ग्लेझर, डोनाल्ड आर्थर : ( २१ सप्टेबर १९२६ – २८ फेबृवारी २०१३ )
डोनाल्ड आर्थर ग्लेझर यांचा जन्म अमेरिकेत ओहायो, क्लीवलंड येथे झाला. त्यांचे वडील विल्यम जे. ग्लेझर उद्योगपती होते. क्लीवलंडमधील वेगवेगळ्या पब्लिक स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १९४६ साली केस स्कूल ऑफ अप्लाइड सायन्समधून त्यांनी भौतिकशास्त्र व गणित विषयात पदवी मिळवली. १९४९ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्रातील पीएच्.डी. व लगेचच पुढील वर्षी गणितात पीएच्.डी. मिळवली. त्यांच्या प्रबंधाचे काम चालू असता त्यांनी प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अॅन्डरसन यांच्याबरोबर क्लाउड चेंबर आणि विश्वकिरणावर काम केले. त्यांचा स्वत:चा डॉक्टरेटचा प्रबंध समुद्र सपाटीस भारीत विश्वकिरणाचे गति वितरण या विषयावर होता.
पीएच्.डी. नंतर त्यांना १९४९ साली मिशिगन युनिव्हार्सिटीमध्ये संशोधन व पदव्युत्तर वर्गांना शिकवण्याची संधी मिळाली. १९५७ साली ते प्रोफेसर झाले.
मूलकण (आवाणु, subatomic particles) हे डोनाल्ड ग्लेझर ह्यांच्या आवडीचे क्षेत्र होते. मूलकण म्हणजे अणूच्या अंतरंगातील कण. कार्ल अँडरसन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयोगशाळेत वैश्विक किरणांवर डोनाल्ड ग्लेझर काम करत. तेव्हा ते क्लाऊड (विल्सन) चेंबर नावाचे एक उपकरण वापरत. क्लाऊड चेंबर ह्या थंड हवेने भरलेल्या छोट्याशा भांड्यातून अणूच्या आतील छोटे अल्फा / बीटा कण वेगाने पसार होतात. अशा ऊर्जाभारित कणांभोवती लहान जलबिंदू जमा होतात. मूलकण अतिसूक्ष्म असल्याने दिसत नाहीत. परंतु त्यांच्याभोवती जलबिंदू जमले की त्यांचा एकत्रित आकार मोठा होई. त्यांचा मार्ग फोटो काढण्या योग्य दिसू लागे.
क्लाऊड चेंबरचा वापर साधारण १९३० पासून १९६० पर्यंत होत राहिला. त्याच्या मर्यादांमुळे क्लाऊड चेंबरचा वापर कमी होत गेला. डोनाल्ड ग्लेझर यांनी शोधलेले बबल चेंबर त्यानंतरची वीस पंचवीस वर्षे वापरले गेले. डोनाल्ड ग्लेझर यांनी बबल चेंबर हा एक छोटासा खिडक्या असलेला कुकर आहे असे म्हटले होते. त्यांनी बनवलेले बबल चेंबर जेमतेम अडीच सेंटीमीटर आकाराचे होते. त्यात झेनॉनसारखा अतितप्त द्रव होता. त्यावर प्रचंड दाब दिला जात असे. तापमान उत्कलन बिंदूपेक्षा थोडे कमी ठेवले जात असे.
त्यातून निसटून जाणाऱ्या सूक्ष्म अणू कणामागे सूक्ष्म बुडबुडे दिसत. त्यावरून अणू कणांचा माग काढता येत होता. त्याचे त्रिमित छायाचित्रण करता येत होते. क्लाऊड चेंबरपेक्षा बबल चेंबर जास्त कार्यक्षम ठरले. १९५२ मध्ये शोधल्यापासून वीस पंचवीस वर्षे बबल चेंबर मूलकणांच्या शोधासाठी वापरले गेले. बबल चेंबरचा आकार विस्तारला परंतु त्याचा उपयोग वाढत गेला. त्याचा आकार विस्तारत गेला. डोनाल्ड ग्लेझर यांना १९६० साली भौतिकविज्ञानातील नोबेल पुरस्कार बबल चेंबरच्या शोधासाठी मिळाला आहे. विशेष म्हणजे हा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला तेव्हा ते ते केवळ ३४ वर्षाचे युवक होते.
डोनाल्ड ग्लेझर यांना त्यानंतर रेण्वीय जीवशास्त्रात रुची निर्माण झाली. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत त्यांनी विषाणू आणि जीवाणू ह्यांचा अभ्यास केला. तसेच त्वचेच्या कर्करोगावर संशोधन सुरू केले. ह्या कामातूनच नंतर सीटस कॉर्पोरेशनचा उगम झाला. परिणामत: इंटरल्यूकीन-२ आणि इंटरफेरॉनही कर्करोग बरा करण्यासाठी उपयोगी अशी दोन औषधे बनू लागली.
डोनाल्ड ग्लेझर ह्यांनी १९७१ मध्ये सीटस कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन केली. कंपनीचा गाभा जैवतंत्रज्ञान हा त्यांच्या आवडीचा भाग होता. अत्यंत आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापर त्यांनी या कंपनीमध्ये केला. जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करणारी औषधे बनवणारी ही जगातील पहिली कंपनी. इंटरल्यूकिन-२ आणि इंटरफेरॉनही दोन औषधे सीटस कॉर्पोरेशन बनवत असे.
आणखी काही काळाने डोनाल्ड ग्लेझर ह्यांना चेतापेशींच्या कामाचा अभ्यास करावा असे वाटू लागले. मुख्यत: मानवी दृष्टी आणि मेंदू ह्यातील संबंध समजून घ्यावा याचा ध्यास त्यांना लागला. मेंदूत दृष्टी प्रक्रिया कशी घडून येते याचे एक संगणकीय प्रारूप (मॉडेल) त्यानी तयार केले.
त्यांचे बर्कले, कॅलिफोर्निया येथे झोपेत निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/1960/glaser-bio.html
- Glaser, Donald A., Hierarchical Learning of Complex Systems,1996.
- Glaser, Donald A., Computational and Psychophysical Study of Human Vision Using Neural Networks,1989.
- Glaser, Donald A., Bubble Chamber: “Some Effects of Ionizing Radiation on the Formation of Bubbles in Liquids” (Physical Review: Volume 87 No. 4 P. 665), Jan 1, 1952.
- Glaser, Donald A., http://glaser.library.caltech.edu/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा