शारीरिक, मानसिक, दुर्बलता इत्यादीने ग्रस्त असणाऱ्या आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार करून त्यांना त्यांच्या क्षमतेनुरूप दिली जाणारी शिक्षणाची एक पद्धत. या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचा विचार करून विविध तंत्र-साधने, सुविधा व उपकरणे यांच्या साह्याने शिक्षण प्रणाली आणि अध्यापनपद्धती ठरविली जाते. कोणत्याही शाळेतील वर्गांत सर्व विद्यार्थी सारख्या क्षमतेचे नसतात. जेव्हा शिक्षक सर्व साधारण विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून शिकवितो, तेव्हा त्याचे शिकविणे विशेष मुलांना उपयोगी पडतेच असे नाही. त्यामुळे सर्व साधारण विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार विशेष शिक्षण मिळावे, याकरिता शासनाकडून सोय केली जाते, तेच विशेष शिक्षण होय. विशेष शिक्षणामुळे विशेष बालकांना परिणामकारक जीवन जगण्याचे बळ प्राप्त होते.
इतिहास : पूर्वी शारीरिक व मानसिक दोष असणाऱ्या मुलांना मागील जन्माचे फळ समजून त्यांच्याकडे लक्ष दिले जात नव्हते; मात्र मध्ययुगात धार्मिक दृष्टीकोनातून विशेषतः ख्रिस्ती धर्मातून दयेच्या भावनेने चर्चमधून दिव्यांगाची सेवा केली जाऊ लागली. पुढे आधुनिक काळात वैचारिक प्रबोधन होऊन तत्त्वज्ञ, विचारवंत यांनी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. समाजसेवी संस्था, धर्मसंस्था यांच्याकडून विशेष बालकांच्या शिक्षणाकरिता खास प्रयत्न होऊ लागले. शिक्षण तज्ज्ञांनी दिव्यांग बालकांना सामान्य मुलांबरोबर विशेष शिक्षण देण्यात यावे, यासाठी एकात्मिक शिक्षणाची शिफारस केली. विशेष बालकांना विशेष शिक्षण देण्यासाठी सॅम्युएल हॅनिक (जर्मनी), थॉमस ब्रेडवूड (इंग्लंड), गॅलेनउट (अमेरिका), वॅलेटीन हॅनी (फ्रान्स), पी. पी. लियोन (स्पेन), मारिया माँटेसरी (इटली), सेंगईन व इटार्ड इत्यादी शिक्षणतज्ज्ञांचा मोलाचा वाटा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर विशेष गरजा असणाऱ्या मुलांबाबत कायदा, सुविधा, उपचार इत्यादी पद्धतींच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली.
भारतात प्रचीन काळी अष्टवक्र नामक व्यक्तीचे शरीर आठ ठिकाणी वाकलेले होते; मात्र त्याला चारही वेद तोंडपाठ असल्याचा उल्लेख आहे. असे असले, तरी भारतामध्ये विशेष मुलांच्या शिक्षणाची सुरुवात १८८० पासून पाश्चात्त्य मिशनऱ्यांच्या संस्थांनी केल्या. मुदलियार माध्यमिक शिक्षण आयोगाने १९५२ मध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांना अपंगत्वनिहाय विशेष शाळांमधून शिक्षण द्यावे, अशी शिफारस केली. समाज कल्याण विभागांतर्गत १९५३ ते १९६४ या काळात निवासी व अनिवासी विशेष शाळा काढण्यात आल्या. त्यात अंध, कर्णबधीर, मतीमंद, अस्थिव्यंग व संमिश्र अपंगासाठी विशेष शाळा सुरू करण्यात येऊन त्यांना मान्यता व अनुदान देण्यात आले. तसेच कोठारी आयोगाने १९६४-१९६६ या काळात दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत प्रामुख्याने दाखल करून घ्यावे; तीव्र अपंगत्वाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर विशेष शाळा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि सर्वसामान्य शिक्षकांना अपंगत्वाबाबतच्या प्रशिक्षणाची सुविधा असावी, अशा शिफारशी केल्या.
उद्दिष्ट्ये :
- विशेष बालकांना ओळखून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे.
