वीरकोचा हा पेरू देशातील अ‍ॅंडीज पर्वतप्रदेशातील संस्कृतीतील श्रेष्ठ देव आहे. तसेच इंका संस्कृतीच्या देवतासमूहातीलही हा अत्यंत  महत्त्वाचा श्रेष्ठ देव. त्याच्या नावाचा अर्थ समुद्राचा फेस असा होतो. त्याची इतर पर्यायी नावे हुआराकोचा, कॉन टिकी, थुनुपा, तुपाका अशी आहेत. ही सूर्याची व वादळाची देवता मानली जाते आणि मानवी स्वरूपात त्याच्या मूर्ती आढळतात. त्याच्या मूर्तीत डोक्यावरील मुकुटात सूर्य व हातात विजा दाखविलेल्या असतात. तसेच त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या स्वरूपात पाऊस पडताना दाखविलेला आहे. त्याचे वर्णन स्पॅनिश इतिवृत्तातील मजकूरात दाढी असलेला उंच असा वृद्ध पुरुष, हातात दंड धारण केलेला आणि पायघोळ शुभ्र लांब झगा घातलेला असे आढळते. तसेच त्याच्या प्रवासाचे वर्णन असून तो पर्वतमय पूर्व प्रदेशातून उत्तरेकडे इंका ओलांडून पुढे गेल्याचे वर्णन आढळते.

वीरकोचा सर्वप्रथम टिटिकाका या सरोवरातून प्रकट झाला. त्याने सूर्याची निर्मिती करून त्यास स्वतःच्या देवत्वाचा व सामर्थ्याचा अंश दिला. तसे सूर्यास आकाशात भ्रमण करावयास लावून काळ निर्माण केला. त्याने चंद्राची समुद्राच्या रक्षणासाठी स्थापना केली. तसेच त्याने वारे, ग्रह व तारे यांची निर्मिती केली.

वीरकोचाने विशाल दगडात प्राण फुंकून मानवनिर्मिती केली; पण त्यांची विवेकशून्य वर्तणूक पाहून जलप्रलयाद्वारे त्यांचा नाश केला, काहींना दगड बनवले. मग त्याने छोटे दगड व लाकडे वापरून मनुष्यजमात निर्माण केली आणि आपल्या अनुयायांच्या मदतीने शेती, पशुपालन, धातुकाम, लेखनकला, वैद्यकशास्त्र, स्थापत्यशास्त्र व अभियांत्रिकी यांचे ज्ञान मनुष्यांना दिले.

वीरकोचाचा मार्ग या नावाने ओळखल्या जाणार्या मार्गाने तो टिटिकाका सरोवराकडून वायव्येस गेला. पुढे राक्ची या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला व त्याच्यावर दगडफेकही केली, तेव्हा त्याने त्या लोकांवर आगीचा वर्षाव करुन त्यांना जाळून टाकले. तेथून तो आणखी पुढे वायव्येस कुझ्को या शहरात गेला. तेथून तो सरळ तुंबेस येथे समुद्रकिनारी आला. तेथे त्याचे अनुयायी त्याची वाट पहात होते. तेथे त्याने समुद्रात प्रवेश केला व तो गुप्त झाला. त्यामुळेच त्याला समुद्राचा फेस या अर्थाचे वीरकोचा हे नाव प्राप्त झाले.

प्राचीन स्पॅनिश इतिवृत्तात त्याचे वर्णन इंकाचा अति महत्त्वाचा देव असे असून तो अदृश्य, व सर्वव्यापी आहे. त्याच्याविषयीच्या काव्यातून त्याचा विश्वनिर्माता असा उल्लेख आढळतो. त्याचे कुझ्को (इंकाची राजधानी) येथील सूर्य मंदिरात सुवर्ण प्रतिकृती आहे. त्याठिकाणी लामांना (प्राणी) बळी देतात. जानेवारी महिन्यातील कॅमे उत्सव-समारंभात नदीत अनेक वस्तु त्याच्या नावे अर्पण करतात.

इंकाच्या अर्ध-ऐतिहासिक राजांच्या यादीतील आठव्या राजाचे नाव वीरकोचा असे ठेवले होते. त्याच्या मुलाच्या स्वप्नात वीरकोचा आल्याची वदंता इतिवृत्तात नोंदविली असून तो नववा पचाकुटी इंका युपांक्वी (कार. १४३८—१४७०) राजा होय. त्याने वीरकोचाचे मंदिर अलंकृत केले आणि इंका साम्राज्याचा विस्तार केला.

संदर्भ :

  •  Foerster, Brien, Elongated Skulls of Peru and Bolivia : The Path of Virakocha, 2015.
  •  Hancock, Graham, Fingerprints of the Gods, London, 1995.
  •  Lirton, Gary, At the Crossroads of the Earth and Sky: An Anden Cosmology, Austin, 1981.

समीक्षक – सिंधू डांगे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा