महाराष्ट्र ग्रंथ भांडार : ( स्थापना : १९३५.) कोल्हापूर संस्थानातील राष्ट्रीय विचाराच्या आणि स्वतंत्र प्रबोधनाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे आणि विक्रीचे पहिले दुकान. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गोविंद वामन तथा दादा कुलकर्णी ह्यांनी कोल्हापूर येथे महाद्वार रोडवर महाराष्ट्र ग्रंथ भांडार ची स्थापना केली. दादांचे मूळ गाव मौजे तिटवे (ता. राधानगरी, जि.कोल्हापूर). वडील कुलकर्णी पदावर कार्यरत होते. शिक्षणासाठी दादा कोल्हापूरला आले. तेथे सरकारी राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेज येथे शिकले. समर्थ रामदासांप्रमाणे समाजसेवेच्या उद्देशाने गृहत्याग करून ते साताऱ्याजवळच्या मसुरकर महाराजांच्या आश्रमात दाखल झाले. तेथे रामदास स्वामींच्या समर्थ संप्रदायाच्या विचारांशी त्यांचा परिचय  झाला आणि देशाभिमान, देशप्रेम आणि शरीरसंपदेचे खोलवर संस्कार त्यांच्यावर झाले. निसर्गोपचारांचे आणि योगासनांचे शिक्षण मिळाले आणि सरावही सुरू झाला. ह्या काळात ब्र.मामा क्षीरसागर, श्रद्धेय बाबा रेडीकर, व्रती आनंदमूर्ती डिग्रजकर हे त्यांचे सहकारी होते. मसुरकर महाराजांच्या आश्रमातील वास्तव्यानंतर महाराष्ट्रात भटकंती करीत ते पुण्यात दाखल झाले. तेथे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आचार्य शंकरराव देव ह्यांच्या संपर्कात आल्यावर आचार्य देवांचे खाजगी सचिव म्हणून त्यांचे काम सुरू झाले. दादांच्या विचारसरणीच्या जडण-घडणीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरला. महाराष्ट्रात  देशभक्ती, गांधीवाद ह्यांचा प्रचार व सामाजिक प्रबोधनही व्हावे ह्या दृष्टिकोनातून उपरोक्त तिघा आचार्यांनी पुणे येथे सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेची स्थापना करून ग्रंथांद्वारे गांधीविचार जनमानसात पोहोचविण्याची योजना आखली. तिचे व्यवस्थापक म्हणून दादा कुलकर्णी ह्यांची निवड करण्यात आली. कोकण गांधी प.पू. आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनी भाषांतरित केलेले म. गाधींचे माझे सत्याचे प्रयोग  हे ह्या ग्रंथमालेचे पहिले पुस्तक होते. तेव्हा महात्मा गांधींचे कार्यकर्ते  पुण्यामध्ये घरोघरी जाऊन आत्मकथा आणि खादीवस्त्रांचा प्रसार करीत होते. ह्या सर्व कामांतून आणि सहका-यांकडून दादांना समाजकारणाची आणि चळवळीची प्रेरणा मिळाली. लो. टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व गांधीजींच्याकडे आले. सामाजिक कार्यात सामान्य माणसालाही यथाशक्ती आर्थिक योगदान देणे शक्य व्हावे म्हणून म. गांधींनी  एक पैसा फंड  उभा केला. तोच आदर्श समोर ठेवून, लोकांमध्ये वाचनाची आवड आणि सवय निर्माण होऊन त्यातून त्यांना प्रबोधनाचे महत्त्व कळावे व समाजामध्ये वैचारिक जागृती व्हावी ह्या व्यापक उद्देशाने दादांनी कोल्हापुरात महाराष्ट्र एक पैसा वाचनालय  सुरू केले. कालांतराने त्यातून त्यांनी महाराष्ट्र ग्रंथ भांडार  ह्या प्रकाशन संस्थेची स्थापना केली. कोल्हापूर-सांगली परिसरातील तरुण लेखकांना प्रोत्साहन देऊन त्यांची पुस्तके त्यांनी प्रकाशित करायला सुरुवात केली. ह्यांमध्ये आ.जावडेकर, आ.कालेलकर, भाई माधवराव बागल, नामदेव व्हटकर, ग.