- विशेष बालकांच्या गरजा, क्षमता व अडचणी ओळखून त्यांच्याकडे व्यक्तीगत लक्ष देणे आणि साधन-सुविधा पुरवून त्यांना मदत करणे.
- विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी विशेष अभ्यासक्रम, विशेष अध्यापनपद्धती, विशेष तंत्र-साधनांचे विकसन व अंमलबजावणी करणे.
- विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी स्वतंत्र मूल्यमापनपद्धतीचे विकसन करून अंमलबजावणी करणे.
- विशेष बालकांच्या संदर्भात पालक-शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
- विशेष बालकांना शिक्षण देण्यासाठी आवश्यक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
- विषेष बालकांना जीवन जगण्यास समर्थ बनविणे इत्यादी.
विशेष गरजा असणारी बालके : विशेष शिक्षणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून कर्णबधीर, अंध, मतिमंद, अध्ययन अक्षम, विकलांग, मानसिक विकलांग, स्वमग्नता, आंतर्मुखी, सर्जनशील, मेंदू संबंधित दुर्बलता असे बालक म्हणजेच सामान्य बालकांपेक्षा भिन्न क्षमता व गरजा असलेल्या बालकास विशेष बालक म्हणतात. असे बालक सामान्य बालकांच्या गरजा व क्षमता यांच्या दृष्टीने अपवाद असल्याने त्याला अपवादात्मक किंवा दिव्यांग बालक असेही म्हणतात. अशा बालकाची वाढ व विकास सामान्य बालकांपेक्षा भिन्न असल्यामुळे त्याच्या मनोकायिक व शैक्षणिक गरजा भिन्न असतात. अशा बालकांची अध्ययन गती कमी असल्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम, शिक्षणपद्धत, शैक्षणिक साधने, शिक्षक व मूल्यमापनपद्धती सामान्य बालकांपेक्षा भिन्न असावी लागते.
वैशिष्ट्ये :
- विशेष बालकाला विशेष तज्ज्ञांकडून विशेष सेवांद्वारे शिक्षण दिले जाते.
- विशेष बालकाला एकात्म शिक्षणाद्वारे सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना सर्वसमावेशक शिक्षणाकरिता तयार केले जाते.
- विशेष बालकाच्या विशेष शिक्षणासंदर्भात कुटुंबाला सहभागी करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
- विशेष बालकाला व्यवसायाचे शिक्षण दिले जाते.
- विशेष गरजा असणाऱ्या विशेष बालकांसाठी शिक्षणाकरिता विशेष अभ्यासक्रम असतो.
- विशेष शिक्षणाला कायद्याचे अधिष्ठान असते.
- विशेष शिक्षणाच्या माध्यमातून बालकामध्ये दैनंदिन जीवन जगण्याचे कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
- विशेष बालकांना अध्यापन करण्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती केली जाते इत्यादी.
विशेष शिक्षणाचे प्रवाह : विशेष शिक्षणाची व्याप्ती विशेष बालकांच्या गरजांप्रमाणे वाढू शकते. अपंग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत शिकणे कठीण होईल, असा विचार करून त्यांच्यासाठी विशेष शिक्षणाची सोय केली जाते. शारीरिक विकलांग असणाऱ्या बालकांसाठीच विशेष शिक्षण असते, असा समाजात सर्वत्र समज होता. सामान्य शाळेच्या वर्गात सामान्य मुलांबरोबर अध्ययनामध्ये मंद असणाऱ्या मुलांच्या विशेष गरजा न भागल्यामुळे ती अभ्यासात मागे पडू शकतात. अशा मुलांसाठी विशेष शिक्षण आवश्यक ठरते. त्यांच्या गरजांची पूर्ती विशेष शिक्षणाने केल्यास हीच मुले पुढे राष्ट्रशक्ती ठरून राष्ट्रविकास साधू शकतील, असा विचार पुढे आला. त्यामुळे अशा मुलांना क्षमतानिहाय अभ्यासक्रम असावा, हा विचार प्रबळ ठरल्याने सामान्य शिक्षणापेक्षा वेगळे शिक्षण देणाऱ्या विशेष शिक्षण योजनेस समाजाबरोबर देशानेही मान्यता दिली.
