योगाचे एक अंग. महर्षी पतंजलींनी योगसूत्रात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम नमूद केले आहेत. (शौचसन्तोषतप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा: | योगसूत्र २.३२)

शौच : शौच म्हणजे शुद्धी होय. ही बाह्य व आभ्यंतर अशी दोन प्रकारची आहे. मृत्तिका, जल इत्यादिकांनी शरीराची शुद्धी करणे ही बाह्य शुद्धी होय. आभ्यंतर शुद्धी म्हणजे मैत्री, मुदिता, करुणा आणि उपेक्षा यांच्या चिंतनाने चित्तातील ईर्ष्या, दुसऱ्यावर अपकार करण्याची इच्छा, असूया आणि क्रोध हे मल दूर करणे.

पतंजलि शौच आचरणात आणण्याचे फळ पुढीलप्रमाणे सांगतात – “बाह्य शौचाचे पालन केल्यामुळे योगी आपले शरीर अशुद्ध आहे हे जाणतो, त्याला स्वत:च्या शरीराविषयी किळस व तुच्छ बुद्धी उत्पन्न होते आणि दुसऱ्याचे शरीरही अशुद्ध आहे हे जाणून दुसऱ्यांच्या शरीराशी संसर्ग करण्याची इच्छा त्याच्या चित्तात उत्पन्न होत नाही. आभ्यंतर शौचामुळे चित्त शुद्ध व स्थिर होते. मन प्रसन्न होते. चित्त एकाग्र होते. इंद्रियांवर जय प्राप्त होतो आणि साधक आत्मदर्शनाची योग्यता मिळवितो.” (योगसूत्र २.४०, ४१).

विज्ञानभिक्षु असे म्हणतात की, चित्तमल दूर झाल्यावर सत्त्वशुद्धी (चित्तशुद्धी) होते. सत्त्वगुणाचा उत्कर्ष होतो. त्यामुळे चित्तात सौमनस्य म्हणजे प्रीती तसेच बाह्य साधनांवर अवलंबून नसलेला आनंद निर्माण होतो. आनंदामुळे चित्ताचा विक्षेप होत नाही. परिणामी एकाग्रता साधते. त्यानंतर क्रमाने इंद्रियजय व आत्मसाक्षात्काराची (विवेकख्याति प्राप्त होण्याची) योग्यता प्राप्त होते. (योगवार्त्तिक २.४१).

संतोष : स्वत:कडे असलेल्या वस्तूंवर समाधान मानणे व अधिकाच्या प्राप्तीची इच्छा न करणे म्हणजे संतोष होय (व्यासभाष्य २.३२). वाचस्पति मिश्र व विज्ञानभिक्षु यांच्या मते निर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक वस्तूंच्या प्राप्तीची इच्छा न करणे म्हणजे संतोष होय (तत्त्ववैशारदी २.३२; योगवार्त्तिक २.३२). विज्ञानभिक्षूंच्या मते संतोष म्हणजे तृष्णाक्षय होय. संतोषामुळे श्रेष्ठ सुखाचा लाभ होतो (योगसूत्र २.४२).

तप : सुख-दु:ख, शीत-उष्ण, भूक-तहान, काष्ठमौन-आकारमौन इत्यादींविषयी सहनशीलता म्हणजे तप होय (व्यासभाष्य २.३२). व्यासांनी ‘काष्ठमौन’ आणि ‘आकारमौन’ असे मौनाचे दोन प्रकार सांगितले आहेत. विज्ञानभिक्षूंनी काष्ठमौनाचा अर्थ मौन पाळणे आणि हात इत्यादींचा वापर करून अथवा खाणाखुणा करून देखील मनोगत व्यक्त न करणे असा सांगितला आहे. काष्ठ म्हणजे लाकूड. लाकडाप्रमाणे निश्चेष्ट राहणे, हालचालीद्वारे इच्छित अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न न करणे हे या प्रकारच्या मौनात अभिप्रेत आहे. आकारमौन वाणीचा उपयोग न करण्यापुरते सीमित आहे. त्यामुळे या प्रकारच्या मौनामध्ये खाणाखुणांनी इंगित व्यक्त करण्याची मुभा आहे. (योगवार्त्तिक २. ३२).

एकादशी, चांद्रायण इत्यादी व्रतांचे आचरण करणे म्हणजे तप होय. चांद्रायण व्रत म्हणजे अमावास्येला उपवास करून प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कलांच्या संख्येइतके भोजनाचे घास वाढवीत नेणे. म्हणजे प्रतिपदेला एक घास, द्वितीयेला दोन घास असा आहार करणे. पुन्हा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत घास क्रमाने कमी करत अमावास्येला उपवास करणे. तपाने अशुद्धी दूर होऊन शरीर व इंद्रियविषयक सिद्धी प्राप्त होतात. (योगसूत्र २.४३). भोजांच्या मते अशुद्धी शब्दाचा अर्थ क्लेश असा आहे (भोजवृत्ति २.४३). तर नागोजी भट्टांच्या मते, अशुद्धीचा अर्थ पाप आणि तमोगुण होय. अणिमा, महिमा, लघिमा इत्यादी शरीरसंबंधी सिद्धी आहेत.

अणिमा म्हणजे अणुभाव अर्थात् शरीर सूक्ष्म करण्याचे सामर्थ्य, लघिमा म्हणजे शरीर हलके करण्याचे सामर्थ्य प्राप्त, गरिमा म्हणजे शरीर जड करण्याचे सामर्थ्य, महिमा म्हणजे शरीराचा आकार मोठा करण्याचे सामर्थ्य, प्राप्ती म्हणजे अत्यंत दूर असलेल्या वस्तूंना जवळ आणण्याचे सामर्थ्य, प्राकाम्य सिद्धीने इच्छापूर्तीचे सामर्थ्य, वशित्व म्हणजे प्राणिमात्र आणि भौतिक पदार्थांना वश करण्याचे सामर्थ्य आणि ईशित्व म्हणजे संकल्प सिद्धी होय. दूरचा शब्द ऐकू येणे व दूरचे पाहण्याची शक्ती प्राप्त होणे इत्यादी इंद्रियसंबंधी सिद्धी होत.

स्वाध्याय : स्वाध्याय म्हणजे मोक्षविषयक शास्त्राचे अध्ययन करणे अथवा ओंकाराचा (प्रणवाचा) जप करणे (व्यासभाष्य २.३२). मंत्राचा जप केल्यावर अनुष्ठान पूर्ण झाले असता योग्याला इष्टदेवता प्रसन्न होते व त्याला तिचा साक्षात्कार होतो (योगसूत्र २.४४).

ईश्वरप्रणिधान : ईश्वरप्रणिधान (ईश्वरभक्ती) म्हणजे सर्व लौकिक व वैदिक कर्मांचे फळ परमेश्वराचे ठिकाणी समर्पण करणे होय (व्यासभाष्य २.३२). ईश्वरप्रणिधानाने आत्मसाक्षात्कार होतो व साधनेतील सर्व विघ्ने दूर होतात (योगसूत्र १.२९).

विज्ञानभिक्षु ईश्वरप्रणिधानाची संकल्पना स्पष्ट करताना असे म्हणतात की, नियमांमध्ये वर्णिलेल्या ईश्वरप्रणिधान या संकल्पनेत ईश्वराला सर्व कर्मे अर्पण करण्यावर भर आहे. ध्यानावर नाही. कारण ईश्वरप्रणिधान हे नियमात समाविष्ट असल्याने बहिरंग योगामध्ये गणले जाते तर ईश्वरावरील ध्यान हा अंतरंग योग आहे. ईश्वरप्रणिधानाने समाधीची सिद्धी होते (योगसूत्र २.४५). व्यास असे म्हणतात की, समाधी सिद्धी म्हणजे समाधीतून मिळणारी प्रज्ञा. जिच्यामुळे योग्याला अन्य देशातील, अन्य देहातील व अन्य काळातील जे विषय जाणण्याची इच्छा आहे, त्या सर्व विषयांचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. (व्यासभाष्य २.४५).

योगविषयक अन्य ग्रंथांमध्ये नियमांची संख्या आणि कशाला नियम म्हणावे याविषयी मतभिन्नता आढळते. मण्डलब्राह्मण उपनिषदात (१.१.४) गुरुभक्ती, सत्यावरील प्रेम, विनासायास मिळालेल्या वस्तूचा अनुभव घेणे व त्या वस्तूच्या अनुभवाने संतुष्ट होणे, अनासक्ती, एकांतवास, विषयांपासून मन निवृत्त होणे, फळाची अपेक्षा न करणे आणि वैराग्य हे नियम सांगितले आहेत. जाबालदर्शन उपनिषदामध्ये (२.१) तप, संतोष, आस्तिकता, दान, ईश्वरपूजन, कुकर्माची लाज, जप, सद्बुद्धी, व्रत आणि ग्रंथात सांगितलेल्या सिद्धांताचे श्रवण करणे हे नियम सांगितले आहेत.

तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांना क्रियायोग अशी संज्ञा आहे. यम आणि नियम नैतिक तसेच अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रमाणभूत तत्त्वे होत. यम-नियमांचे पालन हे केवळ योगाच्या साधकांसाठीच नाही, तर सर्वच माणसांसाठी सदैव गरजेचे आहे.

पहा : ईश्वरप्रणिधान; योगदर्शन; योगसूत्रे; व्यासभाष्य.

                                                                                                                                                                                                         समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर