नुनीझ, फर्नाओ : (१५००—१५५०). पोर्तुगीज प्रवासी व व्यापारी. १५३५ ते १५३७ या काळात त्याने दक्षिण भारतातील प्रसिद्ध विजयनगर साम्राज्याच्या राजधानीत वास्तव्य केले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

नुनीझच्या लेखनातून विजयनगर साम्राज्याबद्दल विविध मनोरंजक तपशील वाचायला मिळतो. त्याने जेव्हा विजयनगर साम्राज्याला भेट दिली, तेव्हा तुळुव घराण्यातील अच्युतदेवराय राजा (कार. १५२९—१५४२) राज्य करत होता. नुनीझने सु. १२३० पासूनचा इतिहास लिहिलेला असून सुरुवातीला मुसलमानी सत्तांनी विजयनगरवर केलेल्या हल्ल्यासंबंधी व केलेल्या वाताहतीची माहिती मिळते. पुढे या साम्राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींबद्दल व साम्राज्यावर राज्य केलेल्या राज्यकर्त्यांची विपुल माहिती तो देतो. यानंतर थोर राजा कृष्णदेवराय (कार. १५०९-२९) याची कारकिर्द, त्याने केलेल्या लढाया, आदिलशाही बरोबरचा संघर्ष, त्याने केलेली किल्ल्यांची बांधकामे, लोकोपयोगी कामे, चलन, व्यापार, विजयनगरचे सैन्य, स्थानिक चालीरिती यांबद्दल विस्तृत माहिती त्याने लिहून ठेवलेली दिसते; तथापि त्याच्या लेखनातील काही उल्लेख अतिशयोक्तीपूर्ण व रंजक आहेत.

नुनीझच्या लेखनाची सुरुवात मुहम्मद तुघलकाने अनेगुंदीवर मिळवलेल्या विजयापासून होते. त्यात तो लिहितो की, १२३० साली हिंदुस्थानच्या दक्षिण भागावर दिल्लीच्या सुलतानाचा अंमल होता. त्याच्या इतका थोर, प्रतापी व भाग्यशाली राजा पूर्वी कधीही झालेला नव्हता. त्याने स्वतःच्या पराक्रमाने व सैन्याच्या बळावर खंबायतच्या राजाबरोबर अनेक वर्षे युद्ध करून त्या राज्यातील गुजरात देश काबीज केला. पुढे त्याने भलीमोठी फौज तयार करून बिसनगरच्या (विजयनगरच्या) रायाशी लढण्याचा निर्णय घेतला. याच सुमारास त्याचे शेख इस्माइलच्या राज्यातील इराणच्या सरहद्दीवरील तुर्कोमन लोकांशी युद्ध चालू होते. या तुर्कोमन लोकांचे वर्णन करताना ते गौरवर्णीय व धिप्पाड असल्याचे तो लिहितो. खंबायतच्या युद्धानंतर तुघलकाजवळ ८ लक्ष स्वार शिल्लक असल्याचे तो लिहितो. विजयनगरवरील स्वारीच्या वेळी त्याने बालाघाटावर आपला मोर्चा फिरवला, तेव्हा हा प्रदेश आदिलशाहीत असल्याचे सांगतो. बालाघाटाचा प्रदेश जिंकून तो विजयनगरच्या सरहद्दीवर पोहोचला. त्या वेळी विजयनगरचे मुख्य केंद्र अनेगुंदी होते. या लढाईच्या वेळी तेथील राजाने व त्याच्या सैन्याने आपल्या कुटुंबियांची (बायका मुलांची) विटंबना होऊ नये म्हणून ठार मारल्याचे तो लिहितो. पुढे अनेगुंदी जिंकल्यावर तुघलकाने तेथे मलिकनबी या सरदाराला नेमल्याचा उल्लेख नुनीझ करतो. परंतु या मलिकनबीला राज्यकारभार जमला नाही, म्हणून तेथील कारभार देवराय नावाच्या सरदाराकडे सोपवण्यात आला. यानंतर देवराय स्वतंत्रपणे कारभार करू लागला. पण हा देवराय म्हणजे नेमका कोण हे उमजत नाही. याने विसकटलेली राज्याची घडी बसवण्यासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली असल्याचे तो लिहितो.

नुनीझने विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेसंबंधी वर्णन केलेले आहे. या जागेवर राज्य उभारण्यामागे असलेल्य एका कथेचा तो संदर्भ देतो. राजा शिकारीला गेला असताना त्याच्या कुत्र्यांच्या मागे ससा लागल्याची कथा, त्याला तेथे राजवाडा बांधण्यासाठी तेथील साधूने दिलेली संमती व तेथे राजाने बांधलेल्या मंदिराबद्दल (विरूपाक्ष मंदिर) तो लिहून ठेवतो. या देवरायाने ७ वर्षे राज्य केल्याचे व नंतर राज्याचा कारभार बुक्करायाकडे आल्याचा तो उल्लेख करतो. बुक्करायाने आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत आधी गेलेला सर्व प्रदेश व ओरिसातील प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणल्याचे तो लिहितो. बुक्करायाच्या नंतर राज्यावर देवराय (पहिला) गादीवर आला. याचे नंतर अजराय गादीवर आला. त्याने ४३ वर्षे राज्य केल्याचे तो लिहितो. हा अजराय राजा कोण होता, याबाबत इतर कोणत्याही संदर्भग्रंथांत माहिती येत नाही.  तसेच त्याने ४३ वर्षे राज्य केले, असेही कुठे इतर ठिकाणी नोंद झालेले नाही. याच्या कारकिर्दीचे वर्णन करताना तो सांगतो की, याचे मुस्लीम राज्यकर्त्यांशी सारखे युद्ध चालू असल्याचे तसेच गोवा, चौल, दाभोळ, सिलोन व कोरोमंडलचा प्रदेश जिंकून घेतल्याचे नमूद करतो. विजयनगर शहराला अनेक कोट, बुरूज, तटबंदी असल्याचे असून पाणीपुरवठ्यासाठी तुंगभद्रा नदीत धरण बांधून शहरात पाणी आणल्याचे व त्यामुळे राज्याचा महसूल तीन लक्ष होनाने वाढल्याचा उल्लेख तो करतो.

पुढे विजयराय गादीवर आला. याने २५ वर्षे राज्य केले. याच्या कारकिर्दीत केरळमधील क्विलोन, सिलोन (श्रीलंका), पुलीकत (तमिळनाडू) येथील राजे यास खंडणी देत असत. विजयरायनंतर त्याचा मुलगा पिन्नाराय याने १२ वर्षे राज्य केले. हा उत्तम ज्योतिषी व विद्याव्यसनी असल्याचे, याने अनेक ग्रंथ लिहिल्याचे व याचा खून त्याच्याच पुतण्याने केल्याचे रसभरीत वर्णन तो करून ठेवतो. विजयरायाने २५ वर्षे राज्य केले, ही नुनीझच्या लेखनातील अतिशयोक्ती आहे. त्याला पिन्नाराय नावाचा मुलगा असल्याचा उल्लेख इतर कोणत्याही समकालीन ग्रंथात नाही. विजयराय नंतर देवराय (दुसरा) आणि मल्लिकार्जुन राय यांची नावे न घेता तो थेट विरूपाक्षराय गादीवर आल्याचे लिहितो, जे चुकीचे आहे. विरूपाक्ष हा राजा मद्यपी, स्त्रीआसक्त व ऐषारामी असल्याचे व त्याच्या दुर्गुणामुळे विजयनगर साम्राज्याचा काही भाग गमावल्याचे तो लिहून ठेवतो. याच्या मोठ्या मुलाने याचा खून केला व आपल्या धाकट्या भावाला प्रौढ रायला गादीवर बसवले. पण याची वागणूक देखील आपल्या पित्याप्रमाणेच असल्याचे तो लिहितो. पुढे याला पदच्युत करून नरसिंहरायाने राज्यकारभार हाती घेतला. याच कालखंडात विजयनगरच्या तुळुव साम्राज्याला सुरुवात झाली. मागील काळात गेलेला सर्व प्रदेश याने जिकून घेतला व ४४ वर्षे राज्य केल्याची अतिशयोक्ती देखील त्याच्या लेखनात दिसते.