आ. लाड ह्यांचा समावेश होतो. राजाराम हायस्कूलमध्ये असताना ती. दादा संस्कृतचे स्कॉलर होते. संस्कृतच्या प्रेमामुळे ते पं. श्रीपादशास्त्री जेरे ह्यांच्याकडे काही काळ आचार्य शंकराचार्यांच्या भाष्याचे निरुपण ऐकण्यास जात असत. कदाचित त्यामुळेच आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलचे शिक्षक गजानन बाळकृष्ण दंडगे ह्यांच्या प्रेरणेने पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्राध्याय, श्री शिवमहिम्न स्तोत्र अशी वैदिक संस्कृत स्तोत्रांची-पदच्छेदासह मराठी पुस्तकांची- सुबोध मालिकाही त्यांनी प्रकाशित  केली . ह्याच वेळी वैचारिक प्रबोधनाबरोबरच संसारी स्त्रियांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांना लिहित्या करण्याचे कामही त्यांनी केले आणि कुमुदिनी रांगणेकर, मालतीबाई दांडेकर, सुमती क्षेत्रमाडे ह्यांची पुस्तके प्रकाशित केली. साहित्यगुणांनी पुढच्या काळात प्रथितयश पावलेल्या अनेक लेखकांची पहिली पुस्तके महाराष्ट्र ग्रंथ भांडार ने प्रकाशित करून त्यांची प्रतिभा समाजाभिमुख केली. ह्या काळातील बा.भ.बोरकरांची मावळता चंद्र , रणजित देसाईंची रूपमहल,  प्रा.मु.गो. देशपांडे ह्यांचे पाश्चात्य प्रतिभा , तसेच प्रा. द.गो. दसनूरकर लिखित आपले महाभारत हा दहा खंडांचा ग्रंथ ही महाराष्ट्र ग्रंथ भांडारची महत्त्वाची प्रकाशने होत. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी कॉलेजशिक्षणात मराठी माध्यमाचा प्रथम प्रवेश झाला, त्यावेळी मराठी माध्यमातील अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, भूगोल ह्या विषयांची कॉलेज-अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध नव्हती. ती महाराष्ट्र ग्रंथ भांडाराने प्रकाशित केली. ह्याच काळात पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार ह्यांनी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे संपूर्ण भारतभरातील विषयवार पुस्तके आणून देण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने व खात्रीने महाराष्ट्र ग्रंथ भांडारवर टाकली आणि त्यांनी ती उत्कृष्टरित्या निभावून विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे कोल्हापूर संस्थानामध्ये छ. शाहू महाराजांनी सुरू केलेला शिक्षणाचा प्रवाह पुढे वाहता ठेवण्याचे काम काही अंशी वैयक्तिक स्तरावर दादा कुलकर्णी ह्यांनी महाराष्ट्र भांडारच्या माध्यमातून केले. गो.वा.उर्फ दादा कुलकर्णी ह्यांचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्र ग्रंथ भांडार ची आणि प्रकाशन संस्थेची जबाबदारी त्यांचे चिरंजीव शशिकांत कुलकर्णी सांभाळत आहेत. मूल्यजपणुकीची परंपरा कायम ठेवत तेही अनेक शैक्षणिक, आध्यात्मिक व समाजप्रबोधनाच्या पुस्तकांची निर्मिती आणि विक्री करत आहेत. प.पू.डोंगरे महाराजांची भागवतावरील आशयघन प्रवचने म्हणजेच श्रीमद्भागवतरहस्य  हा ह्या काळातील सर्वमान्य मौलिक ग्रंथ हे त्यांचे महत्त्वाचे प्रकाशन. आधुनिक काळात केवळ प्रवाहपतित होण्यात धन्यता न मानता पूर्वापार, वडिलांपासून चालत आलेल्या उदात्त तत्त्वांचे,  शिक्षणप्रसाराचे उद्दिष्ट आणि समाजाप्रती कृतज्ञता जपत आजही सर्व जिज्ञासू ग्राहकांचे समाधान येथे प्रामाणिकपणे केले जात आहे.  प्रथमपासूनच  महाराष्ट्र ग्रंथ भांडार हा कधीच व्यक्तिगत उदरनिर्वाहाचा व्यवसाय नव्हता आणि आजही नाही.  संत ज्ञानेश्वर, छ. शिवाजी महाराज , समर्थ रामदास  आणि  छ. शाहू महाराज ह्यांनी महाराष्ट्रात समाजजागृती करून मराठी माणसाला आत्मभान दिले, त्याच्यावर समतेचे व शिक्षणाचे  संस्कार केले. त्यानंतर म. गांधींच्या प्रेरणेने नवतरुणांनी गांधीविचारांना कृतीची जोड दिली.  महाराष्ट्र ग्रंथ भांडार  हा त्याचेच एक उदाहरण आहे.

संदर्भ : क्षेत्र संशोधन