राय, हिमांशू : (? १८९२–१६ किंवा १८ मे १९४०). ‘बॉम्बे टॉकीज’ या सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मितीसंस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने चित्रपटनिर्मिती करणारे आद्य भारतीय चित्रपटनिर्माते. त्यांचा जन्म एका सधन बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण शांतीनिकेतनमध्ये झाले. पुढे कोलकाता विद्यापीठाची कायद्यातील पदवी घेतल्यानंतर ते १९२१ च्या सुमारास उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तेथेच थोर देशभक्त बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव निरंजन पाल यांच्याशी त्यांची भेट झाली. निरंजन पाल यांच्या द गॉडेस नावाच्या नाटकात हिमांशू राय एक भूमिका करीत. निरंजन पाल यांनी एडविन आर्नल्ड यांच्या लाइट ऑफ एशिया या काव्यग्रंथाच्या आधारे गौतम बुद्धांच्या जीवनावर एक चित्रपट कथा तयार केली होती आणि ‘एमेल्का’ या सुप्रसिद्ध जर्मन फिल्म कंपनीतर्फे त्या कथेवर हिंदुस्थानात चित्रपट तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते; परंतु चित्रपटनिर्मितीवर हिंदुस्थानात होणारा खर्च हिंदी कंपनीने करावा अशी अट असल्यामुळे त्यात पुढे काही हालचाल होत नव्हती. हिमांशू राय यांना ही गोष्ट कळल्यावर लाहोर हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मोतीसागर यांच्या साहाय्याने जरूर ते भांडवल जमवून हिमांशू राय यांनी ‘ग्रेट ईस्टर्न कॉर्पोरेशन’ नावाची कंपनी दिल्लीत उभी केली आणि एमेल्का कंपनीच्या तंत्रज्ञांना भारतात बोलावून लाइट ऑफ एशिया हा चित्रपट १९२६ साली पूर्ण केला. या चित्रपटात सिद्धार्थची प्रमुख भूमिका राय यांनीच केली होती. दोन देशांनी संयुक्तपणे निर्माण केलेला व यूरोपातील अनेक देशांत दाखविला गेलेला हा पहिलाच भारतीय मूकपट होय. दरम्यान राय यांनी कायद्याचा अभ्यास सोडला आणि चित्रपटनिर्मिती हेच जीवितकार्य ठरविले. पुढे १९२८ साली ‘उफा’ या जर्मन कंपनीच्या सहकार्याने शिराझ आणि १९३० साली एका ब्रिटिश कंपनीच्या मदतीने अ थ्रो ऑफ डाइस असे आणखी दोन भारतीय मूकपट त्यांनी तयार केले.

चित्रपटांच्या निमित्ताने लंडनमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या नातीशी म्हणजेच हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री देविकाराणी चौधरींशी हिमांशू राय यांची ओळख झाली आणि ते १९२६ साली विवाहबद्ध झाले.

बोलपटांच्या निर्मितीची सुरुवात झाल्यानंतर १९३३ मध्ये कर्म हा इंग्रजी व हिंदी भाषांतला पहिला बोलपट हिमांशू राय यांनी लंडनच्या ‘स्टोल स्टुडिओ’त तयार केला. त्यांत हिमांशू−देविकाराणी पती-पत्नींनी प्रथमच मुख्य भूमिका केल्या होत्या. कर्मच्या लंडन प्रकाशनानंतर हिमांशू आणि देविकाराणी यांना समीक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट रसिकांनाही आवडला. यामुळे राय यांना प्रसिद्धी मिळाली. आपले सर्व भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असले पाहिजेत, अशी हिमांशू राय यांची धारणा होती. तथापि बोलपटामुळे भाषेचे बंधन आपोआपच पडले होते. त्यामुळे राय यांनी भारतात चित्रपटनिर्मिती करण्याचे ठरविले. चित्रपट-व्यवसाय तेव्हा उपेक्षित व अप्रतिष्ठितही होता. तरीही राय यांनी आपल्या मूकपटांनी मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व स्वतःच्या संघटनाचातुर्याच्या बळावर १९३४ साली मुंबईत बॉम्बे टॉकीजची स्थापना केली. सर चिमणलाल सेटलवाड, सर कावसजी जहांगीर, सर फिरोज सेठना, एफ्. ई. दिनशा, सर चुनिलाल मेहता असे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर बॉम्बे टॉकीजच्या संचालक मंडळावर होते आणि उत्तम करमणूकप्रधान चित्रपट काढून हिमांशू राय यांनी आपल्या कंपनीला प्रभात फिल्म कंपनी आणि न्यू थिएटर्स या त्यावेळच्या नावाजलेल्या कंपन्यांबरोबरच स्थान प्राप्त करून दिले. तत्कालीन आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशी ही निर्मितीसंस्था होती. पुढील सहा वर्षांत त्यांनी बॉम्बे टॉकीजचे सोळा बोलपट निर्माण केले. अछूतकन्या (१९३९) आणि सावित्री (१९३७) हे त्यांपैकी उल्लेखनीय चित्रपट होत. १९३३ मध्ये रॉय यांनी टागोर टॉकी नावाचा लघुपट रवींद्रनाथ टागोरांवर बनविला होता. त्यात टागोरांच्या काही कविता होत्या. बॉम्बे टॉकीजशी निगडित असे अशोककुमार, राज कपूर, दिलीपकुमार, सुबोध मुखर्जी, के. ए. अब्बास यांसारखे उत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शक उल्लेखनीय आहेत. हिमांशू राय यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकाली निधन झाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे भारतीय चित्रपट काढण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले.