क्रिक, फ्रॅंसिस : (८ जून, १९१६–२८ जुलै, २००४)
फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक यांचा जन्म इंग्लंडमधील नॉर्थ हॅम्पटन परगण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण नॉर्थ हॅम्पटन ग्रामर स्कूल आणि नंतर लंडनच्या मिल हिल स्कूलमध्ये झाले. लंडन विद्यापीठाच्या महाविद्यालयातून त्यांनी भौतिकी विषयात बी. एस्सी. पदवी प्राप्त केली. अँड्रेड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी.साठी आपला अभ्यास सुरू केला. पण दुसऱ्या महायुद्धामुळे त्याच्या शिक्षणात खंड पडला. युद्धकाळात त्यांनी इंग्लंडच्या आरमारात सेवा केली. युद्ध समाप्त झाल्यावर त्यांनी आरमारातील नोकरी सोडून आपले शिक्षण पुढे सुरू केले.
जीवशास्त्राविषयी कुतुहूल निर्माण झाल्यामुळे त्यांनी आपला अभ्यास याच विषयात सुरू केला. त्यांना जीवशास्त्र आणि कार्बनीरसायनशास्त्र या दोन्ही विषयांचे अगदी जुजबी ज्ञान होते. परंतु या दोन्ही विषयांचा त्यांनी जिद्दीने अभ्यास केला. प्रथिनांच्या स्फटिकांच्या अभ्यासासाठी क्ष-किरण विचलन (डेव्हिएशन) पद्धती शिकून आत्मसात केली. कॉक्रेन आणि व्हॅन्ड या दोन ज्येष्ठ सहाध्यायांबरोबर त्यांनी आवर्ती (पिरियोडिक) धाग्यांच्या क्ष-किरण विचलनासंबंधी एक सिद्धांत मांडण्यापर्यंत मजल मारली. दोन वर्षे त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील स्ट्रेंजवेज प्रयोगशाळेत काम केले. पुढे त्यांनी डॉक्टर पेरूझ यांच्या नेतृत्वाखालील मेडिकल रिसर्च काउन्सिलमध्ये काम सुरू केले. नंतर त्यांनी क्ष-किरण विचलन: पॉलिपेप्टाइड्स आणि प्रथिने या प्रबंधासाठी केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली. त्यांनी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन पॉलिटेक्निक संस्थेत एक वर्षांसाठी प्रथिनांच्या रचनेवर काम केले.
क्रिक यांच्या संशोधनाचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे जैविक रेणूंमध्ये नेमका कसा आणि कधी जीव निर्माण होतो ? आणि दुसरा म्हणजे मेंदू आणि सद्सद्विवेक बुद्धी किंवा सारासार विचार करणारे मन यातील परस्परसंबंध कसा असेल ? त्यांच्यावर प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ लिनस पॉलिंग आणि क्वांटम भौतिकीशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंजर या दोघांचाही प्रभाव पडला होता. पेशींमधील जनुकांमध्ये आनुवंशिक माहिती साठवून ठेवण्यासाठी त्याच्या रचनेत कोव्हॅलंट बंध मोलाची कामगिरी बजावतात हा सिद्धांत त्यावेळी सर्वांनी स्वीकारला होता. कोणत्या रेणूमध्ये ही आनुवंशिक माहिती आहे एव्हढेच सिद्ध करणे बाकी होते. क्रिक यांच्या मते चार्लस डार्विन यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत, ग्रेगर मेंडेल यांचे आनुवंशिकशास्त्र आणि आनुवंशिकतेचे रेण्विय स्वरूप या तिन्हींचा एकत्रित परिपाक म्हणजे जीवनरहस्य. त्यांना अशी खात्री वाटत होती की या ज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळेतील परीक्षा नलिकेत जीव निर्माण करता येऊ शकेल. त्यांच्या हयातीत ही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. प्रथिनांसारखा एखादा मोठा रेणू आनुवंशिक माहितीचा खजिना असावा असा तर्क त्यावेळी प्रबळ होता. प्रथिनांचे पेशी बांधणीतील स्थान आणि चयापचय क्रियेत विकरांच्या स्वरूपातील त्यांचा सहभाग प्रथिनांमध्ये आनुवंशिक माहिती दडली असेल या तर्काला छेद देत होता. परंतु हा मोठा जैविक रेणू प्रथिनांसारखाच असला पाहिजे यावर जवळजवळ एकमत होते. १९४० च्या सुमारास रेणुसूत्रांमधील आणखी एक जैविक रेणू डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणजेच डी.एन.ए. हा या आनुवंशिक माहितीचा उद्गम असेल असे पुरावे पुढे येऊ लागले होते. ओस्वाल्ड एव्हरी आणि त्यांच्या मदतनीसांनी एका विशिष्ट डी.एन.ए. रेणूंमुळे जीवाणूंमध्ये होणारे दृश्य बदल आनुवंशिक असतात हे त्या सुमारास सिद्ध केले होते.
