भारतीय संस्कृतीत नागाला देवता म्हणून महत्त्व आहे. नाग म्हणजे फणाधारी सर्प. साधारणपणे कल्याणकारक व उग्र असे या देवताचे स्वरूप आढळते. अनंत, वासुकी, शेष हे नाग पहिल्या प्रकारात; तर तक्षक, कर्कोटक, कालिय हे नाग दुसऱ्या प्रकारात आढळतात. दैवतशास्त्रीय तत्त्वानुसार उग्र देवतेच्या कोपापासून स्वत:चे रक्षण करण्याकरिता देवतांचे पूजन करण्यात येते. नागपूजन करण्यामागेदेखील हाच भाव असावा. भारतीय संस्कृतीत नागपूजा, नागविषयक व्रते व दाने, नागांसाठी बलिदान इत्यादी अनेक पूजाप्रकारांनी नागमाहात्म्य सांगीतले असल्याचे दिसते. प्राचीन भारतीयांनी नागाला देवत्व देऊन आपला पूजाविषय बनविले आहे.

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करता असे दिसून येते की, नागपूजक जमात (Totemic Tribe) प्राचीन काळापासून अस्तित्वात असावी. त्यांचा संघर्ष बऱ्याचदा वैदिक देवतांशी आलेला दिसतो. त्यानंतर वैदिक देवता व पंथ यांच्यामध्ये नागवंशीयांना सामावून (Assimilation) घेतल्याची अनेक उदाहरणे आढळतात. नागपंथ हा पूर्ववैदिक किंवा अवैदिक असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे. आर्यसमूहाचा आर्येतर नागवंशीयांशी संघर्ष झाल्याची उदाहरणे प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येतात. उदा., महाभारतातील खांडववनदाह, जनमेजयाचे सर्पसत्र वगैरे. नागवंशीयांना सामावून घेण्याचे अनेक प्रयत्न महाभारत व पुराणकाळात घडल्याची उदाहरणे काही कथांमध्ये दिसतात. कृष्णाचे कालियनागमर्दन हा वैष्णव पंथ व नागवंशीयांमधील संघर्ष सूचित करतो. भागवतपुराणात म्हटल्याप्रमाणे कृष्णाने कालियनागावर नर्तन करून स्वत:ची पदचिन्हे अंकित केली व त्याला अभयदान दिले. कृष्णाचा भाऊ बलराम यास शेषाचा अवतार मानले आहे. याचाच अर्थ वैष्णव संप्रदायामध्ये नागांना दिलेले महत्त्वपूर्ण स्थान होय. शेषशायी विष्णू हे प्रतीकदेखील समन्वयाचे सूचन करते. शिवाने कंठामध्ये धारण केलेला सर्प हे शैव पंथीयामध्ये झालेले नागांचे समावेशन दर्शविते. जातककथांमध्ये नाग बोधिसत्त्वांचे अनुयायी दिसतात. मुचलिंद नाग व बुद्ध यांच्या अमरावती(आंध्र प्रदेश)मधील शिल्पांमध्ये पंचफणाधारी नाग बुद्धांवर फणाछत्र धरताना चितारला आहे. कंबोडियामधील बेयन मंदिरामध्ये ध्यानस्थ बुद्ध सप्तफणाधारी नागावर विराजमान आहेत. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अभिज्ञान चिन्ह सर्प हेच असून त्यांच्या मस्तकावरदेखील नागाचे फणाछत्र दिसून येते. श्रवणबेळगोळमधील गोमटेश्वराच्या भव्य मूर्तीच्या भोवती असलेल्या अनेक वारूळांतून सर्प बाहेर पडत असल्याचे चितारले आहे. बोधगया, भरहूत इत्यादी ठिकाणी बुद्धांच्या जोडीने सर्पाकृती कोरलेल्या दिसतात. बुद्धांच्या मस्तकावर नागाने फणा धरलेल्या सुवर्णमूर्ती करून त्या त्या बौद्ध स्तूपांना अर्पण करण्याची प्रथा ब्रह्मदेशात आढळते. भारतातील वैष्णव, शैव, शाक्त, जैन, बौद्ध धर्मांमध्ये नागाला सामावून घेतल्याची उदाहरणे दिसतात. जगभरातील प्राचीन पुराणकथांमध्ये सर्पाला सामावून घेण्याची प्रक्रिया झाल्याचे दिसून येते. प्राचीन धर्मांच्या पुराणकथांमध्येही सर्पप्रतिमा, सर्पमूर्ती अथवा सर्पप्रतीके विविध अर्थ सूचविताना दिसतात.

मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या काही मूर्ती अर्धनाग व अर्धमानव या स्वरूपात आढळतात. गंधार, मध्य प्रदेश, अमरावती येथील नाग पूर्ण मानवरूप आहेत. मध्य प्रदेशातील सतना येथील एका जैन नागदेवतेच्या मूर्तीला आठ हात असून ती पूर्ण मानवरूप आहे. तिला आठ हात आहेत व तिच्यामागे सात फणा आहेत. अमरावती येथील नागमूर्ती संपूर्ण मानवरूप आहेत; तसेच दर्शनी मानव व पार्श्वभागी नाग अशाही काही नागमूर्ती आढळतात. ओडिशातील खिंचिंग या गावी अशा स्वरूपाची एक मूर्ती आढळते. ही मूर्ती द्विभुज असून तिच्या हातात एक हार आहे. सांची, भरहूत येथील शिल्पांमध्ये डोके नागाचे व धड मानवाचे अशा काही मूर्ती आढळतात. ख्मेर आदिवासींमध्ये धड नागाचे व तोंड माणसाचे अशी काही नागप्रतिके आढळतात. तर काही ठिकाणी धड नागाचे व तोंड सिंहाचे किंवा मगरीचे अशा नागमूर्तीही आढळतात.

प्रजननदेवता : प्राचीन काळापासून नाग अथवा सर्पाचा संबंध जलतत्त्वाशी असलेला दिसून येतो. ऋग्वेदामध्ये इंद्राचा शत्रू वृत्र हा सर्पासारखा वेटोळे घालून पाणी अडवून ठेवतो, असे सांगितले आहे, तर इंद्र वृत्राने अडवलेले ते पाणी मोकळे करतो, अशी त्याची स्तुती केलेली आहे. जलतत्त्व हे नवनिर्मितीशी संबंधित आहे. त्यामुळे भारतातच नाही, तर जगभरात सर्प हे पाण्याशी संबंधित किंवा निर्मिती, संतती, प्रजनन यांच्याशी संबंधित असल्याचे दिसतात. कालियनागदेखील यमुनेच्या डोहामध्ये राहात असल्याचे दिसते. हिमालयातील लोककथांमध्ये जलतत्त्वाचा संबंध नागदेवतेशी असल्याचे दिसून येते. भैर या नागदेवतेने कैलासपर्वतावरून तावी नदी जम्मूमध्ये आणल्याची आख्यायिका आहे. मानसर तलावाची अधिष्ठात्री मानसरदेवता ही नागदेवता आहे. मानसर तळ्याच्या काठी शेषनागाचे देऊळ आहे. नवदांपत्याने या शेषनागाचा आशीर्वाद घेणे शुभसूचक मानले जाते. कै देवता ही चिनाब नदीची अधिष्ठात्री देवता समजली जाते. चिनाब नदी अखनूर गावामध्ये आणण्याचे श्रेय या देवतेला दिले जाते. युबु ही नागदेवता पुरुषसंतती देणारी असल्याची समजूत आहे. रामबनमधील त्रिमन् नाग व लीत या देवता पर्जन्य व पशुधन देणाऱ्या समजल्या जातात. दुद्दु खोऱ्यातील बसक नाग उत्तम पर्जन्य देणारा मानला जातो. केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील मन्नारसला येथील नागराज मंदिर सुफलनाशी संबंधित असल्याचे मानले जाते.

अल्बानियातील लोककथांमध्ये कुलशेद्र नावाचा सर्प जलनाश करू शकतो व नरबळींनी संतुष्ट होतो, असे उल्लेख आढळतात. नेपित (Nepit) ही ईजिप्शियन स्त्रीदेवता सुफलनाशी संबंधित आहे. तिच्या डोक्यावर धान्य किंवा सर्प दाखविला जातो. मोरोक्कोमधील हरुन व हरुना या पाण्याशी संबंधित शक्ती सर्परूप धारण करत असत. त्यांना संतुष्ट करण्यासाठी लोक विविध खाद्यपदार्थ नदीला अर्पण करीत. सुझनोवो नावाचा जपानी देव समुद्राशी सबंधित असून त्याच्या प्रतीकांमध्ये सर्पाचा समावेश आहे. फिलिपीन्समधील प्राचीन मान्यतांच्या विद्वानांच्या मते, बकुनावा नावाचा सर्प समुद्र, जल, पाऊस, भूकंप व ग्रहण यांच्याशी संबंधित आहे.

