एक योगउपनिषद्. ऋग्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात नादाचे वेगवेगळे प्रकार सांगून नादानुसंधान साधनेचे स्वरूप स्पष्ट केले गेले आहे.
ॐकारावर हंसाचे रूपक करून त्याच्या विविध अंगोपांगांचे वर्णन यात केले आहे. ‘अकार’ हा या ॐकाररूपी हंसाचा उजवा पंख, तर ‘उकार’ हा डावा पंख आहे. ‘मकार’ हे त्याचे शेपूट असून उरलेली अर्धी मात्रा हा त्याच्या मस्तकाचा भाग आहे. हंसाचे शरीर त्रिगुणात्मक मानले आहे. धर्म त्याचा उजवा डोळा, तर अधर्म डावा डोळा सांगितला आहे. त्याच्या शरीराच्या निरनिराळ्या भागात भूलोक, अंतरिक्ष इत्यादी निरनिराळे लोक कल्पिले आहेत. अशा प्रणवरूपी हंसाचे अनुसंधान ठेवणे म्हणजे हंसयोग होय. हंसयोग जाणणाऱ्या योग्याला कधीही पापाचे फळ प्राप्त होत नाही असे यात सांगितले आहे.
यापुढे प्रणवाच्या अकार, उकार, मकार आणि अर्धी मात्रा या चार मात्रांचे वर्णन केले आहे. अकारस्वरूप मात्रा अग्नी तत्त्वाशी, उकारस्वरूप मात्रा वायूशी, मकारस्वरूप मात्रा सूर्यमंडलाशी, तर या तिन्ही मात्रांच्या पलीकडची अर्धमात्रा ही वरुणाशी संबंधित आहे.
यानंतर निर्विशेष ब्रह्माचे स्वरूप आणि त्याच्या ज्ञानाचे फळ यांची माहिती दिली आहे. अतींद्रिय, गुणातीत आणि निर्गुण असे हे ब्रह्म सूर्यादि प्रकाशमान वस्तूचे कारण आहे आणि सदोदित म्हणजे नित्य उदय पावलेले असे आहे. अशा निर्विकल्प ब्रह्मात प्रवेश केल्याने योगी माया आणि मायेने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी यांपासून मुक्त होतो आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन कृतकृत्य होतो.
यानंतर या उपनिषदात ज्ञानी माणसांच्या प्रारब्ध कर्माचे अस्तित्व आणि अभाव यांची चर्चा केली आहे. आत्मज्ञान होऊनसुद्धा योग्याला प्रारब्ध कर्माची फळे भोगावी लागतात. पण त्याला तत्त्वाचे ज्ञान झाल्यावर प्रारब्धच शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे ते उपभोगण्याचा प्रश्न उरत नाही. ब्रह्म किंवा प्रणव यांची साधना केल्याने प्राप्त होणारे हे ज्ञान आत्म्याखेरीज इतर वस्तूंच्या अस्तित्वाचा भ्रम नष्ट करते. परिणामी, मेघ दूर झाले असता स्वत:हून प्रकट होणाऱ्या सूर्याप्रमाणे केवळ आत्मा शिवस्वरूपात शिल्लक राहतो.
तुरीयावस्था प्राप्त होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नादानुसंधानाचे विवेचन पुढे केले आहे. नादाचा अभ्यास हा स्थूलापासून सूक्ष्माकडे जाणारा होतो. समुद्राची गाज, मोराचा आवाज, नगाऱ्याचा आवाज, झऱ्याचा आवाज हे नादानुसंधानाच्या प्राथमिक पातळीवर येणारे आवाज असून मधल्या अवस्थेत मृदुंग, तबला, डग्गा किंवा घंटा यांच्या आवाजाप्रमाणे असलेले आवाज ऐकू येतात. वाढत जाणाऱ्या अभ्यासाने घुंगरू, वीणा, बासरी किंवा भ्रमराच्या आवाजाप्रमाणे सूक्ष्मातिसूक्ष्म होत जाणारे नाद ऐकू येतात. उपनिषद्कार असे म्हणतात की, नादानुसंधानात यांपैकी ज्या नादावर चित्त प्रथम एकाग्र होईल तिथेच स्थिर होऊन चैतन्यात विलीन व्हावे. कारण दुधाशी एकरूप होणाऱ्या पाण्याप्रमाणे मन एकाच नादाच्या ठिकाणी एकरूप केले असता ते सहज चिदाकाशात विलीन होते. नादानुसंधान तत्काळ ब्रह्मप्राप्ती करून देणारे असल्याने सर्व चिंता सोडून, नादानुसंधानाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींबाबत उदासीन राहून साधकांनी मन नादात विलीन करावे.
यानंतर नादाकडे आकृष्ट झालेल्या मनाची तुलना सुवासाची अपेक्षा न करता फुलातील मधाचा आस्वाद घेणाऱ्या भ्रमराशी, आवाजाने आकृष्ट होऊन चपलता सोडून देणाऱ्या भुजंगाशी आणि अंकुशाने ताब्यात आलेल्या मदोन्मत्त हत्तीशी करून मनावर ताबा ठेवण्याचे नादाचे सामर्थ्य विशद केले आहे.
ब्रह्माशी जोडल्या गेलेल्या स्वयंप्रकाशी अशा ओंकाररूप नादाचे वर्णन यापुढे येते. ज्या स्थानी मन नादाशी एकरूप होते ते स्थान विष्णूचे मानले आहे. सशब्द अशा नादाचा लय झाल्यावर नि:शब्द असे परब्रह्म उरते. नादब्रह्माशी तन्मय झालेल्या योग्यांना विदेहमुक्ति मिळते.
असे योगी जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांपासून, सर्व चिंतांपासून मुक्त होतात, त्यांचे देह काष्ठासमान निश्चल होतात. उन्मनी अवस्थेत गेल्याने त्यांना सुख-दु:ख, उष्णता-थंडी इत्यादी जाणवत नाही आणि ते आपल्या मूळ स्वरूपात अर्थात ब्रह्मचैतन्यरूपात जातात. योग्यांच्या या ब्रह्मलीन स्थितीचे वर्णन करून या उपनिषदाची सांगता करण्यात आली आहे.
समीक्षक : कला आचार्य