(१) विशेष अध्यापक शिक्षण : विशेष मुलांसाठी सामान्य मुलांपेक्षा वेगळा अभ्यासक्रम हवा असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी अध्यापनपद्धती, तंत्र, शैक्षणिक साहित्य शोधणाऱ्या प्रशिक्षित विशेष शिक्षकांची गरज असते. त्यामुळे सामान्य शिक्षकाला प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षण महाविद्यालयांपेक्षा विशेष शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांतून प्रशिक्षण देणे गरजेचे असते. या विशेष प्रशिक्षणात विशेष शिक्षकाला विशेष बालक ओळखणे, त्यांच्या अक्षमतेवर उपचार करणे, त्यांना भिन्न अध्यापनपद्धती-तंत्र-शैक्षणिक साधने इत्यादींनुसार शिकवायचे कसे, परीक्षा घ्यायची कशी यांचा विचार करणारे पदवी व पदव्युत्तर विशेष शिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे.
(२) मुख्य प्रवाही : विशेष शिक्षण हे खर्चिक असल्यामुळे आर्थिक बाबतीत कमकुवत असणारे विशेष बालके क्षमता विकासापासून वंचित राहून त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अक्षम विशेष बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना सामान्य शाळेत प्रवेश देण्याची सूचना तज्ज्ञांनी केली. उभयतांचे एकाच वर्गात शिक्षण झाल्यामुळे दिवसाचे काही तास त्यांना एकत्र सहवास लाभेल. विशेष बालके शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक इत्यादी उपक्रमांत सामान्य मुलांप्रमाणे जरी सक्षमतेने सहभाग घेतला नाही, तरी निरीक्षणांती ते उत्साही होऊन या उपक्रमांमधील त्यांची प्रगती संथ परंतु योग्य दिशेने होईल आणि चांगल्या संस्कारांपासून ती वंचित राहणार नाहीत. सध्या काही सामान्य शाळांमध्ये अंध व मुकबधीर मुलांना प्रवेश देऊन सामान्य मुलांबरोबर शिकविण्यात येत आहे. प्रसंगी गणित व भाषांसारख्या काही विषयांबाबत विशेष शिक्षक त्यांना खास मार्गदर्शन करतात; तथापि हे विद्यार्थी मुख्यप्रवाही शिक्षणाची सोय असलेल्या सामान्य शाळेत शिकत असले, तरी त्यांना अपेक्षित विशेष सोयी मिळतीलच असे नाही. दोघांसाठी अभ्यासक्रम समान असला, तरी शिकविणे व मूल्यमापन यांच्याबाबतीत समायोजन साधेलच असे नाही. परिणामी हे विद्यार्थी शालेय प्रगतीमध्ये उणे ठरण्याची शक्यता असते.
(३) एकात्मिक शिक्षण : मानव संसाधन मंत्रालयाने १९९२ मध्ये केंद्र प्रायोजित एकात्मिक शिक्षण योजना सुरू केली. त्यानुसार सर्व सामान्य शाळांतून विशेष बालकांना शिक्षण देण्याकरिता प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवर विशेष यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यामध्ये विशेष वर्गखोली, विशेष अध्यापनपद्धती, विशेष शिक्षक इत्यादींचा समावेश असतो. सदर यंत्रणेत किमान ८ विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्यांना सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण दिले जाऊन विशेष बालकांना सर्वसमावेशक शिक्षणाकरिता तयार करणे, हा या शिक्षणाचा उद्देश असतो.
विशेष शिक्षणात मुलांच्या अपंगत्वाचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त असते. प्रत्येक मुलांचे अपंगत्व वेगवेगळे असल्यामुळे त्यांना त्यांच्या अपंगत्वानुसार असलेल्या विशेष शाळेत प्रवेश दिला जातो. उदा., अंधांची शाळा, कर्णबधिरांची शाळा, मतिमंदांची शाळा, इत्यादी.
संदर्भ :
- सुर्यवंशी, डी. ए., विशेष शिक्षण, जळगांव, २०१६.
- सोहोनी-शिरोडे, समावेशक शिक्षण, पुणे, २०१६.
- Snell, M. E.; Brown, F., Instruction of Students with Severe Disabilities, Seoul, 1993.
- Wilmshurst and Brue, The Complete Guide to Special Education, San Francisco, 2010.
समीक्षक : उमाजी नायकवडे