कृष्णदेवराय गादीवर बसताच त्याने आपला भाऊ भुजबलराय, त्याचा मुलगा व आपल्या तीन भावांना चंद्रगिरीच्या किल्ल्यावर पाठवले. यानंतर त्याने रायचूर, मुद्गल व उदयगिरी हे किल्ले जिंकून घेण्यासाठी मोहीम उघडली. प्रथम त्याने त्यावेळच्या ओरिसा साम्राज्यातील उदयगिरी ताब्यात घेतला. या नंतर कोंडाविडला वेढा दिला; परंतु ओरिसाचा राजा रक्षणासाठी ५० हजार पायदळ, २० हजार स्वार व १३०० हत्तींची फौज घेऊन प्रतिकाराला उभा रहिला. या युद्धात कृष्णदेवरायचा विजय झाला व याचबरोबर कोंडाविडचा किल्ला जिंकून घेतला. पुढे कोंडापल्ली घेतले. यात ओरिसाची एक राणी, एक राजपुत्र व सात सेनापती हाती लागले, त्यांना कृष्णदेवरायाने विजयनगरला पाठवून दिले. पुढे कृष्णदेवरायाने ओरिसाच्या राजकन्येशी विवाह केल्याचे तो लिहून ठेवतो. पुढे त्याने वेल्लोर जिंकून घेतले. पुढे आदिलशाहीच्या ताब्यातील रायचूर जिंकून घेण्यासाठी आपल्या बरोबर जवळपास ६ लाखाचे पायदळ, २८ हजार स्वार व ५५० हत्ती इतकी फौज घेऊन निघाला. सैन्याच्या या वर्णनाबरोबरच तो सैन्याच्या व्यवस्थेबद्दल, रायाच्या छावणीबद्दल, रायचूरबद्दल विस्तृत लिहितो. त्या वेळी आदिलशाही सैन्यात १ लाख २० हजार पायदळ, १८ हजार स्वार व १५० हत्ती इतकी फौज असल्याचे तो लिहितो. पुढे त्याने रायचूर शहरावर हल्ला केला, आदिलशाही सैन्याने त्याला कडवा प्रतिकार केला; पण या युद्धात आदिलशहाचा पराभव झाला. रायला अगणित लुट मिळाली, खूप कैदी हाती लागले; परंतु त्यातील स्त्रियांना त्याने सोडून दिले. पुढे कृष्णदेवरायाच्या मृत्यूनंतर अच्युतराय गादीवर आला. या अच्युतरायाचे वर्णन तो हा राजा खूप क्रूर, दुर्व्यसनी व दुष्ट असल्याचे तो लिहतो.

विजयनगरच्या स्थापनेपासून जे राजे झाले त्यांची माहिती लिहिताना नुनीझने या सर्वांची कारकिर्द पाहिलेली नाही. त्याचे लेखन ऐकीव माहितीवर आधारित असल्याने त्यात अनेक त्रुटी आहेत. अनेक महत्त्वाच्या राजांचे उल्लेखच त्याने केलेले नाहीत. अजराय सारख्या नसलेल्या राजांनी ४३ वर्षे राज्य केल्याचे तो सांगतो. तरीही त्याचे लेखन मध्ययुगीन काळातील भारतातील एका प्रबळ राज्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते. विजयनगर येथील समाजव्यवस्था, त्यांचे रीतीरिवाज, खाण्यापिण्याच्या पद्धती, विविध अंत्यसंस्कार पद्धती, सतीप्रथा, देवदेवता, बाजारात मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती, दरबारातील कामाचे रीतीरिवाज, राजासमोर खेळले जाणारे खेळ, राज्यात साजरे केले जाणारे उत्सव, विविध अधिकारी वर्ग व त्यांना मिळणारे पगार, त्यांचे उत्पन्न, अधिकाऱ्यांना दिली जाणारी लाच, न्याय मागण्याच्या प्रथा, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा, विविध प्रदेशांततून मिळणारा महसूल इत्यादी माहिती नुनीझच्या लेखनामुळे अभ्यासकांपर्यंत पोहोचू शकली.

संदर्भ :

  • Sewell, Robert, A Forgotten Empire : Vijayanagar, Madras, 1991.
  • लेले मा. व्यं. अनु., एक नष्टस्मृती साम्राज्य किंवा विजयनगर साम्राज्याचा इतिहास, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळी, पुणे, १९१९.

                                                                                                                                           समीक्षक :  प्रमोद जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.