ऑलिव्हर इ. विल्यम्सन : (२७ सप्टेंबर १९३२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. विल्यम्सन यांना अमेरिकन राजकीय अर्थतज्ज्ञ इलिनॉर ओस्ट्रॉम (Elinor Ostrom) यांच्या बरोबरीने आर्थिक व्यवस्थापन व व्यवसायसंघटनांचे प्रशासन यांसंदर्भातील संशोधनाबद्दल २००९ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विल्यम्सन यांचा जन्म अमेरिकेतील सुपेरीअर, व्हिस्कॉन्सीन येथे झाला. त्यांनी १९५५ मध्ये स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनशास्त्र विषयातील बी. एस. पदवी, तर १९६० मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एम. बी. ए. ही पदवी मिळविली. पुढे १९६३ मध्ये कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून पीएच. डी. ही सर्वोत्तम पदवी त्यांनी प्राप्त केली. सुरुवातीला १९६३–१९६५ या दोन वर्षांत बर्कली विद्यापीठात अर्थशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९६५–१९८३ या काळात पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात, तर १९८३–१९८८ या काळात येल विद्यापीठात अर्थशास्त्र, आर्थिक कायदे व व्यवस्थापनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. नंतर १९८८–१९९८ या काळात ते कॅलिफोर्निया-बर्कली विद्यापीठाच्या हास स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक होते. सध्या ते तेथेच एडगर एफ. कैसेर सन्माननीय (इमीरीट्स) प्राध्यापक म्हणून अध्यापन व मार्गदर्शन करीत आहेत.

विल्यम्सन यांनी व्यवसायसंघटनांचे अंतर्गत व बाह्य व्यवस्थापन या संदर्भातील संशोधन केले. पेढ्यांच्या व्यवस्थापनाने साचेबंद पद्धतीने काम न करता नावीन्यपूर्ण पद्धतीने पेढ्यांची (Company) संरचना (Structure) केल्यास अधिक कार्यक्षम व्यवस्थापन वा प्रशासन होऊ शकते, असे मत त्यांनी मांडले. केवळ संघटनेच्या संरचनेला महत्त्व न देता तिची संस्कृती व सामाजिक मूल्ये यांकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पेढ्यांचे कामकाज प्रभावी होण्यासाठी विविध प्रक्रिया, सेवा, उत्पादनकार्य या गोष्टी व्यवसायांतर्गत न करता बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती अगर संस्थांकडून तयार करून घ्याव्यात, अशीही सूचना त्यांनी केली. स्वयंनिर्मिती वा बाह्य खरेदी (Make or Buy) निर्णय साधारण व्यवसायाबरोबरच अत्यंत गुंतागुंतीच्या बलाढ्य अशा संयुक्त भागीदारी, खाजगीकरण झालेल्या संस्था, श्रमिककरार व व्यवसायनियमन यांच्या बाबतीत उपयुक्त होतो. दूरचित्रवाणी प्रक्रिया स्वत: राबवावी की, त्याबाबतचे हक्क वा अधिकार (Franchise) मनोरंजनक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इतर संस्थांकडे सोपवावेत, यांबाबतचा निर्णय हा अशा प्रकारचा निर्णय असतो, हे विल्यम्सन यांनी दाखवून दिले. आपल्या या संदर्भातील सर्वेक्षणात त्यांनी विविध अशा आठशे व्यवसाय-पेढ्यांचा अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षांचा फायदा सार्वजनिक धोरण, कायदा व सुव्यवस्था, व्यवसायरणनीती निश्चिती व समाजशास्त्र अशा विविध क्षेत्रांना झाला.

विल्यम्सन यांच्यामुळे १९८०–१९९० या काळात खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांच्या कार्यकक्षांमधील तफावतीसंबंधी खुली चर्चा घडून आली. बाजारपेठा व बाजारपेठाविरहित (Non Markets) व्यवस्थांमधील साम्य व भेद यांबाबतची मुद्देसूद मांडणी करून विल्यम्सन यांनी त्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे एका बाजूला पुनरावृत्ती होणाऱ्या व्यवहारांचा खर्च, तर दुसऱ्या बाजूला संबंधित अशा विशिष्ट व्यवहाराचा खर्च यांतील फरक अधोरेखित होऊ शकला. उदा., एखाद्या विद्युतपुरवठा कंपनीने विविध पुरवठादाराकडून दैनंदिन अगर साप्ताहिक गरजांनुसार वारंवार कोळसा खरेदी हा पुनरावृत्ती होणाऱ्या खर्चाचा प्रकार, तर विशिष्ट अंतराने एखाद्या विशिष्ट पुरवठादाराकडून कोळसाखरेदीचा निर्णय या दोन्ही व्यवहारांची तुलना केल्यास दुसऱ्या प्रकारचा व्यवहार जास्त किफायतशीर व काटकसरीचा होऊ शकतो, हे दाखवून दिले. विल्यम्सन यांच्या या व्यवहारखर्च प्रणालीची अनेक अर्थतज्ज्ञांनी चिकित्सा करून पुढील संशोधनकार्यासाठी ती वापरली. ‘माहिती आघात’ ही नवीन संकल्पना विकसित करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. आर्थिक प्रगल्भतेमुळे त्यांची Rand Corporation  (१९६४–१९६६), U. S. Department Of Justice (१९६७–१९६९), National Science Foundation (१९७६-७७), Federal Trade commission (१९७८–१९८०) या संस्थांचे व्यवस्थापकीय व आर्थिक सल्लागार म्हणूनही नियुक्ती केली गेली.

विल्यम्सन यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : मार्केट्स ॲण्ड हायरार्कीज : ॲनालिसिस ॲन्टीट्रस्ट ॲण्ड इम्प्लिकेशन (१९७५), दि इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स ऑफ कॅपिटॅलिझम (१९८५), दि नेचर ऑफ दि फर्म (१९९१), दि मेकॅनिक्स ऑफ गव्हर्न्स (१९९६). शिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

विल्यम्सन यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर त्यांच्या अर्थशास्त्रातील संशोधनक्षेत्रातील कामगिरीबद्दल पुढील सन्मान लाभले : अलेक्झांडर हेंडर्सन अवॉर्ड (१९६२), इकॉनॉमेट्रिक सोसायटी फेलोशिप (१९८३), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९९४), अमेरिकन अकॅडमी ऑफ पोलीटिकल ॲण्ड सोशल सायन्स फेलोशिप (१९९७), जॉन वॉन न्यूमन अवॉर्ड (१९९९), हॉस्टक्लॉज रेक्टेवॉल्ड प्राइस इन इकॉनॉमिक्स (२००४), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन डिस्टिंग्विश फेलोशिप (२००७). त्यांना विविध देशांतील जवळपास अकरा विद्यापीठांनी ऑनररी डॉक्टरेट प्रदान केलेली आहे.

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा