आर्सेनिक हे धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असून त्याला धातुसदृश असे म्हणतात.  मानवी शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.  उदा., पाण्यामधून शरीरात गेल्यास हृदयाशी संबंधित परिणाम (Cardiovascular effects), जठर आणि आतड्यांवरील रोग, चेतासंस्थेशी संबंधित रोग, फुप्फुसांचा कॅन्सर इत्यादी. जागतिक आरोग्य संस्था आणि भारतीय मानक ब्युरो ह्यांनी आर्सेनिकची पाण्यातील कमाल मात्रा ०.०५ मिग्रॅ./लि. ठरवली आहे.  भूगर्भातील पाण्याचा प्रमाणाबाहेर केलेला उपसा, तसेच आर्सेनिक असलेल्या खडकांची झालेली झीज, औद्योगिक सांडपाणी आणि भूगर्भातील पाणी ह्यांचे मिश्रण होणे अशा कारणांनी पाण्यातील आर्सेनिकचे प्रमाण वाढत जाते.  भारत, नेपाळ, बांगला देश, ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन आणि तैवान ह्या देशांच्या भूगर्भजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण खूप आहे. विशेषतः गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेकाँग ह्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातील भूगर्भजलात.  भारतात पश्चिम बंगालमध्ये तसेच बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड ह्या राज्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव आहे. त्रिसंयुजी आर्सेनिक हे पंचसंयुजी आर्सेनिकपेक्षा अधिक विषारी आणि पाण्यामध्ये अधिक प्रमाणात विरघळणारे आहे.

आर्सेनिक काढण्याच्या पद्धती : भूगर्भसाठा हा ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी वापरला जातो, त्यामुळे ह्या पद्धती साध्या, स्वस्त आणि चालवण्यास सोप्या असणे आवश्यक आहे.

१) फेरस आणि फेरिक किलाटक (Ferrous and ferric coagulants) वापरून निवळण आणि निस्यंदन करणे ही पद्धत पंचसंयुजी (Pentavalent) असलेले आर्सेनिक काढण्यासाठी त्रिसंयुजी (Trivalent) आर्सेनिक पेक्षा अधिक उपयोगी ठरते.

२) तुरटी वापरून किलाटन आणि त्यानंतर निस्यंदन करणे : ही पद्धत पंचसंयुजी आर्सेनिकसाठी उपयोगी आहे.

३) चुना वापरून पाण्याचे निष्फेनीकरण करणे : पाण्याचे निष्फेनीकरण करताना पंचसंयुजी आर्सेनिकवर अधिक परिणाम होतो. परंतु वरील दोन्ही पद्धतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या गाळापेक्षा ह्या पद्धतीमध्ये अधिक गाळ उत्पन्न होतो.

४) आयन विनिमय रेझीनचा वापर करणे : ही पद्धत पुढारलेल्या औद्योगिक देशांसाठी अत्यंत उपयोगी आहे. पाण्यामध्ये लोह आणि मँगॅनीज ह्यांचे प्रमाण जास्त असल्यास प्रथम ते काढून मग आर्सेनिकसाठी आयन विनिमय वापरतात. तसेच सल्फाईड आणि विरघळलेल्या पदार्थांचे अतिरिक्त प्रमाण शुद्धीकरणामध्ये बाधा आणते.

५) प्रभारित अॅल्युमिना (Activated alumina) वापरणे : त्रिसंयुजी आर्सेनिकसाठी अधिक उपयोगी.  पुनरुज्जीवनासाठी तीव्र आम्ल किंवा अल्कलीची गरज पडते. पाण्यातील लोह आणि मँगॅनीज आधी काढणे आवश्यक आहे.

६) विपरित परासरण (Reverse Osmosis) : आर्सेनिक काढण्याची ही एक साधी पण खर्चिक पद्धत आहे.  ह्यामध्ये आर्सेनिक व त्याचे क्षार असलेल्या पाण्यावरील दाब वाढवून ते अर्धपारगम्य पटलामधून (Semipermeable membrane) वाहू दिले तर त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये आर्सेनिकचे प्रमाण खूप कमी झालेले दिसते.  हे पटल आलंबित पदार्थांमुळे चोंदू नये म्हणून पाण्यातले हे पदार्थ पूर्णपणे काढावे लागतात.

७) लोह व मँगॅनीज यांचे ऑक्सिडीकरण : पंचसंयुजी आर्सेनिक काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त. ऑक्सिडीकरणासाठी वायुमिश्रण किंवा क्लोरीनसारखे रसायन वापरून त्रिसंयुजी आर्सेनिकचे पंचसंयुजी आर्सेनिकमध्ये रूपांतर करणे, त्यानंतर निवळण व निस्यंदन करून तिन्ही ऑक्साइड्स काढणे.

८) वरील पद्धतींव्यतिरिक्त दोन टप्प्यांमध्ये करण्याची एक पद्धत म्हणजे प्रथम उत्प्रेरक (catalyst) वापरून निवळण करणे आणि त्यानंतर Ti / Zr (Titanium/Zirconium) ह्याच्या साहाय्याने आर्सेनिकचे पृष्ठशोषण करणे. परंतु ही पद्धत अजून प्रयोगावस्थेत आहे. इतर पृष्ठशोषक किटोसान (chitosan), नारऴाच्या करवंटीचा चुरा (Kaolin) केओलिन हे सुद्धा वापरण्यात आहेत.

९) आर्सेनिकच्या गाळाची विल्हेवाट लावणे : आर्सेनिक काढल्यामुळे उत्पन्न झालेला गाळ हाताळणे, त्याची विल्हेवाट लावणे हा महत्त्वाचा भाग आहे, त्याच्या पद्धती पुढीलप्रमाणे – (अ) घनीकरण (Solidification) आणि स्थिरीकरण (Stabilization) : गाळ, सिमेंट, चुना आणि बॉयलरमधील राख (Fly ash) एकत्र करून त्याचे ठोकळे बनवणे.  ह्या ठोकळ्यांमधून आर्सेनिकचे झिरपणे सर्वांत कमी झाले ते सिमेंट : चुना : गाळ :: २४ : २४ : ५२ ह्या प्रमाणांत बनवले असताना, तसेच ह्या मिश्रणामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जितके जास्त असेल तितके आर्सेनिकचे झिरपणे कमी होते.  सामू ७.० असेल तेव्हासुद्धा झिरपणे कमी होते, (ब) दहन,  (क) जीवाणूंच्या साहाय्याने (Detoxification), (ड) समुद्रामध्ये विसर्जन करणे.

समीक्षक : सुहासिनी माढेकर