पवित्र संघ : (होली लीग ). फ्रान्सच्या इटलीवरील अतिक्रमणाविरुद्ध विविध घटक मित्र राष्ट्रांनी उभा केलेला संघ. यात पोपचाही समावेश होता, म्हणून यास ‘पवित्र संघ’ असे संबोधतात. पंधराव्या ते सतराव्या शतकांत स्थापन झालेल्या अनेक संघांपैकी पुढील सु. सहा प्रमुख संघ होत. यांतील सर्वांत पहिला संघ १४९५ मध्ये स्थापन झाला. त्यात सहावा पोप अलेक्झांडर, पहिला मॅक्सिमिल्यन (पवित्र रोमन सम्राट) व ॲरागॉनचा दुसरा फेर्डिनांट हे होते. फ्रान्सचा आठवा चार्ल्स विरुद्ध बाजूस होता. यातील पोप, मॅक्सिमिल्यन इत्यादींनी फ्रेंचांना इटलीतून १४९६ मध्ये हाकलून लावले. दुसऱ्या संघाची प्रथम उभारणी १५०८ मध्ये कँब्रेच्या तहान्वये झाली; तथापि जर्मन सामर्थ्याचे भय वाटून पोपने व्हेनिसशी हातमिळविणी केली, तसेच ॲरागॉनच्या फेर्डिनांटनेही व्हेनिसशी समझोता केला. या समझोत्यालाच ‘पवित्र संघ’ हे नाव मिळाले.
दुसरा पोप जूलिअस याने १५११ मध्ये संघटित केलेल्या तिसऱ्या पवित्र संघानेही इटलीतील फ्रेंचसत्तेस शह दिला. स्पेन, व्हेनिस, पवित्र रोमन साम्राज्य, इंग्लंड व स्वित्झर्लंड या सर्वांनी १५१२ मध्ये फ्रेंचांविरुद्ध एक संयुक्त आघाडी उघडली व फ्रेंचांना मिलानमधून हुसकून लावले. फ्रेंचांनी पुन्हा घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्वित्झर्लंडने १५१३ मध्ये त्यांचा नोव्हाराच्या युद्धात पराभव केला. यानंतर घटक मित्र राष्ट्रांनी फ्रान्सबरोबर वेगवेगळे शांतता तह केले.
स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याची पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट म्हणून १५१९ मध्ये निवड झाली. त्या वेळी स्पेनमधील अनेक शहरांनी त्यास विरोध करण्यासाठी एक पवित्र संघ ( सँता जुंता) स्थापन केला (१५२०). हा चवथा पवित्र संघ. त्याचा चार्ल्सने पराभव केला (१५२१) .
सोळाव्या शतकाच्या अखेरच्या धार्मिक यादवी युद्धांत फ्रान्समधील रोमन कॅथलिकांनी एक पवित्र संघ स्थापन केला ( १५७६) आणि प्रॉटेस्टंटांना तिसऱ्या हेन्रीने ज्या सवलती दिल्या, त्यास विरोध केला. यात कॅथलिक पंथाचे संरक्षण हा प्रमुख हेतू होता; तेव्हा हेन्रीने हा संघ विसर्जित करण्याची आज्ञा काढली. हा पाचवा पवित्र संघ. पुढे गादीवर आलेला चौथा हेन्री याने कॅथलिक धर्म स्वीकारला (१५९३). त्यामुळे साहजिकच हा संघ संपुष्टात आला. हा सहावा पवित्र संघ.
यानंतर ऑटोमन साम्राज्याला विरोध करण्यासाठी १५३८, १५७१ व पुढे १६८४ मध्ये यूरोपात पवित्र संघ निर्माण झाले व त्यांची स्फूर्तिस्थाने पोप, त्याचे रोमन साम्राज्य आणि व्हेनिस यांचे संयुक्त दल होते.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.