विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (१४८९–१५२९)आणि आदिलशाही सुलतान इस्माईल आदिलशाह (कार. १५१०–१५३५) यांच्यात रायचूर (कर्नाटक) येथे झालेली प्रसिद्ध लढाई (१५२०).

रायचूरचा किल्ला आणि कृष्णा-तुंगभद्रा दोआब एकदम मोक्याच्या ठिकाणी असल्याने यापूर्वीही येथे अनेक लढाया झाल्या होत्या. बहमनी सत्तेने या आधी रायचूरवरील विजयनगरची किमान पाच आक्रमणे थोपवून धरली होती. पुढे बहमनी सत्तेचे पाच तुकडे झाल्यानंतर त्यांपैकी आदिलशाहीसोबतही विजयनगरचे खटके उडतच होते. इ. स. १५०९ मध्ये कृष्णदेवराय सम्राट झाल्यानंतरच्या दहाव्या वर्षात त्याने एका मुसलमान व्यापाऱ्याला ४०,००० पार्दाओ (तत्कालीन पोर्तुगीज चलन) इतकी रक्कम देऊन गोव्याहून घोडे आणावयास पाठवले होते; परंतु त्या व्यापाऱ्याने या रकमेसह पलायन केले व विजापूरला जाऊन मिळाला. कृष्णदेवरायाने इस्माईल आदिलशाहशी यासंबंधी संपर्क साधला असता त्याने दाद दिली नाही. त्याचा राग धरून त्याने आदिलशाहीवर, विशेषत: त्या व्यापाऱ्याला देण्यात आलेल्या दाभोळ बंदरावर आक्रमण करण्याचे ठरवले. त्याच्या सल्लागारांनी मात्र कृष्णदेवरायाला त्या ऐवजी हंपीजवळच्या मोक्याच्या रायचूर प्रांतावर आक्रमण करणे जास्त सोयीचे पडेल असा सल्ला दिला. तो मानून त्याकरिता कृष्णदेवरायाने २७,६०० घोडदळ आणि ५,५३,००० इतके पायदळ जमा केले. यांत धनुर्धारी, बरकंदाज (बंदुकधारी) आणि तोफखान्याचाही समावेश होता.

हंपीहून निघाल्यावर विजयनगरच्या सैन्याने तुंगभद्रा ओलांडली व रायचूरच्या दक्षिणेस दहा मैलांवरील मलियाबाद येथे तळ ठोकला. तेथून रायचूरवर स्वारी केली. रायचूरचा किल्ला मोठा व त्याला एकाभोवती एक अशा तीन तटबंदीच्या भिंती होत्या. त्यांत चुन्याचा वापर न करता आधारादाखल मागून माती भरली होती. बाहेरील तटबंदीत एकमेकांनजीक असलेले तीस बुरूज व त्यांवर मोठे दगड फेकू शकणाऱ्या लगोरी होत्या. त्याखेरीज दोनशे मोठ्या व अनेक लहान तोफा, अनेक धनुर्धारी व बरकंदाजही होते. आतील आदिलशाही शिबंदीत ८००० पायदळ, ४०० घोडदळ आणि २० हत्तींचा समावेश होता. किल्ल्याभोवती वेढा दिल्यानंतर कृष्णदेवरायाने पूर्वेकडून मुख्य हल्ला चढवला. आतील शिबंदीने धनुष्यबाण, तोफा व बंदुकांचा वापर करून विजयनगरच्या सैन्याला प्रत्युत्तर दिले. विजयनगरने मात्र याकामी तोफखान्याचा वापर केला नाही. त्याऐवजी पहारी व कुदळींनी किल्ल्याची तटबंदी हळूहळू पाडण्यावर भर देऊन पाडलेल्या तटबंदीच्या प्रमाणात बक्षीस देऊ केले. तीन महिने वेढा असाच चालू राहिला.

मे महिन्यात कृष्णदेवरायाला समजले की रायचूरचा ताबा घेण्याकरिता इस्माईल आदिलशाह जातीने १८,००० घोडदळ, १,२०,००० पायदळ, १५० हत्ती आणि मोठा तोफखाना घेऊन येत आहे. तत्क्षणी त्याने वेढा उठवून इस्माईल आदिलशाहला दोआबात प्रवेश करण्यापासून रोखण्याकरिता आपला मोर्चा कृष्णा नदीजवळ वळवला. काही दिवसांनी आदिलशाही फौजेने कृष्णा नदी ओलांडली व दोआबात युद्ध सुरू झाले. १९ मे १५२० रोजी लढाईला तोंड लागले. त्या दिवशी जमा झालेल्या विजयनगरच्या आघाडीवर आदिलशाही तोफखान्याचा एकवटून हल्ला करण्यात आला. त्यात अनेक सैनिक मरण पावून आदिलशाही घोडदळाने पुढे मुसंडी मारली. त्यामुळे आपण लढाई हरू अशी शंका येऊन कृष्णदेवरायाने त्याच्या एका सेवकाला त्याची अंगठी त्याच्या राण्यांना त्याच्या मरणाची खूण म्हणून दाखवण्यास सांगितले आणि घोड्यावर आरूढ होऊन उर्वरित सैन्यानिशी आदिलशाही सैन्यावर जोराचा हल्ला चढवला. त्याच्या रेट्याने आदिलशाही सैन्य हळूहळू मागे हटले. कृष्णा नदीपर्यंत त्यांना हटवून तेथे त्यांची भीषण कत्तल करण्यात आली. त्यामुळे इस्माईल आदिलशाहला ४०० मोठ्या व ५०० लहान तोफा, ४००० घोडे आणि १०० हत्ती मागे टाकून एका हत्तीवरून पलायन करावे लागले.

लढाई जिंकल्यानंतर कृष्णदेवरायाने रायचूरचा वेढा पुन्हा चालू ठेवला. यावेळी त्याच्यासोबत २० पोर्तुगीज बरकंदाज होते. त्यांचा नेता होता क्रिस्तोवाओ दि फिगरेदो. पोर्तुगीजांनी रायचूरच्या किल्ल्यावरील सैनिकांना एकेक करून टिपून मारणे चालू केले. ही युद्धपद्धत परिचयाची नसल्याने किल्ल्यावरील शिबंदीला याचा प्रतिकार करता आला नाही. किल्ल्यावरील तोफांना एकाच ठिकाणी बंदिस्त करून ठेवल्यामुळे नेहमीच्या टप्प्याव्यतिरिक्त मारगिरीसाठी त्या कुचकामी होत्या. याखेरीज पूर्वीप्रमाणेच हळूहळू तटबंदी पाडण्याचे कामही चालूच होते. त्यामुळे बाहेरील तटबंदीचा आश्रय सोडून शिबंदीने आतील तटबंदीचा आश्रय घेतला व स्त्रिया-मुले इत्यादींना बालेकिल्ल्यात पाठवले.

१४ जून १५२० रोजी रायचूर शहराचा मुख्य आदिलशाही अधिकारी तटबंदीवरून वेढ्याचे निरीक्षण करीत असताना त्याला पोर्तुगीज बरकंदाजांनी टिपून ठार मारले. यामुळे आदिलशाही सैन्याचे मनोधैर्य अजूनच खचले व त्यांनी दुसऱ्याच दिवशी किल्ल्याचे दरवाजे उघडून शरणागती पतकरली. त्यानंतर कृष्णदेवरायाने तेथील श्रीमंत लोक व नेत्यांची भेट घेतली आणि सर्वांची मालमत्ता अबाधित राहील, असे आश्वासन दिले. वेढ्यादरम्यान पाडलेल्या भिंती दुरुस्त केल्या व नौरंगी दरवाजा नामक नवीन दार आणि त्यालगत तीन बुरूज बांधले. तेथील प्रशासनासंबंधी तरतुदी केल्यावर कृष्णदेवराय हंपीला निघून गेला.

त्यानंतर आदिलशाहचा वकील हंपीला आला व कृष्णदेवरायाने रायचूरचा किल्ला व शहर, तसेच लढाईदरम्यान त्याच्या हाती लागलेले घोडे, हत्ती इ. आदिलशाहच्या स्वाधीन करावे अशी मागणी त्याने केली. कृष्णदेवरायाने ती मागणी मान्य केली, परंतु त्याआधी एक अट अशीही घातली की, इस्माईल आदिलशाहने स्वत: हंपीला येऊन त्याच्या पायाचे चुंबन घेतले पाहिजे. त्यावर इस्माईलने उत्तर दिले की, दुसऱ्या सार्वभौम राज्यात प्रवेश करणे योग्य नाही. तेव्हा कृष्णदेवरायाने दोन्ही राज्यांमधील हद्द असलेल्य मुद्गल येथे येण्यास सांगितले. पण इस्माईल आदिलशाह तेथे आलाच नाही. त्यावर कृष्णदेवरायाने विजापूरपर्यंत धडक मारली व शहराची नासधूसही केली. त्यानंतर तो हंपीला परतला.

ही लढाई अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. बाबराआधीच काही वर्षे किमान दख्खनमध्ये तोफा व बंदुकांचा वापर सर्वमान्य झाला होता, हे या लढाईच्या वर्णनातून दिसून येते. या लढाईत तोफांचा वापर न करताही जिंकल्यामुळे विजयनगरने पुढे तोफांवर भर दिला नाही, तर आदिलशाहीने यापुढील बांधकामांत तोफांचा पल्ला व मारगिरीखालील प्रदेश वाढवण्यासाठी अनेक नव्या युक्त्या वापरल्या. कृष्णदेवराय व पोर्तुगीज यांचे संबंध सामान्यतः मित्रत्वाचे असल्याने फर्नाओ नुनीझ (इ. स. १५००–१५५०)  आणि डोमिंगो पायीश (इ. स. सोळावे शतक) इ. पोर्तुगीज प्रवाशांनी विजयनगरला भेटी दिल्या. नुनीझ तसेच मध्ययुगीन फार्सी इतिहासकार फिरिश्ता (इ. स. १५७०–१६२३) यांच्या लेखनातून या लढाईचे वर्णन दिसून येते.

संदर्भ :

  • Eaton, Richard M. ‘Kiss my foot, said the king: Firearms, diplomacy and the battle for Raichur, 1520ʼ, Modern Asian Studies, Vol. 43, No. 1, pp. 289-313, Cambridge University Press, UK, 2009.

                                                                                                                                                                                 समीक्षक : जयकुमार पाठक