तिरोल, जीन (Tirole, Gean) : (९ ऑगस्ट १९५३). फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कराचा मानकरी. तिरोल यांना बाजारपेठातील मक्तेदारी पेढ्यांचा प्रभाव व त्यांचे नियमन यांसंदर्भातील नाविन्यपूर्ण संशोधनाबद्दल २०१४ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

तिरोल यांचा जन्म फ्रान्समधील ट्रोऐस या शहरात झाला. पॅरिसमधील इकोले पॉलिटेक्निक व इकोले नॅशनल देस पोन्टस एट चॉसीस या संस्थेमधून गणिती निर्णय प्रणाली असा विषय घेवून १९७८ मध्ये डॉक्टरेट समकक्ष पदवी मिळविली. १९८१ मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्यूसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.) मधून ‘एसेज इन इकॉनॉमिक थिअरीʼ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. ही  पदवी प्राप्त केली. अर्थशास्त्र नोबेल विजेते एरिक स्टार्क मॅस्किन, (Eric Stark Maskin) हे त्यांचे संशोधक मार्गदर्शक होते. डॉक्टरेटनंतर इकोले मॅस्किन हे तिरोल यांचे संशोधक मार्गदर्शक होते. डॉक्टरेटनंतर तिरोले यांनी फ्रान्समधील इकोले नॅशनल देस पोन्टस् एट चॉसीस् या संस्थेत १९८४ अखेर संशोधक म्हणून काम पाहिले. १९८४ – १९९१ या काळात ते एम. आय. टी.मध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक होते. १९९४ – १९९६ या काळात त्यांनी पुन्हा फ्रान्समधील इकोले पॉलिटेक्निक या संस्थेत अर्थशास्त्राचे अध्यापन केले. त्याच सुमारास त्यांनी ताडलावूज शहरात स्कूल ऑफ इकॉनॉमिक या अर्थशास्त्र विषयाचे अध्ययन व संशोधनासाठीच्या संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. जीन जॅक्यूज लॅफोंट फौंडेशनचा ते अध्यक्ष व तेथील ताडलावूज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. सध्या ते सदर संस्थेचा प्रमुख असून अमेरिकेतील एम. आय. टी. या ख्यातनाम संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम करीत आहे.

१९ ऑक्टोबर १९९७ या दिवशी जगभरातील शेअरबाजारपेठा अचानक कोसळल्या. स्टॉक मार्केटच्या इतिहासात हा दिवस ‘काळा सोमवार’ (Black Monday) म्हणून आजही ओळखला जातो. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर तिरोले यांनी वित्तीय बाजारपेठा कोसळण्याच्या घटनेसंबंधी संशोधन सुरू केले. काही व्यवसाय पेढ्यांच्या (Company) बाजारपेठातील मक्तेदारींचा यशस्वीपणे सामना करता येईल, असे संशोदनाद्वारे त्याला दिसून आले. त्यांच्या संशोधनापूर्वी मक्तेदारी पेढ्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे, स्पर्धक कंपन्यांना अटकाव करणे अशा सामान्य धोरणांचा अवलंब केला जात असे व त्यांचा बाजारपेठावर फारसा प्रभाव पडत नसे. या प्रकारचे नियम किंवा अटी ठराविक परिस्थितीतच प्रभावी ठरू शकता; मात्र यामुळे मक्तेदारांकडे नफ्याचा अतिरेक होऊन तो समाजासाठी घातक ठरू शकतो. बाजारात किंमत ठरविण्यासाठी केलेले परस्पर सहकार्य हानिकारकच असते; तथापि एकाधिकारसंदर्भात केलेले परस्पर सहकार्य सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरू शकते. तिरोले यांनी आपल्या संशोधन लेखामधून सरकारी मक्तेदारींना वेसन घालण्यासाठीची धोरणे मांडलेली दिसून येतात. सदर धोरणानुसार सरकार बड्या कंपन्यांना प्रोत्साहन देऊ शकते. त्याच वेळी बाजारपेठातील स्पर्धेला व सामान्य ग्राहकाला झळ पोचणार नाही, याची काळजीही घेणे शक्य होते. मक्तेदारी स्पर्धकांच्या बाजारपेठा वाटणीवर, नफा, खरेदीवर नियंत्रण कसे ठेवायचे, ग्राहकांचे संरक्षण कसे करावयाचे यांबद्दल तिरोल यांनी सतत चिंतन संशोधन व लेखन केले. त्यांचे हे संशोधन केवळ सैद्धांतिक नसून ते उपयोजित (Applied) असल्याचे दिसून येते. शासनाच्या आर्थिक धोरणासाठी ते दिशादर्शक आहे. त्यांचे संशोधन भारतासाठी अनेक बाबतीत लागू पडते. बांधकाम क्षेत्र, औषधनिर्मिती, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, विमा, हवाई वाहतूक, वीज उत्पादन व वितरण, बँकिंग अशा अनेक बाबतीत मक्तेदारी प्रवृत्ती दिसून येते. सध्या या क्षेत्रावर नियमन ठेवण्यासाठी राष्ट्रीय नियंत्रक संस्था पूर्ण स्वायत्ततेने काम करीत आहेत. कोणत्याही जबाबदार सरकारने ग्राहक हितासाठी मक्तेदारी बाजारपेठांत हस्तक्षेप करणे योग्य असल्याचे तिरोले यांनी ठामपणे सांगितले. अलिकडे जागतिक व विशेषत: अमेरिकेतील वित्तीय संकटांच्या पार्श्वभूमीवर बँकांचे नियमन करणारी प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक असल्याचेही मतही त्यांनी नोंदवले.

