रोमर, पॉल मिशेल (Romer, Pol Michael) : (६ नोव्हेंबर १९५५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मॅरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन मॅनेजमेंटचे संचालक आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. मानवी संसाधन, नाविन्यता व ज्ञानवृद्धी या देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित घटकांवर आर्थिक विकास अवलंबून असतो, अशा स्वरूपाची मांडणी करणाऱ्या संशोधनासाठी रोमर यांना अर्थतज्ज्ञ विल्यम डी. नॉर्दहॉस (William D. Nordhaus) यांच्या बरोबरीने २०१८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देवून गौरविण्यात आले. रोमर यांनी स्थूल अर्थशास्त्रामध्ये तांत्रिक अशा नाविन्यपूर्ण कल्पनांचा आर्थिक विकासासाठी कशा प्रकारे वापर केला जातो, याबाबतचे विश्लेषण केले आहे.

रोमर यांचा जन्म कोलोरॅडो राज्यातील डेनव्हर येथे रॉय आणि बिट्रिक ‘बी’ मिलर या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील राज्याचे राज्यपाल होते. रोमर यांनी शिकागो विद्यापीठाच्या फिलिप्स एक्सेटर अकॅडमीमधून १९७७ मध्ये गणित विषयातील बी. एस. पदवी, तर १९७८ मध्ये अर्थशास्त्र विषयातील एम. ए. पदवी मिळविली. पुढे १९८३ मध्ये तेथूनच अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट  पदवी त्यांनी प्राप्त केली. न्यूयॉर्क विद्यापीठात प्राध्यापक होण्यापूर्वी त्यांनी शिकागो, बर्कली, स्टॅनफोर्ड, रॉचेस्टर यांसारख्या प्रसिद्ध विद्यापीठांतून अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ते २०१६ – २०१८ या काळात जागतिक बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ व वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्या काळात ते न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न बिझनेस स्कूलमधील अध्यापन कार्यापासून दूर राहिले. तत्पूर्वी २००१ – २००७ या काळात त्यांनी शैक्षणिक कामापासून फारकत घेत अप्लिया नावाची कंपनी स्थापन केली. सदर कंपनी महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा व अभ्यास साहित्य पुरविण्याचे काम करी.

रोमर यांनी १९८० – १९९० या दशकात प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात संशोधनकार्यात गुंतवणूक केल्यास देशाच्या आर्थिक विकासासाठी नवनिर्मितीला चालना मिळू शकते, अशी मांडणी केली. नवनिर्मितीला उत्तेजन देण्यासाठी बौद्धिक संपदेच्या मालकीहक्कासंबंधी कायदे बनविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आर्थिक धोरणातील तफावतीमुळे आर्थिक विकासात फरक पडतो. मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय अनेक बाबतींत फायद्याचा असून आंतरराष्ट्रीय व्यापार जागतिकीकरणाचा सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. २०१५ मध्ये लिहिलेल्या  ‘थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ’ आपल्या या निबंधात गणिती पद्धतींचा वापर करून आर्थिक विकासांतर्गत येणाऱ्या घटकांची मांडणी करणाऱ्या अर्थतज्ज्ञांवर त्यांनी टीका केली. अशा स्वरूपाच्या  आर्थिक मांडणीमुळे आर्थिक विकासाच्या कल्पना स्पष्ट होत नाहीत, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा यांसंबंधीच्या नवीन संकल्पना बाजारपेठीय अर्थव्यवस्थेत कशा आकाराला येतात, याबाबतची मांडणी रोमर यांनी केली. तंत्रज्ञानामुळे विकासाला कशी चालना मिळते व कोणती धोरणे त्याकरिता उपयुक्त ठरतात याचे त्यांनी विश्लेषण केले आहे. देशांच्या आर्थिक विकासाची तुलना विविध घटकांच्या व संशोधनांच्या आधारे करणे शक्य आहे. भौतिक व मानव संसाधनांसंबंधीच्या बाबींसंबंधी विकासाच्या कल्पना कशा भिन्न व परस्परविरोधी आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. रोमर आणि नॉर्दहॉस या दोघांच्या अर्थशास्त्रातील योगदानामध्ये काहींबाबतीत साम्य दिसते. स्वीडिश अकॅडमीच्या निवेदनानुसार दोघांनीही देशांच्या बाजारपेठा परिपूर्ण नसल्याने त्यांत सुधारणा होण्याच्या दृष्टीने सरकारी हस्तक्षेप उपयुक्त ठरू शकतो, अशा स्वरूपाची मांडणी केली. सरकारी हस्तक्षेपातील काही अडथळे कमी करण्यासाठी त्यांनी काही उपाययोजनाही सुचविल्या. नॉर्दहॉस यांनी वातावरणातील बदलासंबंधी जागरूकता न दाखविल्यास अर्थकारणावरील होणारे तोटे दाखवून दिले, तर रोमर यांनी नाविन्यता आणण्याचे आर्थिक फायदे प्रभाविपणे मांडले.

रोमर यांनी पेटंट्स, सिटेशन्स, ॲण्ड इनोव्हेशन्स (सहलेखन – २००५), इंटरनॅशनल मॅक्रोइकॉनॉमिक्स ॲण्ड अप्लिया (२००८) हे ग्रंथ लिहिले असून त्यांचे शोधनिबंध पुढीलप्रमाणे : ‘इन्क्रिझिंग रिटर्न्स ॲण्ड लाँग रन ग्रोथ’ (१९८६), ‘इंडोजिनियस टेक्नॉलॉजिकल चेंज’ (१९९०), ‘न्यू गुड्स ओल्ड थिअरी ॲण्ड वेलफेअर कॉस्ट ऑफ ट्रेड रिस्ट्रिक्शन्स’ (१९९४), ‘प्रिफरन्सेस, प्रॉमिसेज ॲण्ड दि पॉलिटिक्स ऑफ एन्रॉयलमेंट्स’ (१९९६), ‘दि न्यू काल्डर फॅक्ट्स, आयडियाज, इन्स्टिट्यूशन्स पॉप्युलेशन ॲण्ड ह्यूमन कॅपिटल’ (सहलेखन – २०१०).

रोमर यांना नोबेल स्मृती पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या संशोधनकार्यासंबंधी पुढील पुरस्कार लाभले : नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक्स – रिसर्च असोसिएट (१९८७), स्लोअन फौंडेशन – फेलो (१९८८), इकॉनॉमिक सोसायटी – फेलो (१९९०), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन कौन्सिल मेंबर (१९९६), स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूल – डिस्टिंग्यूश्ड टिचिंग अवॉर्ड (१९९९), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस – फेलो (२०००), सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट  फेलो (२०१०).

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा