गिबन, एडवर्ड : (२७ एप्रिल १७३७ — १६ जानेवारी १७९४). प्रसिद्ध इंग्लिश इतिहासकार. जन्म पट्‌नी (सरे) येथे एका सुखवस्तू कुटुंबात. त्याची प्रकृती प्रथमपासूनच अत्यंत नाजुक होती. त्यात त्याची आई १७४५ मध्ये मरण पावली. यामुळे शालेय शिक्षणात त्याचे मन विशेष रमेना; पण वयाच्या सोळाव्या वर्षी त्याच्या प्रकृतीत आमूलाग्र सुधारणा झाली.

१७५२ मध्ये तो ऑक्सफर्ड विद्यापीठातून मॅट्रिक झाला. तत्पूर्वी त्याने आपल्या मावशीकडून अनौपचारिक रीत्या शिक्षण घेतले; शिवाय इतिहास आणि धर्मशास्त्र या विषयांचे विपुल वाचन केले आणि कॅथलिक धर्मपंथाचा स्वीकार केला. मॅट्रिकनंतर वडिलांनी त्यास पुढील शिक्षणासाठी लोझॅन (स्वित्झर्लंड) या ठिकाणी डॅनिएल पॅव्हिलर्ड याच्या मार्गदर्शनाखाली ठेवले. पॅव्हिलर्डने त्यास परत प्रॉटेस्टंट पंथात घेऊन त्यास मार्गदर्शन केले. या काळात त्याने गणित, लॅटिन भाषासाहित्य व फ्रेंच भाषा यांचा अभ्यास केला. तेथे त्याची व्हॉल्तेअरशी गाठ पडली. तसेच स्युझान क्यूर्शो या तरुणीशी व झॉर्झ डेव्हर्डन या गृहस्थाशी मैत्री जमली. स्युझानशी त्याने विवाहबद्ध होण्याचे ठरविले. परंतु १७५८ मध्ये तो लंडनला परत आला आणि वडिलांच्या सांगण्यावरून हे लग्न मोडले. तथापि त्याची स्युझानशी अखेरपर्यंत मैत्री होती. पुढे तो सावत्र आईजवळ राहू लागला. लंडनमध्ये त्याने पुढील शिक्षण सुरू केले. दरम्यान १७५९—६३ मधील सप्तवार्षिक युद्धात सक्तीच्या लष्करी भरतीत त्यास सामील व्हावे लागले. कॅप्टन म्हणून तो सहभागी झाला. हा लष्करातील अनुभव आपल्या इतिहासलेखनात उपयोगी पडला, असे तो म्हणे. युद्धानंतर तो यूरोपच्या दौऱ्यावर गेला. इटलीमध्ये असताना त्यास रोमन साम्राज्याचा इतिहास लिहिण्याची कल्पना स्फुरली, असे त्याने आत्मचरित्रात नमूद केले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर (१७७०) त्याने आपले उर्वरित आयुष्य लंडनमध्ये स्थायिक होऊन लेखनवाचनात व्यतीत करण्याचे ठरविले. तथापि सामाजिक जीवनापासून तो अलिप्त नव्हता. १७७४ ते १७८३ च्या दरम्यान तो ब्रिटीश संसदेचा सभासद झाला. बॉस्वेल, डॉ. जॉन्सन, रेनल्ड्‌झ वगैरे तत्कालीन मान्यवर लेखकांमध्ये तो मिसळत असे. त्या वेळी आधुनिक समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक क्लबमध्येही तो सामील झाला. काही दिवस त्याने व्यापार आयुक्त म्हणूनही काम केले. मध्यंतरी त्याने पॅरिस, लोझॅन वगैरे शहरांना भेटी देऊन जुन्या स्नेहसंबंधांना उजाळा दिला. लंडनमध्ये तो मरण पावला.

द हिस्टरी ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एंपायर  हा गिबनचा विश्वविख्यात ग्रंथ. त्याचे एकूण सहा खंड १७७६ ते १७८८ च्या दरम्यान प्रसिद्ध झाले. सर्व खंडांत मिळून प्राचीन व अर्वाचीन यूरोपच्या अंतर्गत संबंधांवर त्याने प्रकाश टाकला. ख्रिस्ती धर्माचा प्रसार व त्याचे तत्त्वज्ञान यांचा विकास हेही विषय त्याने या पुस्तकात प्रभावीपणे हाताळले आहेत. आपली प्रज्ञा व प्रतिभा पणास लावून त्याने हा ग्रंथ रचला. त्याची शैली रसाळ, ओघवती व आलंकारिक आणि मांडणी अत्यंत डौलदार आहे. अर्थात शैलीसौंदर्यासाठी इतिहासाच्या तपशिलांकडे त्याने दुर्लक्ष केले असे नाही. या पुस्तकामुळे त्याला एक श्रेष्ठ इतिहासकार म्हणून कायमचे मानाचे स्थान प्राप्त झाले.

इतिहासकार म्हणून गिबनचे जरी सर्वत्र कौतुक झाले, तरी त्याच्या या प्रसिद्ध ग्रंथावर उलटसुलट टीकाही झाली. गिबनने राजकारण, लढाया व धर्म एवढ्याच विषयांची चर्चा आपल्या ग्रंथात केली आणि तत्कालीन सामाजिक व आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, अशी त्यावर टीका झाली. विशेष वाद माजला तो त्याने केलेल्या त्याच्या ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या उपहासात्मक ऊहापोहाबद्दल. याविषयी त्याची चिकित्सा अपुऱ्या माहितीवर आधारलेली आहे, अशीही टीका करण्यात आली. काहींनी रोमन साम्राज्याचे यूरोपच्या समग्र इतिहासातील महत्त्व त्यास विशद करता आले नाही, अशीही तक्रार केली. गिबनच्या वेळी शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाची पद्धती प्रचलित नव्हती; शिवाय अपुरे संदर्भग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रांचा तुटवडा आणि पुरातत्त्वीय अवशेषांचे अज्ञान यांमुळेही लेखनास काही मर्यादा पडत. तरीही इंग्रजी वाङ्‌मयातील एक अप्रतिम अभिजात साहित्यकृती म्हणून गिबनने लिहिलेला इतिहास एकदा तरी वाचलाच पाहिजे, अशी कल्पना इंग्रजी भाषिकांत रूढ झाली.

मेम्वार्स ऑफ हिज लाइफ अँड रायटिंग्ज  हे गिबनचे आत्मवृत्त लॉर्ड शेफील्डने मिसलेनिअस वर्क्स (१७९६) या शीर्षकाखाली संकलित करून प्रसिद्ध केले. याशिवाय गिबनने व्हिंडिकेशन (१७७९) हा स्फुट लेख आपल्या टीकाकारांच्या टीकेला उत्तर म्हणून लिहिला. त्याचे विविध स्फुट लेख प्रसिद्ध असून इंग्लंडचा इतिहास लिहिण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या द हिस्टरी  ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ द रोमन एंपायर  या ग्रंथाचे अनेक भाषांत भाषांतर झाले असून मूळ पुस्तकाचे अनेक वेळा पुनर्मुद्रणही झाले आहे.

संदर्भ :

  • Low, D. M. Edward Gibbon, 1737 — 1794, New York, 1937.
  • Young, G. M. Gibbon, Toronto, 1948.
  • Swain, J. W. Edward Gibbon the Historian, London, 1966.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.