तिरोल यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : डायनॅमिक मॉडेलस् ऑफ ओलीगोपोली (१९८३ –  सहलेखक), दि थिअरी ऑफ इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन (१९८८), गेम थिअरी (१९९१ – सहलेखक), ए थिअरी ऑफ इन्सेंटिव्हज इन प्रोक्युअरमेंट ॲण्ड रेग्युलेशन (१९९३ – सहलेखक), दि प्रूडेन्शियल रेग्युलेशन ऑफ बँक्स (१९९३ – सहलेखक), कॉम्पीटेशन इन टेलिकम्युनिकेशन (१९९९), फायनॅन्सियल क्रायसीस लिक्वीडिटी ॲण्ड द इंटरनॅशनल मॉनेटरी सिस्टीम (२००२), दि थिअरी ऑफ कार्पोरेट फायनॅन्स (२००६), बॅलसिंग दि बँक्स (२०१० – सहलेखक), इनसाईड ॲण्ड आउटसाईड लिक्वीडीटी (२०११). शिवाय त्याचे २०० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

तिरोल यांना नोबेल स्मृती पुरस्कराबरोबर उपयोजित संशोधनासाठी पुढील सन्मान लाभले : इकॉनॉमेट्रिक सोसायटी अध्यक्ष (१९८८), फ्रान्स युनिव्हर्सिटी लिब्रेडे, बॉक्सल्सची मानद डॉक्टरेट (१९८९), वाय जॅनशॉन अवॉर्ड (१९९३), पब्लिक युटिलिटी रिसर्च सेंटर डिस्टिंग्यूश्ड सर्व्हिस अवॉर्ड फ्लोरिंग विद्यापीठ (१९९७), लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रीयल मानद डॉक्टरेट (२००७), बी.बी.व्ही.ए. फौंडेशन फ्रंटीयर ऑफ नॉलेज अवॉर्ड इन इकॉनॉमिक्स ॲण्ड फायनान्स ॲण्ड मॅनेजमेंट (२००८), गोल्ड मेडल-सी. एन. आर. एस. (२००८), अकॅडेमी देस सायन्सेस मारलेस एट पॉलीटीक्यू  संस्था सदस्य (२०११), युनिव्हर्सिटी ऑफ मॅन्नहेम मानद डॉक्टरेट (२०११), अथेन्स युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड बिझनेस व युनिव्हर्सिटी ऑफ रोम तोर व्हर्जाटा मानद डॉक्टरेट (२०१२), युनिव्हर्सिटी ऑफ लाऊसेने मानद डॉक्टरेट (२०१३). त्याचा जगातील अतिप्रभावी अर्थतज्ञामध्ये समावेश आहे.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा