मंत्रसाधनेद्वारे अंतिम सत्याची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे मंत्रयोग होय. नाम व रूप याद्वारे व्यक्त होणाऱ्या शब्द आणि भाव यांवर चित्त एकाग्र झाल्याने जो योग साध्य होतो त्याला मंत्रयोग म्हणतात, अशी व्याख्या मंत्रयोग संहितेमध्ये आढळते – नामरूपात्मनोश्शब्दभावयोरवलम्बनात् | यो योग: साध्यते सोऽयं मन्त्रयोग: प्रकीर्तित: || (१.४) योगशिखोपनिषदानुसार (१.१३०-१३२) श्वास घेताना ‘हं’ आणि सोडताना ‘स’ असा ध्वनी उत्पन्न होतो. त्यामुळे प्रत्येक जीव अजाणता ‘हंस हंस’ या मंत्राचा जप करीत असतो; परंतु गुरूच्या उपदेशाने सुषुम्णा नाडीतून प्राणवहन होत असताना अक्षरांच्या क्रमामध्ये व्यतिरेक होऊन हा जप ‘सोऽहम् सोऽहम्’ असा होऊ लागतो, यालाच मंत्रयोग असे म्हणतात.

मंत्र म्हणजे केवळ अक्षरांचा संयोग नाही, तर वर्णांच्या उच्चारणाद्वारे निर्माण होणाऱ्या स्पंदनातून विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य उत्पन्न करण्याची योग्यता असणारा मातृकांचा समूह होय. ज्याप्रमाणे उपनिषदांमध्ये संपूर्ण जगत् ब्रह्मतत्त्वापासून उत्पन्न झाले आहे असे प्रतिपादन आहे, त्याप्रमाणे सर्व वर्ण ॐकारापासून उत्पन्न होतात असे योगशास्त्र मानते. त्यामुळे ॐकाराला मूलमंत्र मानले जाते. बारा वर्षांपर्यंत मंत्राचे उच्चारण करणाऱ्या साधकाला क्रमश: त्या मंत्राद्वारे विशिष्ट योग्यता अथवा ज्ञान प्राप्त होते, असे योगतत्त्वोपनिषदात (२१-२२) म्हटले आहे. कोणताही सामान्य साधक मंत्रयोगाची उपासना करू शकतो. मंत्रयोगामध्ये केली जाणारी साधना पाच तत्त्वांच्या भेदाने पाच प्रकारची असते, त्यामुळे मंत्रयोगाला पंचोपासना असेही म्हणतात.

मंत्रयोगानुसार मंत्राचा जप तीन प्रकारे करता येतो – मंत्राचे मोठ्याने उच्चारण केल्यास त्याला व्यक्त किंवा वाचिक जप म्हणतात. मंत्र दुसऱ्याला ऐकू जाणार नाही अशा पद्धतीने पुटपुटल्यास त्याला उपांशु जप म्हणतात. मंत्राचा शांतपणे मनातच जप केला असता त्याला मानस जप म्हणतात. जाबालदर्शन  उपनिषदात (२.१४) वाचिक जपाचे उपांशु आणि व्यक्त, तर मानस जपाचे मनन व ध्यानरूप असे दोन भेद सांगितले आहेत – वाचिकोपांशुरुच्चैश्च द्विविध: परिकीर्तित:| मनसो मननध्यानभेदाद् द्वैविध्यमाश्रित: || व्यक्त जपाने आधिभौतिक, उपांशु जपाने आधिदैविक आणि मानस जपाने आध्यात्मिक प्रतिबंध नष्ट होतात. व्यक्त जप हा वैखरी, उपांशु जप हा मध्यमा, मानस जप हा पश्यंती वाणीद्वारे केला जातो आणि त्यापेक्षाही सूक्ष्म होणारा जप परा वाणीद्वारे होतो ज्याद्वारे योग्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो.

महर्षी पतंजलींनी कैवल्य पादाच्या प्रथम सूत्रात सिद्धी प्राप्त करण्याच्या पाच उपायांपैकी एक उपाय म्हणून मंत्राचा उल्लेख केला आहे–जन्मौषधिमन्त्रतप:समाधिजा: सिद्धय: |योगसूत्रात मंत्रयोग ही संज्ञा आढळत नसली तरी ‘तज्जपस्तदर्थभावनम्’ (१.२८) या सूत्राद्वारे मंत्रजपाची साधना सांगितलेली आहे. ॐकाराचा जप आणि ईश्वराचे ध्यान केल्याने समाधी प्राप्त होते.

मंत्रयोगाचे दोन प्रकार आहेत – शक्त्युपाय-योग आणि शाम्भवोपाय-योग. शक्त्युपाय-योगात प्रामुख्याने इष्टदेवतेच्या प्रतीकांची उपासना केली जाते, तर शाम्भवोपाय-योगात निर्गुण उपासनेला महत्त्व दिले जाते. मंत्रयोग-संहितेनुसार मंत्रयोगाची सोळा अंगे आहेत – भक्ती, शुद्धी, आसन, पंचांग सेवन (गीता, सहस्रनाम, स्तव, कवच आणि हृदय यांचे पठन), आचार, धारणा, दिव्यदेश-सेवन (धारणेची आलंबने), प्राणक्रिया, मुद्रा, तर्पण, हवन, बली, याग, जप, ध्यान आणि समाधी. मंत्राची सिद्धी झाल्यावर ज्यावेळी ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीचा लय होतो आणि साधकाचे मन ध्येय स्वरूप इष्टदेवतेवर एकाग्र होते, त्यावेळी साधकाला समाधी प्राप्त होते. मंत्रयोगाद्वारे मिळवलेल्या समाधीला महाभाव समाधी म्हटले जाते. महाभाव समाधी हे मंत्रयोगाचे अंतिम लक्ष्य आहे.

पहा : जप, ध्यान, मंत्र.

संदर्भ :

  • Ayyaṅgār, Srīnivāsa T. R., Tr. The Yoga-Upaniṣad-s, Madras, 1938.
  • Rai, Ramkumar, Tr. Mantra-yoga Saṃhita, Varanasi, 1982.
  • श्री योगेश्वरानंदतीर्थ, मंत्रशास्त्र, मुंबई, १९७०.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर