सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा व कोयना या नद्याखोऱ्यांत आढळली.

त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती; मात्र जिल्ह्यात विस्तृत उत्खनन व शास्त्रीय दृष्ट्या अन्वेषण झालेले नाही. सातवाहनांची (इ. स. पू. सु. २०० – इ. स. ३००) सत्ता या प्रदेशावर होती. तत्कालीन वरवंटे, जाती, खापरे इत्यादी अवशेष वाईच्या किवरा ओढ्याच्या परिसरात आढळले आहेत. तसेच या काळात काही हीनयान बौद्धलेणी कराड-वाई (लोहारे) येथे खोदली असून शिरवळ, कुंडल, भोसे, माळेवाडी आदी ठिकाणी त्याकाळी गुंफा खोदल्या होत्या. भारहूत (मध्यप्रदेश) स्तूपाच्या अभिलेखात करहाटक (कराड) येथील यात्रेकरुंनी अनुदान दिल्याचा उल्लेख आढळतो.
सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकुटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५० – ३७५) याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती; हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४,०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्त सम्राटांचा पाठिंबा होता. राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इत्यादी संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्त राजा दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (सहावे-सातवे शतक) याच्या खानापूर ताम्रपटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या ग्रामांचा उल्लेख आहे. शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तेथे आपला भाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली. बादामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (इ. स. ७५३ – ९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंद राजे आपल्या लेखात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वर’ असा निर्देश करतात. यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंद राजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५० – १०७५) याच्या ताम्रपटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.

शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते; तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत; मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इत्यादी ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७ – १५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश

बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८ – १३७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. यानंतर हुमायूनशाह जालीम (कार. १४५८ – १४६१), निजामुद्दीन (कार. १४६१ – १४६३) आणि तिसरा मुहंदशाह (कार. १४६३ – १४८२) हे सुलतान झाले. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याच काळात छ. शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ. राजारामांनी सातारा ही मराठ्यांची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली. प्रतापसिंह भोसले (कार. १८०८ – १८३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता. पुढे सुरुवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते (१८५८). नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता (१९४७).
स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनांत जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिरोड्याच्या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक सत्याग्रही सामील झाले होते. काँग्रेस समितीने ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर केला. त्याच दिवशी मुंबईतच सातारकरांच्या भूमिगत कारवायाचा प्रारंभ झाला. भूमिगत झाल्याने बहुसंख्य आंदोलक अटक टाळू शकले. त्यामुळे या जिल्ह्यातील आंदोलन दीर्घकाळ टिकून राहिले. गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा येथे उपयोग करण्यात आला. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसनवीर, वसंतदादा पाटील, बाबुराव चरणकर, बरडे मास्तर, बाबुराव पाटणकर इत्यादींचे नेतृत्व या आंदोलनाला लाभले होते. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) योजना आखली. महाराष्ट्रातील भूमिगत आंदोलनांचे सर्वांत दैदीप्यमान शिखर म्हणजे साताऱ्याचे प्रतिसरकार होय.
स्वातंत्र्योत्तर काळात औंध, फलटणबरोबरच सांगली, मिरज, जत ही संस्थानेही सातारा जिल्ह्यातच समाविष्ट करण्यात आली. परिणामी सातारा जिल्हा आकारमानाने मोठा होऊन प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला. त्यामुळे १ ऑगस्ट १९४९ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात, तर उत्तर सातारा जिल्ह्याचे रूपांतर सातारा जिल्ह्यात करण्यात आले.
समीक्षक : वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.