भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. तर निर्मिती जी. पी. सिप्पी यांची होती. प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय, सशक्त दिग्दर्शन, उत्कृष्ट संकलन, वैशिष्ट्यपूर्ण कथा, वेगवान साहसदृश्ये आणि लोकप्रिय संगीत यांचा समावेश असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो.

चित्रपटाची कथा एक निवृत्त पोलिस अधिकारी एका दरोडेखोराला पकडण्याकरता दोन भुरट्या गुन्हेगारांची मदत घेतो, या सूत्राभोवती गुंफलेली आहे. दुर्गम भागातील अत्याचारी व क्रूर दरोडेखोर गब्बर सिंग (अमजद खान) याला पकडण्याकरिता ठाकूर बलदेव सिंग (संजीव कुमार) भुरट्या चोऱ्या करून गुजराण करणाऱ्या दोन गुन्हेगारांची नेमणूक करतो. ठाकूर आणि त्याचे कुटुंबीयही या दरोडेखोराच्या क्रूरपणाचे बळी असतात. या पार्श्वभूमीवर आणि गावातील दहशतीच्या वातावरणात जय (अमिताभ बच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) हे दोन जिवलग मित्र ठाकूर बलदेव सिंगच्या बोलावण्यानुसार गावात दाखल होतात. हळूहळू गावातील लोकांशी या दोन मित्रांचा ओळख होते आणि दरोडेखोर गब्बरच्या अत्याचाराच्या एकेक घटना त्यांच्यासमोर उघड होतात. त्यामुळे हे दोन मित्र या गावाच्या समस्येत गुंतले जातात. त्याचवेळी ठाकूर बलदेव सिंगची विधवा सून राधा (जया भादुरी) आणि जय यांचे संयत भावनिक नाते फुलत जाते. त्याचबरोबरीने वीरू आणि बसंती (हेमा मालिनी) यांचे अवखळ प्रेमबंधनही जुळते. यातून चित्रपटाची कथाही पुढेपुढे सरकते. चित्रपटात इतर पात्रांच्या तोंडी असणारे खटकेबाज प्रसंगी भावनिक संवाद चित्रपटाची कथा पुढे नेतात. जेलर ( गोवर्धन असराणी), हरिराम (केष्टो मुखर्जी), सूरमा भोपाली (जगदीप), रामलाल (सत्येन कप्पू), रहीम चाचा (ए. के. हंगल), अहमद (सचिन पिळगावकर) चित्रपटातील ही पात्रेही खूप गाजली. चित्रपटात ठिकठिकाणी पेरलेल्या विनोदी प्रसंगांना खूप प्रसिद्धी मिळाली.

शोले या चित्रपटाच्या कथेवर प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याच्या द सेवन सामुराई  या चित्रपटाचा आणि  वेस्टर्न या अमेरिकन चित्रप्रकाराचा बराच प्रभाव आहे. याची कथा प्रसिद्ध चित्रपट कथा-पटकथा लेखक जोडी सलीम खान-जावेद अख्तर यांनी लिहिलेली आहे. त्यांनी मूळच्या पाश्चात्त्य संकल्पनेचा खुबीने वापर करून भारतीय वातावरणाला साजेशी कथा-पटकथा तयार केली. या चित्रपटात अनेक प्रकारच्या संकल्पनांचे मिश्रण आढळते. मसाला चित्रपट, किंचितशी विदेशी चित्रपटांची छाप, हिंसाचाराचे समर्थन, कौटुंबिक पार्श्वभूमी, तत्कालीन समाजाची आणि समस्यांची ओळख असे बरेच स्तर याच्या कथेमधे आहेत. याचे चित्रीकरण दक्षिण कर्नाटकात असलेल्या रामनगरम् या गावात सुमारे अडीच वर्षे चालले. कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी या चित्रपटात दाखवलेले पूर्ण रामगढ गाव नव्याने उभे केले आणि ३ ऑक्टोबर १९७३ ला शोलेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली.

भारतीय अभ्यवेक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) सुचविलेले हिंसाचाराचे काही प्रसंग वगळून १५ ऑगस्ट १९७५ रोजी १९८ मिनिटे लांबी असलेला शोले  हा चित्रपट प्रदर्शित झाला. नंतर १९९० मध्ये २०४ मिनिटांची लांबी असलेली मूळ प्रत घरी पाहण्याकरता (होम मिडिया) उपलब्ध झाली. जानेवारी २०१४ मध्ये शोले त्रिमिती स्वरूपात (3 D) पुन:प्रदर्शित झाला. स्टिरियो ध्वनी व सहा मार्गिकांमधून येणारा ध्वनी आणि ७० मिमी चित्रफीत पद्धती यांचा वापर केलेला शोले हा पहिला भारतीय चित्रपट होय. मूळ चित्रपट ३५ मिमीवर चित्रित करण्यात आला. मग त्याचे रूपांतर ७० मिमीमध्ये करण्यात आले.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरुवातीचे दोन आठवडे या चित्रपटास प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. नंतर मात्र चित्रपट पाहिलेल्या लोकांनी केलेल्या त्याच्या स्तुतीमुळे त्यांची चांगलीच जाहिरात झाली आणि तिकिटबारीवर हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचू लागला. राहुलदेव बर्मन यांचे संगीत असलेल्या गाण्याच्या आणि सलीम-जावेद याचे संवाद असलेल्या ध्वनिमुद्रिकांचा विक्रमी खप झाला. या चित्रपटातील काही पात्रे व त्यांचे संवाद झपाट्याने लोकप्रिय झाले. स्थानिक बोलीभाषेत आणि संवादांमध्येही या सिनेमातील संकल्पना आणि संवादांचा वापर होऊ लागला. शोले लवकरच १९७५ सालचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. शंभरच्या वर चित्रपटगृहांत ‘७५ आठवडे टिकून राहणारा पहिला भारतीय चित्रपट’ असा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात सलग पाच वर्षे हा चित्रपट दाखविला जात होता. शतकातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बीबीसीने याची निवड केली. या चित्रपटास १९७६ मध्ये उत्कृष्ट संकलनासाठीचा (संकलक – एम. एस. शिंदे) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याशिवाय बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता (अमजद खान), सर्वोत्कृष्ट छायांकन (द्वारका द्विवेचा), सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक (राम येडेकर) हे तीन पुरस्कार मिळाले. २००५ सालीही या चित्रपटास ५० वर्षांतील श्रेष्ठ चित्रपट या विभागातून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले.

समीक्षक : संतोष पाठारे