क्लार्क, जॉन मॉरिस : (३० नोव्हेंबर १८८४ – २७ जून १९६३). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म नॉर्थॅम्प्टन, मॅसॅचूसेट्स येथे झाला. क्लार्क यांनी १९०५ मध्ये ॲमहर्स्ट महाविद्यालयातून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी १९१० मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पीएच. डी. ही पदवी मिळवली. शिकत असतानाच त्यांनी १९०८ – १९१० या काळात कोलोरॅडो महाविद्यालयात, तर १९१०–१९१५ या काळात ॲमहर्स्ट महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याचप्रमाणे १९१५ मध्येच शिकागो विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे सहसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९२२ मध्ये ते याच विद्यापीठात पूर्ण वेळ प्राध्यापकपदी काम करू लागले. १९३९-४० मध्ये नॅशनल रिसोर्सेस प्लॅनिंग बोर्ड या संस्थेचे, तर १९४० – १९४३ या काळात किंमत प्रशासन कार्यालयाचे ते सल्लागार होते. ते १९५७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातूनच निवृत्त झाले. प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जॉन बेट्स क्लार्क (John Bates Clark) यांचे ते पुत्र.
क्लार्क यांच्यावर लहानपणापासूनच त्यांच्या वडलांचा व त्यांनीच मांडलेल्या ‘आर्थिक सिद्धांताʼचा मोठा प्रभाव होता. त्यांना ‘स्टँडर्ड्स ऑफ रिझनेबलनेस इन लोकल फ्रेट डिस्क्रिमिनेशनʼ या आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधाकरिता त्यांच्या वडलांचेच मार्गदर्शन लाभले. त्यांचे ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चʼ, ‘नॅशनल रिसोर्सेस प्लॅनिंग बोर्ड’, ‘दि ॲटर्नी जनरल्स नॅशनल कमिटी टू दि स्टडी ऑफ ॲन्टिट्रस्ट लॉʼ इत्यादी संस्थां-संघटनांसोबत संबंध होते. क्लार्क यांनी परंपरावादी आणि परस्परविरोधी अर्थशास्त्रामध्ये आपले योगदान दिले आहे. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, संस्थात्मक व सामाजिक अर्थशास्त्र या क्षेत्रांतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. त्यांनी स्पर्धेतील चर्चा, अध्ययन, अभ्यास व सुधारणा ही संकल्पना विकसित केली आणि त्यांनी एक शास्त्र म्हणून अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यांच्या अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अमेरिकन इकॉनॉमॉमिक असोसिएशन या संस्थेमार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित असा फ्रान्सिस अ वॉकर मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
क्लार्क यांनी प्रवेगत्व विकसित केले. त्यामध्ये मागणी व गुंतवणूक यांच्यामधील अनियमित चढ-उतार हे उपभोक्त्यांच्या मागणीतील अनियमित चढ-उताराने व्यापक प्रमाणात होतो, अशी मांडणी त्यांनी केली. हीच मांडणी मुख्यत्वे केन्सच्या गुंतवणूक व व्यापारचक्रे यात दिसून येते. क्लार्क यांनी उत्पादनखर्च व उद्योगसंस्थेचा आकार यांचे परीक्षण केले. उत्पादनसंस्था जेव्हा मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात, तेव्हा त्यांचे उत्पादन सरासरी कमी खर्चामध्ये होते, हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले. मोठ्या आकाराच्या उत्पादनसंस्था भांडवल प्रकर्षित उद्योगातील उदाहरणाचे महत्त्वपूर्ण परीक्षण करतात. यातून असे निदर्शनास येते की, खर्चाची अचूक माहिती व कार्यक्षम नियमन हे मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अल्प विक्रेताधिकारी उत्पादन संस्थांमध्ये दिसून येते. जे. एम. क्लार्क यांचे नाव औद्योगिक व स्पर्धात्मक अर्थशास्त्राशी सर्वाधिक संबंधित होते.
