प्रतिष्ठान : मराठी साहित्यातील वाङ्मयीन मासिक. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर परिषदेच्या कार्यासंबंधी काही ठराव मंजूर करतेवेळी परिषदेचे एक मुखपत्र असावे असे सप्टेंबर १९४३ मध्ये ठरले; परंतु प्रत्यक्षात प्रतिष्ठानचा अंक निघायला सप्टेंबर १९५३ साल उजडावे लागले. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर प्रतिष्ठानचा पहिला अंक हैद्राबाद येथून निघाला. उस्मानिया विद्यापीठातील प्राध्यापक व लोकसाहित्याचे अभ्यासक नारायणराव नांदापूरकर यांच्या संपादकत्वाखाली एक संपादक मंडळ नेमण्यात आले होते. सप्टेंबर १९५३ पासून ऑगस्ट १९५७ पर्यंत प्रतिष्ठान  हैदराबादहूनच प्रसिद्ध होत होते.

१९५६ मघ्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर हैद्राबाद संस्थापासून मराठवाडा स्वतंत्र होऊन महाराष्ट्राचा भाग बनला. त्यानंतर सप्टें. १९५७ ला परिषदेचे कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित झाले. तेव्हापासून प्रतिष्ठान औरंगाबाद येथून प्रकाशित होऊ लागले. येथे एक नवे संपादक मंडळ नेमण्यात आले. तु. शं. कुलकर्णी कार्यकारी संपादक आणि न. मा. कुलकर्णी ,म. भि. चिटणीस, अनंत भालेराव आणि  भगवंत देशमुख यांचा संपादक मंडळात समावेश होता. औरंगाबाद येथे तु. शं. कुलकर्णी यांनी सलग सात वर्षे व त्यानंतर सुधीर रसाळ यांनी दहा वर्षे सलगपणे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘मुखपत्र’ म्हणून काम करत असताना परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून प्रतिष्ठान ने आपली वाङ्मयीन वाटचाल केलेली आहे.

मराठी साहित्य व संस्कृतीचे संवर्धन करणे, वाचकांची साहित्याची व कलेची जाणीव, समज वाढवणे, अभिरुची समंजस, सम्यक व सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करणे, ऐतिहासिक, संशोधनात्मक लेखनावर भर देऊन लेखन प्रसिद्ध करणे, साहित्यातील बदलत्या प्रवाहांची दखल घेऊन त्याला न्याय देणे, विविध वाङ्मयीन प्रश्नांसाठी एक मोकळे वाङ्मयीन सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करणे, ग्रामीण आणि नगरीय क्षेत्रातील लेखकांना लिहिते करणे, मराठवाड्यातील नवतरुण लेखकांना व्यासपीठ असावे या गरजेतून प्रतिष्ठान  सुरू केले व त्याला अनुषंगून केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लेखकांचे लेखन प्रतिष्ठानने प्रकाशित केले.

क्रोचेची कलामीमांसा (लेखक ,के.रं.शिरवाडकर), सौंदर्याचे व्याकरण (लेखक ,सुरेंद्र बारलिंगे), रिचर्डसची कलामीमांसा, रंगशाळा  (लेखक,नरहर कुरुंदकर) अशा अनेक पुस्तकांचे भागनिहाय प्रथम प्रकाशन प्रतिष्ठानमध्ये करण्यात आले. दलित साहित्याचे आणि स्त्रीवादी विचारांचे लेखनही या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या नियतकालिकाचा आणखी एक विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी हिंदीतील अनेक महत्त्वाच्या कवींचा व त्यांच्या काव्याचा मराठी वाचकांना परिचय करून दिला आहे.

नारायणराव नांदापूरकर, सेतुमाधवराव पगडी, वा. ल. कुलकर्णीं, यू. म. पठाण, श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, वसंत शहाणे, दया पवार आणि जनार्दन वाघमारे, भा. रं. कुलकर्णी, ना. गो. कालेलकर, ना. गो. नांदापूरकर, देवीसिंग चौहान, अशोक केळकर इत्यादी मराठी साहित्यातील नामवंत लेखकांनी प्रतिष्ठान मध्ये लेखन केले आहे. ना. गो. नांदापूरकर, दा. गो. देशपांडे, भगवंत देशमुख, तु. शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ, महावीर जोंधळे, नागनाथ कोत्तापल्ले, बाळकृष्ण कवठेकर, प्रकाश मेदककर, रवींद्र किंबहुने, लक्ष्मीकांत तांबोळी आणि श्रीधर नांदेडकर यांनी प्रतिष्ठानचे संपादक पद भूषविले आहे. सांप्रत आसाराम लोमटे या नियतकालिकांचे संपादक आहेत.

संदर्भ :

  •  मोरे, संगीता व्यंकटराव, प्रतिष्ठानचे वाङ्मयीन कार्य, मैत्री प्रकाशन, लातूर, २०१०.
  •  मोरे, संगीता व्यंकटराव,  प्रतिष्ठानची सूची, मैत्री प्रकाशन, लातूर, २०११.

समीक्षक : दत्ता घोलप