सिंग, विजयकुमार : (१० मे १९५१). भारतीय भूसेनेचे चोविसावे सेनाप्रमुख आणि पहिले प्रशिक्षित कमांडो. त्यांचा जन्म लष्कराची परंपरा असलेल्या कुटुंबात पुणे येथे झाला. त्यांचे वडील भूसेनेत कर्नल हुद्द्यावर होते. त्यांचे मूळ गाव हरयाणा राज्यातील बापोरा (जि. भिवानी) होय. राजस्थानातील पिलानी येथील बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून लष्करी प्रशिक्षण घेतले (१९६५–७०) आणि जून १९७० मध्ये त्यांची राजपूत रेजिमेंट (काली चण्डी) क्रमांक दोनच्या पलटणीत निवड (कमिशन) झाली. या पलटणीची त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या सीमेवर नियुक्ती झाली. घुसखोरांना टिपण्यात आणि उच्चबर्फाळ प्रदेशातील लष्करी कारवाईत ते मातब्बर व अनुभवी होते. बांगला देशाच्या युद्धातही (१९७१) त्यांनी भाग घेतला. पुढे अमेरिकेच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून ते पदवीधर झाले. नंतर त्यांनी फोर्ट बेनिंग आणि कार्लिसल (पेनसिल्व्हेनिया) येथे रेंजरचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. द्वंद्वयुद्धाच्या प्रचालनात ते प्रथम आले होते.
भूसेनेच्या प्रमुखपदी पोहोचण्यापूर्वी त्यांनी लष्करात अनेक उच्च पदे भूषविली. त्यांपैकी ऑपरेशन पवन, ऑपरेशन परक्रम, अंबाला व जलंदर येथील भूसेनेचे नेतृत्व, भारतीय लष्करी चमूचे प्रशिक्षक (भूतान) वगैरे महत्त्वाची होत. ३१ मार्च २०१० रोजी त्यांची भूसेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. या पदावरून ते ३१ मे २०१२ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी त्यांच्या जन्मसालाची तसेच त्यांनी लष्कराविषयी केलेल्या काही विधानांविषयी शासकीय स्तरावर आणि प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चा झाली आणि संरक्षण मंत्रालय व लष्करप्रमुख यांतील वाद वृत्तपत्रांतून विशेष गाजला.
विजयकुमार यांना त्यांच्या लष्करातील स्पृहणीय कार्यासाठी अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, रँगर टॅब वगैरे पुरस्कार महत्त्वाचे होत. याशिवाय ११ मार्च २०११ रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आर्मी वॉर कॉलेजमध्ये त्यांची ‘इंटरनॅशनल फेलोज हॉल ऑफ फेम’मध्ये सन्मानपूर्वक नोंद झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा सन्मान मिळविणारे ते तेहतीसावे फेलो (अधिछात्र) असून भारताच्या लष्करातील पहिले अधिकारी होत.
विजयकुमार यांचा विवाह १९७५ साली भारती सिंग यांच्यासोबत झाला असून त्यांना दोन मुली आहेत. सध्या ते केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करीत आहेत.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.