बेकर, हेन्री फ्रेडरिक : (३ जुलै १८६६ – १७ मार्च १९५६)
बैजिक भूमिती (Algebraic Geometry), आंशिक विकलक समीकरणे (Partial Differential Equations) आणि ली-ग्रुपवर (Lie Group) संशोधन करणारे ते ब्रिटीश गणितज्ञ होते. इंग्लंडच्या केंब्रिजमधील काही छोट्या शाळांमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १८८४ ला ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १८८७ साली सिनीअर रॅन्गलर झाले. १८८९ मध्ये ते सेंट जॉन्स महाविद्यालयाचे फेलो म्हणून निवडले गेले आणि त्याच वर्षी सुरु झालेले पहिले स्मिथ पारितोषिक त्यांना मिळाले.
हेन्री बेकर यांनी आपली संपूर्ण कारकीर्द केंब्रिज येथे शुद्ध गणिताचे (Pure Mathematics) अध्यापन करण्यात व्यतीत केली. ते १८९०-९५ या काळात महाविद्यालयात व्याख्याते होते. त्यांच्यावर आर्थर केले या गणितज्ज्ञाचा खूप प्रभाव होता. ते बेकर यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. त्यानंतर १९१४ पर्यंत त्यांनी विद्यापीठात व्याख्याते म्हणून काम केले. १९१४ ते १९३६ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी खगोलशास्त्र आणि भूमितीचे प्राध्यापक म्हणून काम केले. खगोलशास्त्राचे प्राध्यापक म्हणून खगोलशास्त्र शिकवण्याबरोबर त्यांनी आपले शुद्ध गणितातील संशोधन सुरूच ठेवले होते.
जर्मन गणितज्ज्ञ क्लेन त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी अबेल्स थिअरमअँड अलाइड थिअरी ऑफ थिटा फंक्शन्स हे पुस्तक १८९७ मध्ये प्रसिद्ध केले. १९०७ साली त्यांचे मल्टीपल पिरिओडीकफंक्शन्स हे पुस्तक प्रकाशित झाले.
हेन्री बेकर यांनी भूमितीचा सखोल अभ्यास करुन १९२२ ते १९३३ या काळात भूमितीवर प्रिन्सिपल्स ऑफ जिऑमेट्री या नावाचा ग्रंथ सहा खंडांत प्रसिद्ध केला. त्यातील पहिल्या दोन खंडांत यूक्लीडची प्रतल भूमिती आणि निर्देशक भूमिती यांचा समावेश आहे. तिसऱ्या खंडात त्रिमिती भूमिती आहे. चौथ्या खंडात चतुर्मितीय आणि पंचमितीय भूमितीचा प्रामुख्याने समावेश आहे तर पाचव्या आणि सहाव्या खंडात थिअरी ऑफ कर्व्हज, थिअरी ऑफ आलजिब्राइक सरफेसेस आणि हायर लोकी यांचा समावेश आहे. हे सहा खंड गणिती विश्वासाठी एक मोठे योगदान मानले जाते. तसेच १९४३ मध्ये ॲन इंट्रोडक्शन टू प्लेन जॉमेट्री हे प्रतलीय भूमितीतील महत्त्वाच्या संकल्पनांचे विवेचन करणारे त्यांचे आणखीन एक पुस्तक प्रकाशित झाले.
१९०४-१२ या कालावधीत सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ जेम्स जोसेफ सिल्वेस्टर यांच्या शोधलेखांचे संपादन चार खंडात, कलेक्टेड मॅथेमॅटिकल वर्क्स ऑफ जेम्स जोसेफ सिल्वेस्टर या नावाने बेकर यांनी प्रसिद्ध केले आणि सिल्वेस्टर या थोर गणिततज्ज्ञाला खऱ्या अर्थाने श्रध्दांजली वाहिली.
बेकार यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यानी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. हेन्री बेकर यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. १८९७ चा सेक्रेटरी ऑफ द केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी, १८९८ चा फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, १९०५ चा डि मॉर्गन मेडल आणि १९१० चा सिल्वेस्टर मेडल हे त्यातील प्रमुख आहेत.
संदर्भ :
- http://www–history.st-and.ac.uk/Biographies/Baker.html
- https://www.magnoliabox.com/products/portrait-of-henry-frederick-baker-1866-1956-rs-7747
समीक्षक: विवेक पाटकर