तालीम, बाळाजी वसंत : (? १८८८- २५ डिसेंबर १९७०). विख्यात भारतीय शिल्पकार. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील निजाम संस्थानात एक मान्यवर बांधकाम कंत्राटदार होते. बाळाजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची आई आपल्या तीन मुलांसह मुंबईत स्थायिक झाली.

बाळाजी यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांची कलेची आवड लक्षात घेऊन विख्यात व्यक्तिचित्रकार ए. एक्स. त्रिंदाद यांनी त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. अल्पावधीतच शिल्पकला विभागातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. जे. जे. मध्ये शिकत असतानाच बाळाजी यांना ‘डॉली करसेटजीʼ पारितोषिक, तसेच १९११ मध्ये लॉर्ड व्हॉइसरॉयचे ‘लॉर्ड मेयो पदकʼ मिळाले. शिल्पकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर १९१८ मध्ये त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या तालीम आर्ट स्टुडिओची स्थापना केली.

दादाभाई नवरोजी (ब्राँझ).

बाळाजी स्वप्रतिभेने उत्कृष्ट शिल्पनिर्मिती करीत. त्यामुळे तत्कालीन श्रीमंत, धनिक यांच्याकडून त्यांना कामे मिळू लागली. त्यांचा विवाह सुमती डेरे यांच्याशी झाला. त्यांच्या कामात पत्नीची साथ त्यांना मिळू लागली. बाळाजी त्या वेळी खेतवाडीला दादाभाई नवरोजी यांच्या घराजवळच राहात होते. दादाभाई यांचा मुलगा व बाळाजी एकाच वर्गात शिकत. बाळाजींना दादाभाई यांचे शिल्प साकारण्याची इच्छा होतीच. ती संधी त्यांना १९१४ मध्ये मिळाली आणि दादाभाई यांचे अर्धाकृती शिल्प त्यांनी बनविले. त्यांनतर १९२६ मध्ये दादाभाईंचे पूर्णाकृती शिल्प तयार करण्याचे कामही त्यांनाच मिळाले. ब्राँझ माध्यमातील हे स्मारकशिल्प आजही दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौकात सर्वांचे लक्ष वेधून घेते. खुर्चीत बसण्याची दादाभाईंची रीत, त्यांचा विचारमग्न चेहरा, पारशी टोपी, चष्मा, दाढी, त्यांनी परिधान केलेला पायघोळ अंगरखा व त्याच्या चुण्या हे सर्व खूपच वैशिष्ट्यपूर्ण व लक्षवेधक आहे. मुळात ब्राँझमधील या शिल्पाला घोटून गुळगुळीत न केल्याने व मातीचा खडबडीतपणा तसाच ठेवल्याने या शिल्पात विशिष्ट प्रकारचा पोत साधला आहे. त्यातून एक उत्स्फूर्त देशभक्त व्यक्तिमत्त्व त्यांनी प्रभावीपणे साकारले आहे. त्यामुळे हे शिल्प अधिक जिवंत वाटते. हे स्मारकशिल्प असल्याने त्याच्या चौफेर असलेल्या चित्रचौकटीवर (Panel) सामाजिक संदेश देणारी उत्थित शिल्पेही कोरली आहेत.

दरिद्रीनारायण (ब्राँझ)

कोणत्याही माध्यमात शिल्पनिर्मिती करण्याच्या बाळाजी यांच्या सामर्थ्यामुळे त्यांना भरपूर कामे मिळू लागली. संगमरवरमध्ये साकारलेली जस्टिस जेकिन्स, रावबहाद्दूर पेत्तीयार, महात्मा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ब्राँझमधील रामकृष्ण परमहंस इत्यादी त्यांची नामांकित व्यक्तिशिल्पे.