मेक्सिकोच्या ॲझटेक संस्कृतीमधील केत्सालकोआत्ल हा देव पंखधारी सर्पाकृती पक्षी अशा स्वरूपात दर्शविलेला आढळतो. हाच देव माया संस्कृतीमध्ये ‘कुकुलकन’ या नावाने ओळखला जातो. याचा संबंध धान्य, कला व विज्ञान यांच्याशी असल्याचे दिसते. त्लालोक (Tlaloc) नावाचा पर्जन्यदेव हा ढग, पर्वत, झरे व तलाव यांच्याशी संबंधित आहे. हा प्रजननाचा देव मानला जातो. हातात सर्पधारी दंड हे त्याचे चिन्ह आहे. ईजिप्तमध्ये रेनेनुतेत (Renenūtet) नावाची स्त्रीदेवता शेती व भरणपोषणाशी संबंधित दिसते. तिची चित्राकृती सर्पप्रतिमा अथवा सर्पशीर्षधारी स्त्री अशी दिसून येते. त्याचप्रमाणे ही देवता संततीरक्षण तसेच फेअरोंच्या रक्षणाची अधिष्ठात्री देवता होय. शेतात उगविलेली पिके व द्राक्षे तिला अर्पण केली जात. ऑस्ट्रेलियाच्या आदिम संस्कृतीमधील पर्जन्य व प्रजननाशी संबंधित सर्पाकृतीदेव वुलनकुवा हा भव्य इंद्रधनुष्याच्या स्वरूपात दिसतो. एनिगना (Enigana) ही स्त्रीदेवता सर्पाकृती असून भूमी, जल व निर्मिती या तत्त्वांशी संबंधित आहे.

डीमीटर देवता

डीमीटर नावाची ग्रीक स्त्रीदेवता भूमी, शेती व सुफलनाशी संबंध दाखवते. थॅस्मोफोरिया नावाचा उत्सव डीमीटरच्या पूजनार्थ केला जात असे. हा उत्सव पेरणीच्या वेळी बियाण्याची उत्पादनक्षमता वाढावी म्हणून दरवर्षी केला जात असे. यामध्ये विवाहित स्त्रियांना सहभागी होता येत असे. सर्प व लिंगप्रतिमांचे उपयोजन केले जात असे. दोन वेटोळे घातलेले व परस्परांमध्ये गुंतलेले सर्प असलेला दंड हे ग्रीक देवता हर्मिसच्या हातात दर्शविले जातात.

इंद्रधनुष्य-सर्प ही संकल्पना जगभरातील आदिम संस्कृतींमध्ये दिसून येते. नानाविध प्राचीन संस्कृतींमध्ये ही संकल्पना वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आहे. आफ्रिकन संस्कृतींमध्ये जलसंरक्षक अशा सर्पाची संकल्पना आढळते. स्त्रिया देवळात संततीसाठी प्रार्थना करीत आणि संततीप्राप्तीनंतर सर्पाला ते सांगण्याचा प्रघात होता. मानवी आत्मा, अलौकिक शक्ती किंवा दुष्टशक्ती सर्पामध्ये राहतात, असा समाज होता. पुनर्जन्म किंवा जीवनाची अव्याहत नित्यता ही कारणे सर्पपूजनामागे आहेत.

दक्षिण नायजेरियामधील ईसा लोकांच्या समजुतीप्रमाणे पूर्वज पृथ्वीवर पाऊस पाठवतात. इंद्रधनुष्य हे पावसाच्या आगमनाची सूचना देतात. आफ्रिकेतील कलबारी प्रदेशातील लोकांच्या समजुतीनुसार इंद्रधनुष्य हा आकाशातील विशाल सर्प होय. ओशुमेर हा सर्पदेव स्लावकोस्टमधील समजुतीनुसार पाताळातून येणारा विशाल इंद्रधनुष्य-सर्प होय. आसमंतामधून होणाऱ्या जलधारांचे प्राशन करण्यासाठीच हा सर्प क्षितिजावर अवतरतो. योरूबा संस्कृतीमध्ये एरे नावाचा सर्प इंद्रधनुष्य देवतेचा दूत समजला जातो. त्यामुळे सर्पाला अत्यंत आदर दिला जातो. झूलू पुराकथांप्रमाणे इंद्रधनुष्य-सर्प हे विहिरींचे संरक्षण करतात. अबेनयोबी लोकांमध्ये सर्प धान्य देणारा मानला जाई. पर्वतांच्या खालील धान्यांचे संरक्षण सर्प करतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये धान्यसंरक्षक सर्प पाळल्याचे दिसते. इकोई सर्पांची चरबी औषध म्हणून वापरत. मादागास्करमधील फनानी संप्रदायाच्या समजुतीप्रमाणे मृतात्मे सर्पामध्ये राहतात. वागिकुयुनामक जनसमूहानुसार सर्पांचा गूढ संबंध आत्म्यांशी आहे. सर्प गावात आल्यास दूध व मांस सर्पांना अर्पण केले जाई. प्राचीन चिनी मान्यतेनुसार ड्रॅगन (आग ओकणारा विशालकाय सर्प) हा जलतत्त्वाशी संबंधित आहे. हिवाळ्यात जलशयन करणारा हा प्राणी पावसाळ्यात जागृत होतो. पर्जन्याचा कारक असून तो पिके देणारा आहे.

सृष्टीच्या निर्मितिकथांमध्ये सर्पाचे महत्त्व दिसून येते. अब्राहमिक पंथांमध्ये मनुष्याच्या पतनाला सर्प कारणीभूत झाल्याचे दिसते. आदम व ईव्ह ईश्वरासोबत ईडन नंदनवनात राहत होते. सर्पाने प्रवृत्त केल्यामुळे ईव्हने पापपुण्याचे ज्ञान देणाऱ्या वृक्षाचे अर्धे फळ स्वत: खाल्ले व अर्धे आदमला दिले. ईश्वराने निषिद्ध केलेल्या झाडाचे फळ ग्रहण केल्याने मनुष्याच्या पापमय जीवनास आरंभ झाला, असे मानले जाते.

संरक्षकदेवता : प्राचीन संस्कृतींमध्ये सर्पाला आरोग्य, क्षेत्र, धन, धान्य, संतती, परलोक यांची संरक्षकदेवता मानले गेले आहे. सर्पदंशाबद्दल असणारी भीती, सर्पविषाने ओढवणारा मृत्यू या गुणधर्मांमुळेच त्यास संरक्षक म्हणून पाहिले गेले असावे. भारतीय लोकसमजुतींप्रमाणे नाग कुलदेवता, क्षेत्रदेवता किंवा खजिन्याची संरक्षक देवता म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र, गुजरात, केरळ राज्यांमध्ये नाग कुलसंरक्षक देवता असल्याचे दिसून येते.

जगभरातील प्राचीन परंपरांमध्ये मात्र ही संकल्पना पूर्वापार प्रचलित दिसते. हेकेटनामक ग्रीक स्त्रीदेवता अथेन्सची संरक्षकदेवता म्हणून ओळखली जाई. तिच्या केसामधून सर्प बाहेर येताना दाखविले जाते. शहरातील मार्ग, सीमा, चौक, दारे व परलोक यांच्याशी तिचा संबंध असल्याचे दिसते. शहर किंवा घरात वाईट शक्तींना येण्यापासून अवरोध करणे, हे तिचे प्रमुख कर्म. त्यामुळेच विजेरी, कुत्रा, चावी व सर्प ही प्रतीके तिच्याशी जोडली गेली आहेत. नेहेबकाउ या ईजिप्तमधील देवतेची प्रतिमा सर्पाकृती असून परलोक अथवा पाताळाशी त्याचप्रमाणे फेअरोंची जीवंतपणी व मृत्यूनंतरच्या प्रवासातील संरक्षकदेवता होय.

प्राचीन ईजिप्तमधील ‘ओरोबोरस’नामक प्रतीकात्मक चिन्ह हे स्वत:ची शेपूट तोंडात घेतलेला सर्प असे आहे. त्याचा तयार होणारा वर्तुळाकार आकार ‘अविनाशित्वा’चे प्रतीक म्हणून गणला जातो. तूतांखामेन या फेअरोच्या थडग्यावर ओरोबोरसचे चिन्ह कोरलेले आढळते.

अस्लिपिअस देवता

एनिग्मॅटिक बुक ऑफ नेदरवर्ल्ड या ग्रंथामध्ये या चिन्हाचा संदर्भ प्रथमत: सापडतो. मेरेतजर नावाची ईजिप्शियन स्त्रीदेवता सर्पमुखधारी असून ती नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या थिबन नेक्रोपलिस या विस्तृत प्रदेशाची संरक्षकदेवता होय. अनेक फेअरोंच्या ममींच्या शवपेटीकांवर तिचे चित्र आढळून आले आहे.

