बाबूराव पेंटर : (३ जून १८९० – १६ जानेवारी १९५४). प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक. पूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मेस्त्री (मिस्त्री). जन्म कोल्हापूर येथे. त्यांचे वडील सुतारकाम, लोहारकाम करीत.

बाबूरावांचा लौकिक चित्रकार म्हणून असला, तरी त्यांना खरीखुरी कीर्ती लाभली ती त्यांनी केलेल्या चित्रपटक्षेत्रातील कामगिरीमुळे. आपले आतेभाऊ आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी ‘डेक्कन सिनेमा’ सुरू केला होता, पण तो लवकरच बंद पडला, त्यानंतर १९१३ मध्ये त्या दोघांनी बाबूराव रूईकर यांच्यासह ‘महाराष्ट्र सिनेमा’ ह्या चित्रपट निर्मितिसंस्थेची निर्मिती केली; ती बंद करून पुढे १ डिसेंबर १९१७ रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली आणि १९१९ मध्ये सैरंध्री या आपल्या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली. कल्पकता, भव्यता, स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका आणि पौराणिक काळातील राजवैभवाचे दर्शन हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात सैरंध्री प्रदर्शित झाला व लो. टिळकांनी हा चित्रपट पहिला (८ फेब्रुवारी १९२०). त्यांनी  बाबूरांवाना ‘सिनेमा केसरी’ या उपाधीने गौरविले. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारा बाबूरावांनी १९२०-३० या दशकात एकूण १७ चित्रपटांची निर्मिती केली. त्यांपैकी वत्सलाहरण (१९२१) व भक्त प्रल्हाद (१९२६) हे पौराणिक, तर सिंहगड (१९२३), कल्याण खजिना (१९२४), सती पद्मिनी (१९२४) व शहाला शह (१९२५) हे ऐतिहासिक आणि सावकारी पाश (१९२५) हा सामाजिक कथानकावरील वास्तववादी चित्रपट होय. सिंहगड  हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रिकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लँप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रिकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रिकरणामुळे तो बाह्यचित्रिकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर बसविण्यात आला. या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली ३.४८ x ६.९६ मीटर (१० x २० फूट) लांबी-रुंदीची भित्तिपत्रके तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडे जाते. त्यांच्या सैरंध्री  या चित्रपटातील कीचकवधाचे दृश्य परिणामकारक होते, ते पाहून काही प्रेक्षक मूर्च्छित पडले. तेव्हापासून सरकारने चित्रपटांच्या अभ्यवेक्षणास सुरुवात केली. कल्याण खजिना, सती पद्मिनी सिंहगड  या त्यांच्या मूकपटांना यूरोपमधील वेम्बले येथील चित्रपटप्रदर्शनात सुवर्णपदके लाभली.

वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेयाचे चित्रीकरण सुरू केले, परंतु ६ नोव्हेंबर १९२२ रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला एकाएकी आग लागली. तथापि त्या संकटातूनही त्यांनी आपला चित्रपटसंसार उभा केला व चित्रपटनिर्मिती सुरू ठेवली. त्याकाळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपटसंस्था मानली जाई. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कालोचित ठरणारी वेशभूषा व वातावरणनिर्मिती करण्याची बाबूरावांची हातोटी होती. त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक असे.

बाबूराव आपल्या चित्रपटांतून मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाचे चित्रण आपले कलाकौशल्य पणाला लावून करीत. सैरंध्री चित्रपटापासूनच बाबूरावांनी चित्रपटाच्या कथानकाची माहिती देणाऱ्या इंग्रजी, मराठी, हिंदी व गुजराती या भाषांतील सचित्र पुस्तिका प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यांनी तयार केलेली चित्रपटांची भित्तिपत्रके आणि जाहिरातींचे फलक (पोस्टर व बॅनर) यांमध्ये कलात्मकता असे. त्यांच्या एका मूकचित्रपटाच्या जलरंगातील जाहिरातींच्या दृश्यमांडणीचा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्राचार्य सॉलोमन यांनी गौरव केला होता.

बाबूरावांना चित्रपटापेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक दृष्टी फारशी नसल्यामुळे त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी लंका (१९३०) या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.

बोलपटाचे युग सुरू झाल्यावर कोल्हापूरच्या ‘शालिनी सिनेटोन’ या संस्थेला बाबूरावांनी सहकार्य दिले व तिच्याद्वारे निर्माण झालेला उषा, सावकारी पाश  (१९३५) व प्रतिमा  तसेच साध्वी मीराबाई (१९३७),रुक्मिणी स्वयंवर  (१९४६), लोकशाहीर रामजोशी  (१९४७) व विश्वामित्र  (१९५२) या बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया  दादासाहेब फाळके यांनी घातला आणि बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून देवून पुढचे पाउल टाकले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस्. फत्तेलाल, विष्णुपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला.

बाबूरांवांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्स व लॅडशियर इ. चित्रकारांची छाप दिसून येते. त्रिंदाद, आगासकर, नागेशकर, पत्रावळे व हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रे ते अभ्यासत व आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत. कलामहर्षी म्हणून ते गौरविले जात.  प्रतिमाचित्रणातील कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य, विशेषत: पडद्याची कलात्मकता या बाबतींत त्यांनी खूपच लोकिक मिळविला होता. चित्रशिल्पादी कलाक्षेत्रांत त्यांनी स्वाध्यायाच्या बळावरच आपली प्रगती करून घेतली.

शिल्पकलेत मृद्-शिल्पनापासून तर ब्राँझच्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वत:च करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वत:ची ओतशाळाही उभारली होती. त्यांनी महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले इत्यादींच्या केलेल्या शिल्पाकृती खूप नावाजल्या.

त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

पहा : चित्रपट (मराठी चित्रपट).

संदर्भ :

  • भिडे, ग. रं.; गजबर, बाबा, कलामहर्षी बाबूराव पेंटर, कोल्हापूर, १९७८.

समीक्षक : श्यामला वनारसे