सेला, कामीलो होसे : (११ मे १९१६-१७ जानेवारी २००२). स्पॅनिश साहित्यिक. पूर्ण नाव कामीलो होसे सेला त्रलोक. जन्म स्पेनमधील इरिया फ्लाविया, गॅलिशिया येथे. तो नऊ वर्षांचा असताना त्याचे कुटुंबीय माद्रिदला आले. तेथेच त्याने माध्यमिक आणि विद्यापीठीय शिक्षण घेतले. पदवीधर मात्र झाला नाही. स्पॅनिश यादवी युद्धात (१९३६- ३९) सेला जनरल फ्रँकोच्या सैन्यात दाखल झाला होता. फॅमिली ऑफ पास्क्यूअल दुआर्ते (१९४२, इं. भा. १९४७) ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीने सेलाला प्रकाशात आणले. स्पेनमधील यादवी युद्धानंतरच्या काळात स्पॅनिश कादंबरी जवळजवळ संपल्यासारखी झाली होती. जिवंतपणाचा प्रत्यय देऊ शकणाऱ्या नव्या प्रवृत्ती तिच्यात फारशा दिसत नव्हत्या. ह्या पार्श्वभूमीवर विख्यात फ्रेंच साहित्यिक ⇨ आल्बेअर काम्यू ह्याच्या द आउटसाइडर (१९४२, इं. भा. १९४६) ह्या कादंबरीचे काहीसे स्मरण करून देणारी सेलाची ही कादंबरी गाजली आणि एक श्रेष्ठ यूरोपीय साहित्यिक म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. ही कादंबरी लोकप्रिय तर झालीच पण साहित्यसमीक्षकांनीही तिला प्रशंसिले. ह्या कादंबरीचा नायक समाजापासून दूरस्थपणाचा (एलिअनेशन) अनुभव घेतो आहे तो हिंसाचाराकडे वळलेला आहे त्याच्या हिंसक कृत्यांचा अर्थ समाजशास्त्राच्या वा मानसशास्त्राच्या दृष्टीने पूर्णतः लावता येत नाही. तथापि स्पेनमधल्या यादवीनंतर निर्माण झालेल्या एक प्रकारच्या निराशाजनक निर्व्यवस्थेचे (केऑस) एक प्रतीकात्मक चित्र ह्या कादंबरीने उभे केले असे म्हणता येईल. ह्या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंस्रता आणि विरूपता ह्यांवर भर देणारी, ‘त्रेमेंदिस्मो’ ह्या नावाने ओळखली जाणारी, एक वैशिष्ट्यपूर्ण शैली तिने स्पॅनिश साहित्यात प्रकट केली.

ह्या कादंबरीनंतर सेलाने लिहिलेल्या कादंबऱ्यांत द हाइव्ह  (१९५१, इं. भा. १९५३) ही कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. मधमाशाच्या पोळ्यासारख्या माद्रिद शहरात एकाकी, भयग्रस्त जीवन जगणाऱ्या आणि आपल्या अन्नाच्या आणि लैंगिक गरजा भागवण्यासाठी धडपडणाऱ्या दोनशेहून अधिक व्यक्तिरेखा सेलाने ह्या कादंबरीत उभ्या केलेल्या आहेत. मानवी अस्तित्वाची क्षुद्रता आणि त्याच्या नातेसंबंधांची निरर्थकता त्यांतून प्रकर्षाने प्रकट होते. सान कामीलो 1936 (१९६९) ही त्यानंतरची त्याची कादंबरी म्हणजे एक अखंड वाहता संज्ञाप्रवाह आहे. ‘ख्राइस्ट व्हर्सस ॲरिझोना’ (१९८८, इं. शी.) आणि गॅलिशियन ट्रिलॉजी (‘मझुर्का फॉर टू डेड पीपल’, १९८३, इं. शी. ‘सेंट अँड्रूज क्रॉस’, १९९४, इं. शी. आणि ‘बॉक्सवुड’, १९९९, इं. शी.) ह्या त्याच्या अन्य कादंबऱ्या.

कादंबरीनंतर सेला प्रवासवर्णनांकडे वळला. स्पेनच्या निरनिराळ्या प्रदेशांतून हिंडून स्पेनची भूमी आणि लोक ह्यांच्या अंतर्यामी जाऊन त्यांचा शोध घेणे हा त्याने केलेल्या भ्रमंतीचा हेतू होता. ‘जर्नी इन द अल्कारिया’ (१९४८, इं. शी.) हे त्याचे प्रवासवर्णन त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. लॅटिन-अमेरिकन देशांनाही त्याने भेटी दिल्या होत्या. ‘फ्रॉम दे मीनो टू द बिडासोआ’ (१९५२, इं. शी.), ‘ज्यूज, मूर्स अँड ख्रिश्चन्स’ (१९५६, इं. शी.) ही त्याची अन्य उल्लेखनीय प्रवासवर्णने होत. सेलाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्याची चित्रमय शैली ह्या प्रवासवर्णनांतून प्रत्ययास येते.

त्याच्या कथासंग्रहांत ‘द पासिंग क्लाउड्स’ (१९४५, इं. शी) आणि ‘द विंडमिल अँड अदर शॉर्ट फिक्शन’ (१९५६, इं. शी) ह्यांचा समावेश होतो. त्याने निबंध, कविता आणि संस्मरणिकाही लिहिल्या. १९५५ साली तो माजोर्का येथे आपल्या पत्नीसह स्थायिक झाला. तेथे त्याने एक वाङ्‌मयीन नियतकालिकही काढले.

१९५७ मध्ये त्याला स्पॅनिश अकादमीचे सदस्यत्व देण्यात आले, तसेच १९८९ मध्ये त्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

माद्रिद येथे तो निधन पावला.

संदर्भ :

• Foster, David W. Forms of the Novel in the work of Camilo Jose Cela, 1967.

• Kirsner, Robert, The Novels and Travels of Camilo Jose Cela, 1964.

• McPheeters, D. W. Camilo Jose Cela, 1969.