रोगांपासून संरक्षण करणारी देवता किंवा रोग बरे करणाऱ्याची क्षमता सर्पांमध्ये असल्याची समजूत प्राचीन संस्कृतीमध्ये दिसून येते. निन्गिसजिदा (Ningiszida) ही मेसोपोटेमियामधील संरक्षकदेवता सर्पमुकुट धारण करते. तिचा संबंध पाताळ किंवा परलोक, रोगनिदान यांच्याशी आहे. अस्लिपिअस किंवा हिपिअस नावाचा भैषज्यदेव प्राचीन ग्रीक संस्कृतीमधील रोगनिदानाशी संबंधित आहे. त्याच्या हातात दंडाला वेटोळे घातलेला सर्प आहे. रोगनिदानासाठी अस्लिपिअसचे पूजन त्याच्या देवळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत असे. रुग्ण विधिपूर्वक स्नान व उपवास करून रात्री मंदिरात झोपत असत. अस्लिपिअस त्यांच्या स्वप्नात येत असे व सकाळी उठल्यावर रुग्ण बरा झालेला असे.

मरणोत्तर जीवन व पुनर्जन्म : सर्पांमध्ये कात टाकणे व नवीन त्वचा धारण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळेच साप हा नवनिर्मिती, पुनर्जन्म, पुनरुज्जीवन व अमृतत्त्वाचे प्रतीक म्हणून पाहिला जातो. चिनी पुराणकथेप्रमाणे ‘नुवा’ या अर्धमानव व अर्धसर्पाकृती देवतेने मनुष्याची निर्मिती केली. तिने अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले. सततच्या निर्मितीची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून तिने स्त्री-पुरुषाच्या संभोगातून मनुष्यनिर्मितीची संकल्पना शोधून काढली. त्यामुळेच ती प्रजननदेवता म्हणून ज्ञात झाली. पाषाणापासून बनलेल्या लैंगिक अवयवाच्या मूर्तींमध्ये तिचे पूजन होऊ लागले. चिनी पुराणकथीय शिल्पांमध्ये ‘नुवा’ व ‘फुसी’ यांना एकत्र दाखवले जाते. परस्परांमध्ये गुंतलेली त्यांची वरील शरीरे मानवी, तर अधोभाग सर्पाकृती दाखवला जातो. हान वंशातील बऱ्याचशा राजांच्या थडग्यांवर, शवपेटीकांवरही आकृती कोरलेली आढळते. प्राचीन हान वंशापासून ते टॅंग (Tang) वंशापर्यंतच्या काळात चिनी लोक नुवा व फुसी यांची मृत्यूनंतर रक्षण करणारे देव म्हणून पूजा करत असत.

मिनोअन सर्पदेवता

प्राचीन नॉर्स संस्कृतीमध्ये योरमुनगाण्डर नावाचा सर्प समुद्रनिवासी विश्वसर्प म्हणून गणला जातो. तो इतका विशाल आहे की, संपूर्ण विश्वाला व्यापूनदेखील स्वत:च्या शेपटीला गिळंकृत करू शकेल. त्यामुळे होणारा वर्तुळाकार आकार हा व्यापकत्व व शाश्वतता यांचे प्रतीक आहे. ईजिप्तमधील क्रेटे या शहरातील उत्खननात दोन स्त्रियांच्या सर्पमूर्ती सापडल्या आहेत. या प्राचीन मिनोअन संस्कृतीमधील (इ.स.पू.सु. १६००) मूर्ती असून त्या पृथ्वी देवतेचे प्रतीक मानल्या जात असत. त्यांचा संबंध मृत्यू, पुनर्जन्म यांच्याशी असल्याचे दिसते.

संदर्भ :

  • Ganvir, Shrikant, Representation of Naga in the Buddhist Art of Amaravati : A Sculptural Analysis, Proceedings of the Indian History Congress, vol. 71, 2010.
  • Hambley, Wilfrid, Serpent Worship in Africa, Filed Museum of Natural History Chicago, 1931.
  • Lurker, Manfred, The Routledge Dictionary of Gods and Goddesses, Devils and Demons, London, 1984.
  • Mate, M. S. Riddle of the Nagas, Bulletin of the Deccan College Post Graduate and Research Institute, vol. 72/73, 2012-13.
  • https://www.arthistoryresources.net.snakegoddesses/
  • https://www.academia.edu/19270487/Naga_Deity_Cult_in_Jammu_Region

                                                                                                                                                                        समीक्षक : मनीषा पोळ