विजयनगर साम्राज्याकालीन मंदिरे – १
उत्तर कर्नाटकातील हंपी हे गाव विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधल्या गेलेल्या वास्तूंसाठी, मुख्यत्वे इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. साधारण १४ ते १६ व्या शतकात, प्रामुख्याने ग्रानाईट दगडामध्ये बांधण्यात आलेली ही मंदिरे द्रविडीयन वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहेत.
१. विरुपाक्ष मंदिर :
विरुपाक्ष किंवा पंपापती हे विजयानगरच्या राजांचे कुलदैवत होते. हंपी शहराच्या पश्चिमेस आणि तुंगभद्रा नदीच्या उत्तरेस असणाऱ्या या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात व स्थापना ७ व्या शतकात झाली. मंदिराचे प्रमुख भाग म्हणजे गर्भगृह, अंतरीक्ष, दोन मंडप आणि आवाराच्या चारी बाजूंस असलेला आच्छादित मार्ग (cloister). सुरुवातीला हे मंदिर फक्त गर्भगृह आणि अंतरीक्ष यापुरतेच मर्यादित होते. चौरसाकृती गर्भगृहावर द्रविडीयन शैलीतील शिखर असून त्यावर कळस आहे. १५ व्या शतकात मल्लिकार्जुन राजाने येथे सभामंडप बांधला. चौरसाकृती सभामंडपाला उत्तर आणि दक्षिण अशी दोन द्वारे आहेत. तसेच त्याला ४ मध्यवर्ती स्तंभ असून प्रत्येक स्तंभावर किरातार्जुनीय, भैरव अशा देव देवतांची शिल्पे आहेत. १६ व्या शतकात राजा कृष्णदेवरायाने या मंदिराचा विस्तार करून येथे ‘महारंगमंडप’ बांधला. या मंडपाला ३८ स्तंभ असून याच्या तीन बाजूस प्रवेशद्वार आहेत, प्रत्येक प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांना हत्तींचे शिल्पकाम असलेले कठडे आहेत. येथील दर्शनी बाजूच्या स्तंभांवर ‘व्याल’ कोरले आहेत, जे विजयनगर वास्तुशैलीतील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. तसेच मंडपाच्या छतावर विरुपाक्ष-पंपा, राम-सीता तसेच शंकर यांची सुंदर चित्रे आहेत. जेव्हा १९व्या शतकाच्या आरंभी नूतनीकरण झाले, तेव्हा ही चित्रे काढली गेली.
राजा कृष्णादेवरायाच्या कारकिर्दीत मंदिराच्या पूर्वेकडच्या गोपुराचे म्हणजेच महाद्वाराचे नूतनीकरण झाले. सुमारे १६० फूट उंच आणि ९ मजले असणारे हे गोपूर आजूबाजूच्या परिसरामध्ये उठून दिसते. याचा पाया दगडी असून वरील मजले विटांचे आहेत. यावर असलेली गिलावा शिल्पे (stucco figures) म्हणजे १९ व्या शतकातील नूतनीकरणाचा भाग आहेत. याच्या टोकावरील टोकदार घुमट आणि कळस हे तमिळ गोपुरांशी साधर्म्य दाखवतात. हंपी येथे असणाऱ्या विजयनगरकालीन मंदिरांपैकी कार्यरत असणारे हे एकमेव मंदिर आहे.
२. कृष्ण मंदिर :
हे मंदिर १५१५ मध्ये राजा कृष्णदेवरायाने बांधले. येथील परिसर ८८ X ६० मी. मापाचा असून चारही बाजूंनी उंच भिंतींनी वेढलेला आहे. ह्या भिंतीच्या महाद्वारावर गोपूर आहे. येथील द्वारमंडपाचे उंच खांब म्हणजे या गोपुराचे वैशिष्ट्य आहेत. विटांनी बनलेल्या गोपुरावरील बराचसा भाग मोडकळीस आला आहे, तरीही त्यावरील कृष्णाची काही शिल्पे लक्षवेधी आहेत. द्वाराच्या आतील बाजूस दोन्ही भागांवर दशावतार कोरलेले आहेत. गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप, सभामंडप आणि महामंडप या सर्वांचा मंदिराच्या मुख्य भागांमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर येथे द्रविडीयन शैलीतील गरुड मंडप आणि दिपस्तंभ देखील आहे. गर्भगृहाचे द्वारपाल जय-विजय, त्या द्वाराच्या वासावरील (lintel) गजलक्ष्मी, मंडपांच्या स्तंभांवरील कृष्ण व इतर वैष्णव देवता आणि व्याल म्हणजे या मंदिराच्या शिल्पकलेची वैशिष्ट्ये आहेत. येथील कृष्णापंचायतनाचा भाग असेली इतर चार देवळे आता भग्नावस्थेत आहेत, त्यांचे अवशेष या मंदिराच्या आवाराच्या चारही कोपऱ्यामध्ये पाहायला मिळतात.
३. हजार राम मंदिर :
१५ व्या शतकात बांधलेले हे मंदिर विजयनगराच्या राजांचे खाजगी देऊळ होते. मंदिराच्या बाजूची भिंत पाच आडव्या पट्ट्यांमध्ये विभागली गेली आहे. त्या प्रत्येक पट्ट्यावर हत्ती, घोडे, सैनिक, त्याचबरोबर वादन आणि नृत्य करणाऱ्या स्त्रिया अशी अनेक शिल्पे कोरली आहेत. या शिल्पांमधील प्रसंग विजयनगरातील ‘महानवमी’ उत्सवाचे वर्णन करतात. लक्षवेधी शिल्पकाम केलेली ही भिंत मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे कारण या परिसरातील हे एकमेव मंदिर आहे ज्याच्या तटबंदीवर शिल्पकाम केले आहे. मंदिराचे पूर्वाभिमुख महाद्वार सपाट छताचे असून त्याच्या पुढील बाजूस कोरीवकाम केलेले ४ खांब आहेत. मुख्य मंदिर आवाराच्या मधोमध असून त्यापुढे मंडप आहे. मंडपाच्या भिंतीवर रामायणातील १०८ प्रसंग कोरले आहेत. मंडपाच्या आतील भाग तुलनेने साधा असून तेथे भव्य असे बेसाल्ट दगडातील चार खांब आहेत. बेसाल्ट हा येथील स्थानिक दगड नसून, पश्चिम कर्नाटकातून तो आणला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ह्या खांबांच्या मधील भागांवर विष्णु आणि राम यांच्याशी संबंधित चित्रे कोरलेली आहेत. तसेच अंतरिक्षातील भिंतीवरील देखील रामायणातील महत्वाचे प्रसंग कोरले आहेत. गर्भगृहावर असलेल्या विटांनी बांधलेल्या शिखराची पडझड झालेली आहे. याच परिसरात आणखी एक लहान नृसिंह-लक्ष्मी देऊळ आहे. येथील शिखरावरील कूट आणि आयताकृती घुमट तुलनेने चांगल्या अवस्थेत आहे.
संदर्भ :
ग्रंथ :
- Hampi Vijayanagara – John M Fritz & George Michell
- Karnataka : A garden of Architecture – Dr. A.V. Narasimha Murthy & Dr. R. Gopal
वेबसाईट :
समीक्षक : श्रीपाद भालेराव