१९५१ च्या सुमारास त्यांची ओळख जेम्स वॉटसन (S–हायपरलींक) यांच्या बरोबर झाली. आनुवंशिक माहिती रेण्विय स्वरूपात कशी साठवून ठेवली जात असेल या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या चर्चेदरम्यान त्यांच्या हाती विल्किन्स आणि रोझालिंड फ्रँकलिन यांनी क्ष-किरण विचलनाने शोधलेल्या डी. एन. ए. रेणूच्या काही महत्वाच्या प्रतिमा आल्या. डी.एन.ए. या जनुकीय रेणूच्या दुहेरी आवर्ती धाग्याच्या रचनेविषयी जेम्स वॉटसन संशोधन करीत होते. वॉटसन आणि क्रिक यांनी मॉरिस विल्किन्स आणि रोझालिंड फ्रँकलिन यांच्या निरीक्षणांवर आधारित ही रचना कशी असेल याविषयी एक विस्तृत सिद्धांत मांडला. त्यांच्या पहिल्या मॉडेलमध्ये बऱ्याच चुका होत्या. त्यांनी त्या मॉडेलमध्ये फॉस्फेट ग्रुप रेणूच्या मध्यभागी असतात असे दर्शविले होते. परंतु रोझालिंड फ्रँकलिन यांचे रसायनशास्त्राचे पायाभूत ज्ञान त्यांना ह्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडल्या. फ्रँकलिन यांच्या म्हणण्यानुसार फॉस्फेट ग्रटाचे जलाकर्षक स्वरूप लक्षात घेता हे ग्रुप मुख्य रेणूच्या बाहेरच्या अंगाला असले पाहिजेत म्हणजे त्यांची पेशीद्रावणातील पाण्याशी आंतरक्रिया होऊ शकेल आणि जलरोधक ग्रट रेणूच्या आतल्या बाजूला असले पाहिजेत. त्यांनी मग पुन्हा विल्किन्स यांच्याशी विस्तृत चर्चा केली आणि आपले डी. एन. ए. चे सुधारित मॉडेल जाहीर केले. त्यासाठी वॉटसन, क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना १९६२ साली वैद्यकीय क्षेत्रासाठी असलेला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मध्यंतरीच्या काळात दुर्दैवाने फ्रँकलिन यांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता आणि नोबेल समितीच्या नियमाप्रमाणे हे पारितोषिक मरणोत्तर देता येत नाही. गंमतीचा भाग असा की वॉटसन आणि क्रिक ह्या दोघांच्याही संशोधनाचा डी.एन.ए. रेणूची रचना आणि त्याचे कोडे उलगडणे हा नव्हता. क्रिक यांचे काम प्रथिनांवर चालले होते तर जेम्स वॉटसन यांना डॉक्टरेट पदवी मिळाली होती आणि तंबाखूच्या विषाणूंच्या डी.एन.ए. वरचा त्यांचा अभ्यास चालू होता. अशावेळी मॉरिस विल्किन्स आणि रोझालिंडा फ्रँकलिन यांच्या अभ्यासातून हाती आलेल्या क्ष किरण विचलन प्रतिमा त्याच्या हातात आल्या आणि सजीवांच्या सजीवतेचे रहस्य उलगडण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरले.
ब्रुकलिन पॉलिटेक्निक संस्थेतील कार्यकाळ पुरा करून क्रिक केंब्रिज विद्यापीठात गेले आणि तेथे त्यांनी संशोधन क्षेत्रात काम केले. त्यांचे या काळातील महत्त्वाचे संशोधन म्हणजे प्रथिनांच्या संश्लेषणात जिला मध्यवर्ती साचा म्हणता येईल त्याची मांडणी हे आहे. डी.एन ए.मध्ये असलेली माहिती प्रथम आर.एन.ए. या रेणूत रूपांतरित होते आणि मग तिचे भाषांतर होत प्रथिनांचे संश्लेषण होते हा तो मध्यवर्ती साचा आहे. आपल्या या कल्पनेला प्रायोगिक पुरावा देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयोग केले. उत्तर आयुष्यात क्रिक यांनी साल्क इन्स्टिट्यूटमध्ये न्यूरोबायालॉजीवर मौलिक संशोधन केले.
कर्करोगाने ग्रासलेल्या फ्रॅन्सिस क्रिक यांचा कॅलिफोर्नियातील सॅन डियागो येथे मृत्यू झाला.
संदर्भ :
- Newman M.H.A.(1955) Allen Mathison Turing’ 1912-1954. Biographical Memoirs of fellows of the Royal Society 1 203 doi.10 1098/rsbm 1055 0019
- Whittaker (1955) ‘Biographical Memoirs of fellows of the Royal Society’ 137 doi.10 1098/rsbm.1955 0005
समीक्षक : रंजन गर्गे