नेर्व्ही, प्येअर लुईजी : (२१ जून, १८९१ — ९ जानेवारी, १९७९).
इटालियन वास्तुकार व संरचनात्मक अभियंता. प्येअर लुईजी नेर्व्ही यांचा जन्म साँद्रिओ, इटली (Sondrio) येथे झाला. त्यांनी इटलीमधील बोलोन्या (Bologna) येथील सिव्हिल एंजिनिअरिंग स्कूलमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
पदवी मिळाल्यानंतर त्यांनी बोलोन्यामधील सोसायटी ऑफ काँक्रिट कन्स्ट्रक्शन या संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथील नोकरीत असताना पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इटालियन सैन्याच्या कोअर ऑफ एंजिनिअर्स या गटामध्ये काम केले. त्यानंतर केवळ प्रबलित काँक्रिटबाबत (Reinforced Concrete, R.C.C.) संशोधन केले.
पूर्वनिर्मित काँक्रिट आकृतिबंध आणि स्तंभविरहित बांधकाम अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. वास्तुकार (Builder) आणि संरचनात्मक अभियंता (Structural engineer) म्हणून त्यांनी कार्य केले.
फ्लॉरेन्स येथील प्रेक्षागृह (stadium) हा नेर्व्ही यांनी आरेखित केलेला आणि स्वत: बांधलेला महत्त्वाचा प्रकल्प होय (१९३०). प्रबलित काँक्रिटचे गोलाकृती (Curved) निमुळत्या (Tapered) आकाराचे कानाख्त छत (Cantilevered Roof), नाविन्यपूर्ण रचनेचे जिने, संपूर्ण वास्तुनिर्मितीतील सौष्ठव आणि अल्पखर्चिकता ही या कामाची वैशिष्ट्ये होत. त्यानंतर नेर्व्ही यांनी स्तंभरहित विमानघरे (Hangars) आणि भव्य प्रदर्शनगृहे, इमारतींची पुर्नबांधणी आणि कारखाने यांवर संशोधन केले. या बांधकामात प्रबलित काँक्रिटचा वापर निरनिराळ्या पद्धतीने कसा करावा, याच्या संकल्पना त्यांनी मांडल्या. दोन खांबांमध्ये जास्त अंतर ठेवून बनवलेल्या छताकरिता कमानीच्या आकाराच्या प्रबलित काँक्रिटचे पूर्वनिर्मित आकृतिबंध (Ribs) घेतले. हे आकृतिबंध परस्परछेदक (Intersecting) स्वरूपात जोडून त्यांनी अनेक कामे केली. नेर्व्ही यांनी एका नौकापृष्ठभागाचे (Boat Hull) प्रबलित काँक्रिटमध्ये आकृतिबंध तयार करून त्याचे बांधकाम स्वत: केले. त्यांनी पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रिटच्या कामाचे एकस्व (patent) घेतले होते. त्याचप्रमाणे ३०० मीटर मर्यादेच्या घुमटांचे (Vaults) एकस्व घेतले.
प्रत्येक वास्तू ही नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय असावी, हे नेर्व्ही यांचे उद्दिष्ट होते. फेरोसिमेंट हे नवीन तंत्रज्ञान निर्माण करून ते ९४ मीटर उंच अशा प्रदर्शनाच्या सभागृहासाठी वापरले. या तंत्रज्ञानात कमी जाडीच्या काँक्रिटच्या थरामध्ये पोलादाच्या जाड तारा वापरून कोणत्याही आकाराचे भाग तयार करतात आणि त्यातून वजनाने हलकी परंतु टिकाऊ रचना तयार होते. या व्यतिरिक्त प्रबलित काँक्रिटची कमी जाडीची कवच छपरे (Shell Roofs) आणि घुमट यांचीही अनेक आरेखने त्यांनी केली.
नेर्व्ही यांनी केलेली काही महत्त्वपूर्ण आरेखने पुढीलप्रमाणे : पॅरिसमधील युनेस्कोचे मुख्यालय, सॅन फ्रॅन्सिस्कोमधील सेंट मेरीज कॅथिड्रल, रोममधील ऑलिंपिक स्टेडियम, न्यूयॉर्कमधील जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज बस टर्मिनल, सिडनीमधील ऑस्ट्रेलियन स्क्वेअर, ब्राझीलमधील इटालियन राजदूतावास, व्हॅटिकन सिटीमधील पॅपल ऑडियन्स हॉल, मिलानमधील पीरेली टॉवर इत्यादी.
नेर्व्ही यांची अभिकल्पनिर्मिती क्षमता (Design Capability) असामान्य होती. परंतु त्यावेळी संगणकाची सोय नसल्याने ते छोट्या आकाराच्या (Small Scale) प्रतिकृती (Models) तयार करून त्यांवर प्रयोग करीत असत. बांधकाम क्षेत्रातील प्रमुख संकल्पना, नैसर्गिक व कृत्रिम भारांखालील एखाद्या संरचनेचा प्रतिसाद, गणिती अनुप्रयुक्ती, वास्तुसौंदर्य, अल्पखर्चिक व सामर्थ्यशाली बांधकाम हे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून नेर्व्ही यांचे गुणविशेष होत.
नेर्व्ही यांनी रोम विद्यापीठातील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले (१९४६-१९६२). त्यांनी Structures आणि Aesthetics and Technology in Building ही पुस्तके लिहिली. याशिवाय इटालियन भाषेतही त्यांनी लेखन केले. नेर्व्ही यांना अनेक जागतिक सन्मान मिळाले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : रॉयल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) या संस्थेतर्फे सुवर्णपदक (१९६०); अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (AIA) या संस्थेतर्फे सुवर्णपदक (१९६४); इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रक्चरल एंजिनिअर्स या संस्थेतर्फे सुवर्णपदक (१९६७); ब्यूनास आयरिस (१९५०), एडिंबरो आणि मोनॅको (१९६०), वॉर्सा (१९६१), हार्व्हर्ड आणि डार्टमथ ( १९६२), प्राग (१९६७), लंडन (१९६९) आणि बुडापेस्ट (१९७१) या विद्यापीठांकडून मानद पदवीचा सन्मान.
संदर्भ :
• Kunkal, Patrick Archdaily : Spotlight
• Ribin.Com
• e-architect
समीक्षक : प्रभाकर शंकर अंबिके