सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. पर्व या शब्दाचा अर्थ पेर किंवा विभाग असा होतो. विशेष, अविशेष, लिंगमात्र, अलिंग या गुणांच्या चार अवस्था आहेत (विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि| योगसूत्र २.१९). गुणपर्व या शब्दाने सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांपासून चार वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होणारी सृष्टी सूचित केली आहे.
(१) विशेष : आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पाच महाभूते, ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये व मन या सोळा तत्त्वांना विशेष अशी संज्ञा आहे. महाभूते आणि त्यांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच गुण विशेषत्वाने अभिव्यक्त होतात आणि त्यांचे ज्ञान इंद्रियांद्वारे होऊ शकते; म्हणून महाभूतांना विशेष असे म्हणतात. आकाशात शब्द हा एकच गुण; वायूत शब्द व स्पर्श असे दोन गुण; अग्नीत शब्द, स्पर्श व रूप असे तीन गुण; जलामध्ये शब्द, स्पर्श, रूप व रस असे चार गुण आणि पृथ्वीत शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे पाच गुण राहतात. या पाच महाभूतांमध्येच परिणाम होऊन विविध पदार्थ उत्पन्न होतात व तेही महाभूतांच्या रूपातच राहतात. महाभूतांपासून अन्य भिन्न तत्त्व निर्माण होत नाही.
कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या पाच ज्ञानेंद्रियांनाही विशेष म्हणतात. कारण त्यांद्वारे क्रमश: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याच पाच विषयांचे ज्ञान होते, अन्य विषयांचे नाही. वाचा (वाक्), हात (पाणि), पाय (पाद), गुद (पायु) आणि लिंग किंवा योनी (उपस्थ) या पाच कर्मेंद्रियांनाही विशेष म्हणतात. कारण त्यांद्वारे क्रमश: वचन (बोलणे), आदान (घेणे), गमन (जाणे), उत्सर्जन आणि आनंद याच पाच विशेष क्रिया घडून येतात. सांख्य दर्शनानुसार संकल्प (वस्तूला ओळखणे) हेच मनाचे विशेष कार्य असल्यामुळे त्यालाही विशेष अशी संज्ञा आहे.
(२) अविशेष : शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पाच तन्मात्र व अहंकार या सहा तत्त्वांना अविशेष अशी संज्ञा आहे. महाभूते उत्पन्न होण्याआधी त्यांची जी तन्मात्ररूप पूर्वावस्था असते, त्यामध्ये द्रव्य आणि गुण यांचे तादात्म्य असते. ते एकरूप असल्यामुळे त्यांचे विशेषत्वाने ज्ञान होत नाही, त्यामुळे तन्मात्रांना अविशेष असे म्हणतात. ११ इंद्रियेसुद्धा विशेषरूपाने अभिव्यक्त होण्याआधी अहंकारामध्ये तदात्म (अभिन्न/एकरूप) अवस्थेत असतात, त्यामुळे अहंकारालाही अविशेष अशी संज्ञा आहे. अहंकारालाच अस्मिता असे म्हणतात.
(३) लिंगमात्र : ‘बुद्धी’ किंवा ‘महत्तत्त्व’ म्हणजे प्रकृतीचेही ज्ञान अनुमानाद्वारे होते, म्हणून बुद्धीला लिंग असे म्हणतात. ‘लयं गच्छति इति म्हणजे लिंग होय. ‘लीनम् अर्थं गमयति इति लिंगम्’ या व्युत्त्पत्तीनुसार ‘ज्याद्वारे सूक्ष्म/अप्रत्यक्ष वस्तूचे ज्ञान प्राप्त होते, ते साधन म्हणजे लिंग होय’. बुद्धीचे ज्ञान झाल्यावर तिच्या कारणाचे म्ह लिंगम्’ या व्युत्त्पत्तीनुसार ज्याचा कारणात लय होतो, त्याला लिंग असे म्हणतात. प्रलयकाळी बुद्धी प्रकृतीमध्ये लय पावते, त्यामुळे तिला लिंग असे म्हणतात. यामहत्तत्त्वाला सांख्य व योगात जगाचा अंकुर मानले आहे.
(४) अलिंग : प्रकृती ही सत्त्व, रज आणि तम या गुणांची साम्यावस्था होय. या अवस्थेलाच अलिंग असे म्हणतात, कारण प्रकृतीचा कोणातही लय होत नाही. सांख्यदर्शनानुसार प्रकृती ही सृष्टीचे मूळ कारण आहे, पण तिचे कोणतेही कारण नाही त्यामुळे तिला नित्य असे म्हणतात.
ज्याप्रमाणे बांबूच्या बीजाला प्रथम एक अंकुर फुटतो नंतर त्याला एक पर्व (पेर) फुटते; नंतर दुसरे, तिसरे, चौथे असे पेर फुटत जाते आणि बांबूची वाढ होते. त्याप्रमाणे प्रकृतीपासून क्रमाक्रमाने सृष्टीची निर्मिती होते. पाटातून दिले जाणारे पाणी एकच असले तरी वेगवेगळ्या पिकांना ते दिल्यावर जशी फळे, फुले, रंग, रस यांची विविधता निर्माण होते, त्याप्रमाणे प्रकृतीमध्ये समानरूपाने राहणाऱ्या गुणांचे प्रमाण कमी-अधिक झाल्यावर विविध सृष्टी निर्माण होते.
याप्रमाणे विशेष, अविशेष, लिंगमात्र आणि अलिंग ही त्रिगुणांची चार गुणपर्वे होत.
पहा : त्रिगुण.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर