छोटा गंधर्व : (१० मार्च १९१८– ३१ डिसेंबर १९९७). मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानेही परिचित. संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळे या गावी. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागर आणि त्यांचा धाकटा भाऊ पितांबर यांना आपल्या मंडळीत आणले. ‘बालमोहन संगीत मंडळी’ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका वयाच्या १० व्या वर्षी मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात हा प्रयोग झाला (२२ जुलै १९२८). सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करण्यास सुरुवात केली आणि नंतर हेच नाव रूढ झाले. ‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, ह्या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून पसंती मिळत असे. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी सौदागरांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. बळवंत गोवित्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक गणेशबुवा पाध्ये ह्यांनी त्यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोरे, अब्दुल करीमखाँ, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव व संस्कार लाभल्यामुळे जेथे जे चांगले गवसेल, ते घेऊन आपल्या स्वत:च्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आले.

नाटकाच्या व्यवसायाला १९३२-३३ च्या सुमारास वाईट दिवस आले होते आणि ‘बालमोहन संगीत मंडळी’लाही ह्या परिस्थितीची झळ लागली होती. तथापि आचार्य अत्र्यांसारखा प्रभावी नाटककार ह्या संस्थेच्या मागे उभा राहिल्यामुळे ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचे पहिले नाटक साष्टांग नमस्कार बालमोहनने १९३३ साली रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची -त्रिपुरीची- भूमिका केली. त्यानंतरच्या घराबाहेर (प्रथम प्रयोग-१९३४) ह्या अत्रेकृत नाटकातील पद्मनाभाच्या भूमिकेपासून त्यांनी स्त्रीभूमिका करणे सोडून देऊन नायकाच्या भूमिका करावयास आरंभ केला. साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी (१९३६), उद्याचा संसार (१९३६), वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके ‘बालमोहन’ने रंगभूमीवर आणली. ह्यात संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा मोठा होता. तथापि मी उभा आहे ह्या नाटकानंतर अत्रे अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळे ‘बालमोहन’चा एक मोठा आधार तुटला आणि संस्था चालवणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. त्यामुळे ‘बालमोहन’मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये ‘कला-विकास’ ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. ह्या संस्थेतर्फे नाटककार नागेश जोशी ह्यांची फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यांतील मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही सौदागर यांनी सांभाळली. ह्या संस्थेच्या नाटकांची पदेही देवमाणूस पासून सौदागर स्वत: लिहू लागले. ह्या नाटकातील ‘चांद माझा हा हसरा’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले. ‘कला-विकास’ ही कालांतराने बंद पडल्यानंतर ‘भारत नाट्यकला’ ह्या संस्थेच्या सौभद्र (कृष्ण), विद्याहरण (कच), मानापमान (धैर्यधर) ह्या नाटकांतून त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. १९५१ नंतर ते ठेकेदारांनी करविलेल्या नाट्यप्रयोगांतून मानधनावर कामे करू लागले. त्या काळात छोटा गंधर्व संगीत नाटकांकरिता सर्वांधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक गायक नट होते. विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला (प्रथम प्रयोग-१० ऑक्टोबर १९६०) ह्या नाटकात त्यांनी काम केले होते आणि त्यातील पदांना संगीतही दिले होते. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ ह्या नाटकांतूनच त्यांनी पंचविसांहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या. १९७८ मध्ये त्यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.

सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणे ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे ‘स्वरराज छोटा गंधर्व’ हे नामाभिधानही त्यांना लाभले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी संजोग, गुणिकंस, नंदबसंत, कौशी बहार, बसंती, शंकरा यासारख्या नवीन रागांच्या संकल्पना केल्या. ‘गुनरंग’ या नावाने त्यांनी बंदिशी लिहिल्या. शृंगार, सृष्टीवर्णन, ईशस्तुती, अध्यात्म असे विविध विषय त्यांच्या चिजांत आढळतात.

नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातील सर्व प्रकारचे सौंदर्य नेमकेपणाने टिपता आले पाहिजे. नाटकातील पदाचा आरंभ आणि त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे. नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये प्रेक्षकांच्या अंत:करणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्या, अशी त्यांची मते होती.

छोटा गंधर्व यांच्याबरोबर संशयकल्लोळमध्ये रेवतीची भूमिका करणाऱ्या इंदू तुळपुळे ह्यांच्याशी त्यांनी १९३७ साली विवाह केला. सुलभा सौदागर या त्यांच्या कन्या.

मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.

छोटा गंधर्व यांचे पुणे येथे निधन झाले.

संदर्भ :

  • जठार, प्रभाकर, स्वरसौहार्द, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

https://www.youtube.com/watch?v=2xiZvQqDqYc

समीक्षक : श्रीकांत डिग्रजकर