.
कॅलेकी यांनी आपल्या दि इकॉनॉमिक्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट या ग्रंथात विकसित होणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी दिसून येते, याचे विश्लेषण केले आहे. जर शासनाची ईच्छा असेल, तर पूर्ण रोजगाराकरिता पर्याप्त धोरणे राबविले जाऊ शकतात. याकरिता सार्वजनिक खर्च आधिक्याने करावा लागतो, तर गरीबांना अनुकूल होईल या पद्धतीने उत्पन्नाचे वितरण करावे लागते. सोबतच पूर्ण रोजगार प्राप्त होण्याकरिता राजकीय बदल घडून येणे महत्त्वाचे आहे; मात्र पूर्ण रोजगार निर्मितीमध्ये वर्चस्व पक्षांचे अडथळे व भय नको आहे, असे ते म्हणतात. अपूर्ण बाजार हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट आहे.
कॅलेकी यांनी प्रभावी मागणीचे सिद्धांतन करून समष्टी अर्थशास्त्राच्या मांडणीमध्ये मजबुती निर्माण केली. त्यांच्या या सिद्धांताचा उपयोग आधुनिक विवेचनामध्ये झाला. त्यांनी आपल्या सिद्धांताची मांडणी करताना पेढ्याचा निर्वाह उत्पादनावर होत असतो; म्हणजेच उत्पादन विक्रीतून नफा प्राप्त होतो हे स्पष्ट केले. पेढ्या उत्पादन आणि उत्पादनासंदर्भात निर्णय घेताना अतिनिश्चतता निर्माण होत असते. त्यांनी प्रभावी मागणीचे तत्त्व आर्थिक गतिशीलतेच्या संदर्भात मांडले आहे.
कॅलेकी यांनी प्रभावी मागणीच्या सिद्धांताबरोबरच उत्पन्न वितरणाचा सिद्धांत मांडला आहे. उत्पन्नाचे वितरण नफा आणि मजुरीद्वारे होते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. नफ्यात बदल झाला, तर उत्पादन आणि रोजगार यांमध्ये समान दिशेने बदल होतो. याला जोडून भांडवली खर्चाच्या पातळीची त्यांनी मांडणी केली आहे. नफ्याची पातळी दिली असताना उत्पन्नाचे पुनरवितरण श्रमिक आणि भांडवलदार यांच्यामध्ये होते. कॅलेकी यांच्या विकास सिद्धांतानुसार उत्पादनामध्ये रोजगार आणि मजुरीचे दर घसरून उच्च बेरोजगारी निर्माण होते. याचा सकारात्मक परिणाम मजुरीच्या समायोजनामध्ये झालेला आहे. हा परिणाम वाढता किंवा तटस्थ देखील असू शकतो. रोजगारामध्ये कपात घडून अस्थैर्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो; कारण पेढ्यांवरील कर्जाचा बोझा वाढलेला असतो. उपभोगामध्ये कपात होते आणि मजुरीपेक्षा नफा वाढतो.
कॅलेकी यांनी वेतन दर आणि रोजगारामधील संबंध यासंदर्भात उत्पन्न वितरण सिद्धांत नव्याने मांडला आहे. उत्पन्न वितरण आणि उत्पन्न निश्चितता यांमध्ये परस्पर सबळ पूरकता आहे. ज्याप्रमाणे नफ्याचा वाटा एकाधिकाराच्या अंशावर अवलंबून असतो, त्याच प्रमाणे तो भांडवली खर्चाच्या पातळीवरदेखील अवलंबून राहतो. एका बाजूला एकाधिकाराच्या अंशामध्ये तफावत आहे. यामुळे उत्पादन आणि रोजगार प्रभावित होते. अंतिमत: प्रभावी मागणीवर परिणाम होतो. दुसऱ्या बाजूला मजुरी वाढली अथवा घटली, तरी नफ्यामध्ये बदल होणार नाही; कारण नफा हा समग्रपणे भांडवल गुंतवणूक आणि उपभोग यांद्वारे निश्चित होतो. बंद अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली नफा हा केवळ गुंतवणूक आणि उपभोग यांवर अवलंबून असतो, तर खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये तो भांडवल गुंतवणूक आणि विदेशी व्यापार यांवर अवलंबून असतो. तसेच निर्यात आधिक्यामुळे नफा वाढतो, असे त्यांनी आपले मत मांडले आहे.
विदेशी व्यापारात आधिक्याने निर्यात करण्यावर भर दिला जातो; मात्र आयातीवर फारसा भर दिला जात नाही. निर्यातीद्वारे सुवर्ण अथवा मुद्रेच्या संचयाला महत्त्व दिले जाते. जेव्हा मागणी देशीय पातळीवर उच्चतम राहील, तेव्हाच निर्यातीची पातळी वाढेल; कारण जेव्हा एखादा देश विदेश व्यापाराद्वारे दुसऱ्या देशाकडून क्रयशक्ती शोषून घेतो, तेव्हा त्याची स्वत:ची क्रयशक्ती वाढते. परिणामत: मागणी वाढून श्रमिकांच्या उपभोगात वाढ होते, असे कॅलेकी यांच्या मत आहे.
कॅलेकी यांनी १९४७ ते १९५४ या काळात संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक विभागात काम केले आहे. १९५७ मध्ये पोलिश राज्य नियोजन आयोगात सामिल होऊन १९५९ मध्ये सुरुवातीच्या २० वर्षांच्या योजना तयार करण्यास त्यांनी मदत केली. ते विज्ञान पोलिश अकादमीचे सदस्य; तर क्यूबा, इझ्राएल, मेक्सिको आणि भारत या देशांच्या सरकारचे आर्थिक सल्लागार होते. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि वॉर्सा स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
कॅलेकी यांनी पुढील महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहे : एसेज इन दि थिअरी ऑफ इकॉनॉमिक फ्लक्च्यूएशन्स (१९३९), रुटलेज रिवायवल्स : स्टडिज इन इकॉनॉमिक डायनामिक्स (१९४३), थिअरी ऑफ इकॉनॉमिक डायनामिक्स (१९५४), स्टडिज इन दि थिअरी ऑफ बिझनेस सायकल : १९३३ – १९३९ (१९६६), इंट्रोडक्शन टू दि थिअरी ऑफ ग्रोथ इन अ सोशलिस्ट इकॉनॉमी (१९६९) इत्यादी.
कॅलेकी यांचे वॉर्सा येथे निधन झाले.
संदर्भ :
- Kalecki M., A Macro-dynamic theory of business cycle, 1935.
- Kalecki, M., Essays on the business cycle, 1933.
- Kalecki M., Foreign trade and National Force of Production, 1938.
- Kalecki M., Three system in collected works of Michael Kalecki, 1934.
- Lopez, G. Julio; Assous, Michal, Great Thinkers in Economics : Michael Kalecki, New York, 2010.
समीक्षक : श्रीनिवास खांदेवाले