बॉय प्लेइंग मार्बल

याबरोबरच बाळाजी यांच्या जनसामान्यांच्या व्यक्तिरेखाही विशेषकरून गाजल्या. त्यांपैकी काही उत्कृष्ट व्यक्तिरेखा पुढीलप्रमाणे : सूत कातणारी महाराष्ट्रीयन स्त्री टकळी, स्वतःच्याच अंगावरचा फाटका अंगरखा शिवणारा दरिद्रीनारायण (ब्राँझ), गोट्या खेळणारा मुलगा (बॉय प्लेइंग मार्बल), नागाला पुंगीच्या तालावर नाचवणारा गारुडी (स्नेक चार्मर), एकतारीवर भजन गाणारा एकतारी, अंध फकीर, भिकारी आणि त्याचा मुलगा (बेगर अँड हिज सन). या त्यांच्या शिल्पनिर्मितीला वेगळे कलात्मक मूल्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या मते, स्वान्तःसुखाय केलेल्या शिल्पनिर्मितीमध्ये शिल्पकार बांधील नसतो, तर तो स्वतंत्र असतो आणि अशाच वेळी तो उच्च कोटीची कलानिर्मिती करू शकतो.

बाळाजी यांनी साकारलेल्या वरील सर्व शिल्पांमध्ये एक केंद्रबिंदू आहे. शिल्पाचा आस्वाद घेणारा प्रेक्षक ज्या बिंदूपासून सुरुवात करतो, पुन्हा त्याच बिंदूपाशी येऊन पोहोचतो. उदा.,  टकळीमध्ये स्त्रीने धरलेल्या सुताच्या टोकापासून सुरुवात होते. तिची शरीरबांधणी, बसण्याची ढब, तिरपी मान, तिचे वस्त्र

एकतारी

यांच्यावरून नजर फिरत पुन्हा तिच्या उंचावलेल्या हाताच्या टोकापर्यंत ती जाऊन पोहोचते. दरिद्रीनारायणमधील गरीब त्याचा अंगरखा त्याची दृष्टी अगदी मंद असल्याने वाकून शिवत आहे. यात त्याच्या चेहऱ्यावरचे करुणभाव व अगतिकता अगदी हुबेहूब प्रत्ययास येते. त्यांनी निर्माण केलेल्या जनसामान्यांच्या शिल्पांमधून विशेषेकरून भारतीय सत्त्व असलेला गाभा प्रतीत होतो. उदा., गोट्या खेळणे, सूत कातणे, फाटका कपडा शिवणे, नाग खेळवणे इत्यादी. टकळी या शिल्पाला तर गांधीजींच्या विचारांचे तत्कालीन राजकीय संदर्भ लाभल्याने त्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत जाते. म्हणूनच बाळाजी यांची शिल्पे नुसती शिल्पे राहात नाहीत, तर विविध सामाजिक स्तर दर्शवणारी, विविध वयोगटांतील व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवणारी भारतीय संस्कृतीची ती प्रतीके ठरतात. यांव्यतिरिक्त त्यांनी एलिफंटा येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती-शिल्पाच्या डागडुजीचे कामही केले. १९२८ पासून ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिकविण्यास जात. त्यांनी डी. के. गोरेगावकर, व्ही. आर. कामत यांसारख्या विद्यार्थ्यांना तयार केले, जे पुढील काळात नामांकित शिल्पकार म्हणून प्रसिद्ध पावले. बाळाजी यांचे सुपुत्र हरीश तालीम यांनीही निरनिराळ्या प्रकारची शिल्पनिर्मिती केली आहे.

बाळाजी यांच्या बेगर अँड हिज सन या शिल्पाला १९२३ सालचे, तर टकळी या शिल्पाला १९३२ सालचे बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक प्राप्त झाले.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • बहुळकर, सुहास; घारे, दीपक संपा., दृश्यकला – शिल्पकार चरित्रकोश, हिंदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई, २०१३.
  • घारे, दीपक, प्रतिभावंत शिल्पकार, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१७.

This Post Has One Comment

  1. दीपक मनोरमा परशुराम वार्डे

    अत्यंत उद्बोधक माहिती, धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा