योगमार्गातील विघ्ने. महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (१.३०) योगाभ्यासात विघ्न आणणाऱ्या नऊ अंतरायांची गणना केलेली आहे. या अंतरायांना योगाच्या परिभाषेत चित्तविक्षेप, योगमल, योगप्रतिपक्ष तथा योगान्तराय अशा अन्यही संज्ञा आहेत; जसे, चित्ताला कायम विचलित करतात म्हणून चित्तविक्षेप, योगसाधनेत मालिन्य उत्पन्न करतात म्हणून योगमल, योगसाधनेचे शत्रू असल्याने योगप्रतिपक्ष व साधनेत अडथळे उत्पन्न करतात म्हणून योगान्तराय अशा संज्ञा आहेत. योगातील नऊ अंतराय पुढीलप्रमाणे आहेत —
(१) व्याधी : शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंमध्ये किंवा शरीरांतर्गत स्रावांमध्ये किंवा इंद्रियांमध्ये विषमता उत्पन्न होणे म्हणजे व्याधी होय. व्याधी उत्पन्न झाल्यास योगाभ्यास करण्यास योगी साहजिकच असमर्थ होतो व त्याच्या चित्ताची एकाग्रता होऊ शकत नाही.
(२) स्त्यान : चित्ताला कोणतेही कार्य करण्याची इच्छा न होणे म्हणजे स्त्यान. चित्तामध्ये ‘काहीही करू नये’ अशा प्रकारची ही भावना ज्यावेळी कोणत्याही निमित्ताशिवाय उत्पन्न होते, त्यावेळी त्याला स्त्यान असे म्हणतात. ही भावना योगाभ्यासात अवरोध उत्पन्न करते.
(३) संशय : एखाद्या वस्तूविषयी किंवा क्रियेविषयी निश्चित ज्ञान न होणे म्हणजेच संशय होय. यात वस्तूच्या स्वरूपाविषयी मनात संदेह असतो, उदा., हे मृगजळ आहे की पाणी अशा प्रकारचा संदेह. निश्चित ज्ञान नसल्यामुळे हे ज्ञान यथार्थ होऊ शकत नाही आणि दोन वस्तूंना विषद करणारे असल्यामुळे चित्ताच्या एकाग्रतेला बाधा उत्पन्न करते.
(४) प्रमाद : चित्ताच्या एकाग्रतेचे उपाय जाणूनही त्यांचे अनुसरण न करणे याला प्रमाद असे म्हणतात.
(५) आलस्य : शरीराच्या किंवा मनाच्या जडत्वामुळे कोणतीही क्रिया करण्यास प्रवृत्ती न होणे म्हणजे आलस्य होय. हे मनाचे जडत्व तमोगुण प्रबळ झाल्यामुळे उत्पन्न होते, त्यामुळे या निष्क्रियतेसाठी काहीतरी निमित्त असल्यामुळे आलस्य हे ‘स्त्यान’ या अंतरायापेक्षा वेगळे सांगितलेले आहे.
(६) अविरती : वैराग्याचा अभाव म्हणजे अविरती होय. विविध वस्तूंमध्ये असणाऱ्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांशी चित्ताचा संबंध आल्याने त्याविषयी आसक्ती उत्पन्न होणे म्हणजे अविराग होय. योगसाधना करत असताना चित्त या विषयांकडे आकृष्ट झाल्यास चित्ताची ती आसक्ती साधनेत विघ्न निर्माण करते.
(७) भ्रान्तिदर्शन : विपरीत किंवा भ्रमरूप ज्ञान म्हणजे भ्रान्तिदर्शन होय. एखादी वस्तू जशी आहे तशी न जाणता तिचे त्यापेक्षा वेगळे ज्ञान होत असेल म्हणजेच यथार्थ ज्ञान होत नसेल, तर ते भ्रमरूप ज्ञान योगमार्गात विघ्न उत्पन्न करते.
(८) अलब्धभूमिकत्व : योग्याने प्रयत्न करूनही काही न काही कारणामुळे योगातील एखाद्या स्थानाची किंवा लक्ष्याची प्राप्ती न होणे म्हणजे अलब्धभूमिकत्व होय.
(९) अनवस्थितत्व : योगातील विशिष्ट स्थान किंवा लक्ष्य प्राप्त होऊनही तेथे स्थिरता प्राप्त न होणे म्हणजे अनवस्थितत्व होय.
योगसाधकाला साधनेमध्ये ही सर्व विघ्ने येतीलच असे नाही किंवा या अंतरायांमध्ये काही पौर्वापर्य आहे असेही नाही. कोणकोणती विघ्ने येऊ शकतात, त्या सर्वांचा नामोल्लेख पतंजलींनी केला आहे. या नऊ अंतरायांना साहाय्य करणारे इतरही पाच घटक महर्षी पतंजलींनी (योगसूत्र १.३१) सांगितलेले आहेत. यांना विक्षेप-सहभू अशी संज्ञा आहे. ईश्वराची समर्पित भावाने भक्ती केल्यास या अंतरायांचा नाश होतो. स्वात्माराम योगींनीही हठयोगप्रदीपिका (१.१५) या ग्रंथात योगाला नष्ट करणाऱ्या सहा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे – अत्याहार (प्रमाणापेक्षा अधिक भोजन करणे), प्रयास (अधिक श्रम), प्रजल्प (निरर्थक बडबड), नियमाग्रह (नियमांचे पालन करण्यात अत्याधिक काटेकोरपणा), जनसंग (लोकांचा अनावश्यक संपर्क) आणि लौल्य (चंचलता). या सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश झाल्यावर योगी आपल्या साधनेत अग्रेसर होऊन समाधीद्वारे कैवल्यस्थिती प्राप्त करण्यास समर्थ होतो.
पहा : चित्त, वैराग्य., समाधि.
संदर्भ :
- आगाशे, काशिनाथशास्त्री, संपा. पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
- Digambaraji, Swami & Kokaje, Raghunatha Shastri, Haṭhapradīpikā of Svātmārāma, Pune, 1998.
समीक्षक : कला आचार्य