क्लार्क यांनी १९२६ मध्ये लिहिलेल्या आपल्या सोशल कंट्रोल ऑफ बिझनेस या ग्रंथात राष्ट्रीय आर्थिक प्रशासन तसेच संस्थात्मक, आर्थिक व कायदेशीर घटकांची चर्चा केली. १९३१ मध्ये लिहिलेल्या आपल्या दि कॉस्ट ऑफ वर्ल्ड वॉर टू दि अमेरिकन पीपल या ग्रंथात त्यांनी पहिल्यांदा परकीय व्यापार व भांडवली गुंतवणुकीवरील आर्थिक गुणक या परिणामाची चर्चा केली. त्यानुसार पहिल्या महायुद्धाचा प्रत्यक्ष खर्च हा सरकारने युद्धासाठी केलेल्या खर्चापेक्षा कित्येक पटीने जास्त होता, असे त्यांनी म्हटले. तसेच १९३५ मध्ये लिहिलेल्या इकॉनॉमिक ऑफ प्लॅनिंग पब्लिक वर्क या पुस्तकातही त्यांनी सार्वजनिक नियोजनामध्ये गुणक परिणामाची विस्तृत चर्चा केली. त्यांनी १९६१ मध्ये लिहिलेल्या कॉम्पिटिशन ॲज अ डायनॅमिक प्रोसेस या ग्रंथात आर्थिक प्रणालीतील ताण व लवचीकता, बाजारशक्तीची मर्यादा, बाजारातील क्षमता यांसारख्या संकल्पनांवर भर दिला.
क्लार्क यांचे कार्य व्यावसायिक, सामाजिक नियंत्रण आणि आर्थिक मूलभूत कायद्याच्या नियंत्रण संशोधन सिद्धांतासंबंधित गैरविचारसरणी, समाजातील यांबाबत भर देणाऱ्या कठोर अथवा जटील औपचारिक म्हणजेच कायद्याबाबत राहिले आणि अनौपचारिक आर्थिक प्रणालीतील बहुदलीय आणि ऐच्छिक अर्थव्यवस्थेतील परंपरागत बाजारविश्लेषणाच्या साचेबद्ध नियंत्रणाबाबत दिसून येते. त्यांच्या लिखाणात त्यांनी सामाजिक अर्थशास्त्राच्या संदर्भाने संस्थात्मक भूमिकेला महत्त्व दिले. वास्तववादी मानसशास्त्रीय आवश्यकता आणि कठोर नीतिमूल्ये ही श्रमाच्या खर्चाबाबत बाजारात नोंदवली जात नाहीत आणि उद्योगांमधे अंदाजित केली जात नाहीत. त्यानंतर संस्थात्मक कार्य हे सामाजिक खर्च आणि बहिर्जात चलासंदर्भात विचारात घेतले जाते.
क्लार्क यांनी पुढील महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत : दि सोशल कंट्रोल ऑफ ट्रस्ट (१९१२ – सहलेखक), रीडिंग इन दि इकॉनॉमिक्स ऑफ वॉर (१९१८), स्टडिज इन दि इकॉनॉमिक्स ओव्हरहेड कॉस्ट (१९२३), सोशल कंट्रोल ऑफ बिझनेस (१९२६), दि कॉस्ट ऑफ दि वर्ल्ड वॉर टू दि अमेरिकन पीपल (१९३१), स्ट्रॅटेजिक फॅक्टर इन बिझनेस सायकल (१९३४), दि इकॉनॉमिक्स ऑफ प्लॅनिंग वर्क्स (१९३५), प्रीफेस टू सोशल इकॉनॉमिक्स (१९३६), ॲन अल्टरनेटिव्ह टू सर्फडॉम (१९४८), गाइड पोस्ट्स इन टाइम ऑफ चेंज (१९४९), दि इथिक बेसिक ऑफ इकॉनॉमी फ्रीडम (१९५५), इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स ॲण्ड ह्यूमन वेल्फेअर (१९५७), दि व्हेज-प्राइस प्रॉब्लेम (१९६० – सहलेखक), कॉम्पिटिशन ॲज अ डायनॅमिक प्रोसेस (१९६१). शिवाय त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले आहेत.
क्लार्क यांचे वेस्टपोर्ट, कनेक्टिकट (America) येथे निधन झाले.
संदर्भ :
- एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका.
- न्यू वर्ल्ड एनसायक्लोपीडिया.
- बोएम बाव्हेर्क, कॅपिटल ॲण्ड इंटरेस्ट वन्स मोअर, क्वार्टर्ली जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स, १९०६.
- सॅम्युएलसन, पी., पॅराबल ॲण्ड रिॲलिझम इन कॅपिटल थिअरी : द सरोगेट प्रॉडक्शन फंक्शन, १९६२.
समीक्षक – राजस परचुरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.