ॲटिला : (४०६?—४५३). प्रसिद्ध हूण राजा. वडिलांचे नाव मुंदझुक व चुलत्याचे नाव रूआ. रूआनंतर ४३४ मध्ये ॲटिला आपला भाऊ ब्लीडासह गादीवर आला. त्यांचे साम्राज्य पश्चिमेकडील आल्प्स व बाल्टिक प्रदेश इथपासून ते पूर्वेकडील कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरले होते. ४४५ मध्ये त्याने ब्लीडाचा खून केला असावा. बायझंटिन साम्राज्याकडून तो जबरदस्त खंडणी वसूल करी व ती चुकल्यास तो त्यांच्या प्रदेशावर हल्ला करून जाळपोळ, लुटालूट करी आणि शहरे बेचिराख करी.
ॲटिलाने ४५१ मध्ये गॉलवर आक्रमण केले. रोमन साम्राज्याचा सेनापती एईशसशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. व्हिसीगॉथ राज्य घेणे हा आक्रमणामागील आपला हेतू असल्याचे ॲटिलाचे म्हणणे होते. रोमन सम्राट तिसरा व्हॅलंटिअनशी आपले वैर नसल्याचेही त्याने जाहीर केले होते; परंतु ४५० साली सम्राटची बहीण होनोरिआने ॲटिलाला अंगठी पाठवून आपल्या नियोजित विवाहातून आपली सुटका करावी, असे कळविले. त्यावर ॲटिलाने होनोरिआ ही आपली पत्नी असून निम्मे पश्चिमी रोमन साम्राज्य हुंडा म्हणून द्यावे, अशी मागणी रोमन सम्राटाकडे केली. व्हॅलंटिअन आधीच गॉलमध्ये दाखल झाला होता. तेव्हा एईशस व व्हिसीगॉथचा राजा पहिला थिओडोरिक यांनी एकत्र येऊन ॲटिलाचा प्रतिकार केला. अखेरीस झालेल्या अटीतटीच्या लढाईत थिओडोरिक मारला गेला; पण ॲटिलाला माघार घ्यावी लागली आणि शेवटी तो गॉलमधून बाहेर पडला. हा त्याच्या आयुष्यातला पहिला व एकमेव पराजय ठरला.
ॲटिलाने ४५२ मध्ये उत्तर इटलीवर स्वारी करून तेथील शहरे नष्ट केली. त्याला रोमन सेनापती एईशस प्रतिकार करू शकला नाही. मात्र त्या वर्षी इटलीत पडलेला दुष्काळ व रोगराई यांमुळे हूणांना परतावे लागले. शिवाय पोप पहिला लिओ याने केलेली रदबदली ॲटिलाने मान्य केली होती.
ॲटिलाचा मृत्यू त्याच्या लग्नाच्या रात्री झाला. अचानकपणे झालेला हा मृत्यू नैसर्गिक होता की त्याच्या नववधूने त्याचा खून केला, याविषयी इतिहासतज्ञांत मतमतांतरे आहेत. रोमन इतिहासकार प्रिस्कसने केलेल्या वर्णनावरून तो कुरूप व चिडखोर असला, तरी दयाशून्य नव्हता. विद्वानांची तो कदर करी. साध्या राहणीमुळे तो हूणांमध्ये प्रिय होता.
संदर्भ :
- https://www.livescience.com/44417-attila-the-hun.html