घरे (निवारा) (House, Shelter)
निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. आदिम काळापासून मानवाने आपल्या निवाऱ्याची गरज विविध स्वरूपात भागवली आहे. ज्या काळात मानवाकडे घर बांधण्याची कला अवगत नव्हती, त्या काळात त्याने गुहेसारख्या नैसर्गिक निवाऱ्याचा उपयोग केला. नैसर्गिक आपत्तींपासून (उन्हाळा, वारा, पाऊस, थंडी, इ.) संरक्षण मिळवण्यासाठी या नैसर्गिक निवाऱ्याचा त्याला उपयोग झाला. वृक्षसुद्धा काही प्रमाणात त्याची ही गरज भागवू शकत होते. विशेषत्वे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी वृक्षांचा त्याला उपयोग होत होता, परंतु टोकाच्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला अधिक चांगल्या निवाऱ्याची आवश्यकता होती.
मानवी संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला, तसतसे त्याच्या निवाऱ्याचे स्वरूप देखील विकसित होत गेले. अगदी नैसर्गिक वृक्ष आणि गुहा यापासून ते आजच्या काळातल्या गगनचुंबी इमारतीपर्यंत मानवाच्या निवाऱ्याच्या स्वरूपात बदल घडत गेला आहे. मानवी उत्क्रांतीचे ३ प्रमुख कालखंड आहेत. १) अश्म युग, २) कांस्य युग ३) लोह युग. या ३ कालखंडात मानवी निवाऱ्यांचे स्वरूप त्या काळात मानवाने विकसित केलेली हत्यारे, अवजारे आणि कौशल्ये यांवर अवलंबून होते. अश्म युगात गुहेत राहणारा मानव दगडी हत्यारे आणि अवजारे बनवू लागल्यानंतर दगड आणि झाडांच्या फांद्यांपासून बनवलेल्या निवाऱ्यात राहू लागला. तसेच पुढे त्याने प्राण्यांच्या कातडी आणि मोठ्या प्राण्यांची हाडे याचाही घरबांधणीसाठी वापर सुरू केला. अश्म युगाचे पुराश्म युग, मध्याश्म युग आणि नवाश्म युग असे तीन प्रमुख भाग पडतात. पुराश्म युगात भटक्या अवस्थेत जगणाऱ्या मानवाला नवाश्म युगात शेती आणि पशुपालनाची कला अवगत झाली. शेतीमुळे त्याच्या जीवनात स्थिरता आली आणि तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला. या काळात त्याने नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या झाडांच्या फांद्या, दगड, गवत आणि प्राण्यांची कातडी अश्या साधनसामग्रीचा वापर घरबांधणीसाठी केला. पुराश्म युगाचा काळ हा सुमारे २० लक्ष वर्षांपूर्वीचा तर मध्याश्म युगाचा काळ हा इसपू. २०००० ते ९५०० वर्षे हा आहे. नवाश्म युगाचा काळ साधारणपणे इसपू. ९००० ते ४५०० वर्षे मानला जातो. याच काळात नद्यांकाठी मानवी संस्कृतीचा उदय झाला. नाईल नदीकाठची इजिप्शिअन संस्कृती, भारतातील सिंधू संस्कृती, युफ्रेटीस आणि तिग्रिस नद्यांकाठची मेसोपोटेमियन संस्कृती आणि पिवळ्या (हुआंग हे) नदीकाठची चिनी संस्कृती ही त्याची प्रमुख उदाहरणे होत. मानवाच्या प्रगत जीवनाची आणि राहणीमानाची बीजे याच नदी संस्कृतीमध्ये रुजलेली आहेत असे म्हणावयास हरकत नाही. या नदीखोऱ्यातल्या संस्कृतीपासूनच मानवनिर्मित साधनसामुग्रीचा उपयोग घरबांधणीसाठी होऊ लागला. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले दगड, लाकूड याव्यतिरिक्त उन्हात वाळवलेल्या मानवनिर्मित मातीच्या विटांचा वापर घरबांधणीसाठी होऊ लागला. इथंपासून नंतरच्या काळात माणूस कच्च्या स्वरूपाच्या घरांऐवजी पक्क्या घरांमध्ये राहू लागला. घरबांधणीच्या तंत्राइतकाच मानवी वस्तीचा विकास हे या काळाचं वैशिष्ट्ये म्हणता येईल. रस्तेबांधणी, पाणीपुरवठा, सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि सार्वजनिक एकत्रीकरणाच्या जागा ही नगररचनेची वैशिष्ट्ये या काळात प्रामुख्यानं विकसित झाली. पुढच्या काळात मानवाने जसजसे नवनवीन शोध लावले, तसतशी बांधकाम साहित्याची निर्मिती आणि वापर यातही त्याने प्रगती केली. या प्रगतीचं घरबांधणीच्या स्वरूपात झालेल्या बदलात प्रतिबिंब दिसून येतं.
औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात एकूणच घरबांधणी आणि नगररचना या दोन्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला. आधुनिक काळातल्या घर रचनेचे खालील वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करता येईल :
१) बांधकामाच्या मजबूतपणावर आधारित –
अ. कच्ची घरे
ब. तात्पुरती घरे
क. पक्की घरे
२) वास्तुरचनेवर आधारित –
अ. स्वतंत्र बंगला
ब. जोड किंवा जुळा बंगला
क. दोन्ही बाजूना सामाईक भिंत असलेली रांगेतली घरे
ड. सदनिका
इ. गगनचुंबी इमारतीतील सदनिका
ई. चाळ
फ. वाडे
ग. हवेली
ह. राजवाडे / महाल
ज. घरांचा समूह
३) लोकसंख्येच्या /घरांच्या घनतेवर आधारित:
अ. कमी उंचीची कमी घनतेची घरे
ब. कमी उंचीची जास्त घनतेची घरे
क. मध्यम उंचीची मध्यम घनतेची घरे
ड. जास्त उंचीची जास्त घनतेची घरे
४) कौटुंबिक उत्पन्नावर आधारित :
अ. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांची घरे
ब. कमी उत्पन्नवर्गीयांसाठीची घरे
क. मध्यम उत्पन्नवर्गीयांसाठीची घरे
ड. उच्च उत्पन्नवर्गीयांसाठीची घरे
संदर्भ :
- चिं. ग. कर्वे, मानवी संस्कृतीचा इतिहास,वरदा प्रकाशन,
- http://www.mpscworld.com/manavi-jivanacha-etihas
- https://www.slideshare.net/aswinkumar14224/prehistoric-culture-shelter
समीक्षक : श्रीपाद भालेराव