वलीउल्ला, शाह : (२१ फेब्रुवारी १७०३—२० ऑगस्ट १७६२). इस्लामी धर्मशास्त्रवेत्ते. संपूर्ण नाव शाह वलीउल्ला, कुत्बुद्दीन अहमद बिन् अब्द अल् रहीम देहलवी. ते दिल्ली येथे जन्मले. इस्लामचे दुसरे खलिफा उमर यांचे वलीउल्ला शाह हे वंशज होय. त्यांचे वडील शाह अब्दुर रहीम हे सूफी असून धर्मशास्त्रवेत्ते होते. तसेच फतावा-ए-आलमगिरी ह्या ग्रंथाचे ते एक संकलकही होते. त्यांनी ‘मद्रसा-ए-रहिमिया’ (‘रहिमिया मद्रसा’ ह्या नावानेही प्रसिद्ध) या संस्थेची दिल्ली येथे स्थापना केली. उत्तर भारतातील धर्मशास्त्रशिक्षणाची ही एक प्रसिद्ध पाठशाळा होती. वलीउल्ला शाह यांनी वयाच्या सातव्या वर्षी पवित्र कुराण मुखोद्गत केले. वयाच्या पंधराव्या वर्षीच आपले शिक्षण पूर्ण करून सतराव्या वर्षी त्यांनी मद्रसाचे काम हाती घेतले. १७३०−३२ मध्ये त्यांनी मक्केची यात्रा केली. या काळात त्यांनी अनेक देशांमधील मुस्लिम विद्वानांबरोबर धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला.
वलीउल्ला शाह यांनी शंभरांहून अधिक पुस्तिका, व्याप्तिलेख व ग्रंथ लिहिले. इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी आणि सामान्य जनतेला कुराण सहज कळावा यासाठी त्यांनी कुराणाचे फार्सी भाषांतर केले. अरबी आणि फार्सी भाषांमधून ते सारख्याच सहजतेने लिखाण करीत असत. हुज्जत अल्लाह अल्-बालिघा हा त्यांचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ. तो एक अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता पावला असून कैरो येथील अल्-बझार (मशीद व विद्यापीठ) येथे अजूनही त्याचे वाचन-पठण होत असते. १९३२ मध्ये कैरो येथील मुनिरिया मुद्रणालयामध्ये या ग्रंथाची छपाई झाली. धर्माचे बाह्य स्वरूप व त्याचा आंतरिक गूढार्थ यांचे व्यापक स्पष्टीकरण या ग्रंथामध्ये आढळते. ह्या ग्रंथाची तुलना अल्-गझालींच्या एह्या अल् उलूम अल्-दीन (म.शी. धर्मशास्त्राचे पुनरुज्जीवन) ह्या जगप्रसिद्ध ग्रंथाबरोबर नेहमी करण्यात येते. याशिवाय फतह अल्-रहमान (कुराणाचे फार्सी भाषांतर), अल्-फौज अल्-कबीर (हदीसच्या फार्सीतील अभ्यासाची प्रारंभिक तत्त्वे), अल्-तफहिमात अल्-इलाहिया (सूफी तत्त्वज्ञानावरील अंशतः फार्सी व अंशतः अरबीमध्ये लिहिलेला प्रबंध) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय ग्रंथ होत.
वलीउल्ला शाह हे सूफी विचारवंतांच्या मालिकेतील थोर व मौलिक विचारवंत होते. त्यांनी धर्मशास्त्र आणि गूढवाद यांचा संयोग घडवून आणला व धर्माचे स्वतंत्रपणे अर्थबोधन करण्याचे हक्कही प्रतिपादिले. भारतातील अरबींच्या अभ्यासकांकडून त्यांच्या कर्तृत्वाचा नेहमीच आदर केला जातो आणि पहिल्या प्रतीचे धर्मशास्त्रवेत्ते म्हणून जगात सर्वत्र त्यांचा आदरपूर्वक अभ्यास करण्यात येतो.
दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://peoplepill.com/people/shah-waliullah/
- http://www.muslimphilosophy.com/ip/rep/H045
- https://www.encyclopedia.com/history/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/dehlavi-shah-waliullah