मायर, अर्नस्ट वाल्टर : ( ५ जुलै, १९०४ – ३ फेब्रुवारी, २००५ )
अर्नस्ट वाल्टर मायर यांचा जन्म जर्मनी येथील केम्पटन या शहरात झाला. वडील व्यवसायाने वकील असले तरी त्यांना निसर्गविज्ञानाची आवड होती. मुलांना निसर्ग समजावा म्हणून ते त्यांना निसर्ग भेटीसाठी बरोबर नेत. वडलांच्या निधनानंतर मायर कुटुंब ड्रेस्डनमध्ये स्थायिक झाले. मायर यांनी स्टाटस जिम्नाशियम (Stats gymnasium – Royal Gymnasium) येथे आपले माध्यमिक शिक्षण घेत असताना ते सॅक्सोनी ऑर्निथॉलॉजिस्ट ॲसोसिएशन (Saxony Ornithologists’ Association) या पक्ष्यांविषयीच्या संस्थेचे सदस्य होते. येथेच, पक्षी अभ्यासक रुडॉल्फ झिमरमन ( Rudolf Zimmerman) त्यांच्याशी त्यांचा परिचय झाला. मायर यांची पक्षी निरीक्षणातील आवड पाहून, झिमरमन यांनी त्यांचे पालकत्व स्विकारायचे ठरवले. ग्रेफस्वाल्ड (Greifswald) विद्यापीठ तसे खूप नामांकित नव्हते. तरीही मायर यांनी तेथेच औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेश घेतला कारण तेथील परिसरातील विविध जातींचे पक्षी दिसत असत.
एर्विन स्ट्रासमन (Erwin Stresemann) यांनी मायर यांना पक्षी अभ्यासातील कौशल्यच आयुष्यभर जपण्याचा सल्ला दिला. बर्लिन विद्यापीठातून वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी मायर यांनी पक्षीनिरीक्षणशास्त्रातील पीएच.डी. पदवी संपादन केली. पाठोपाठ ते बर्लिन म्युझिअममध्ये रुजू झाले. पुढे त्यांची वॉल्टर रॉथशील्ड (Walter Rothschild) यांच्याशी प्राणीशास्त्र परिषदेत ओळख झाली. वॉल्टर रॉथशील्ड व्यवसायाने बँकर असले तरी निसर्गप्रेमी होते. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमार्फत आखलेल्या मोहिमेच्या प्रमुखपदी वॉल्टर रॉथशील्ड यांची नियुक्ती झाली.
न्यूगिनी (New Guinea) येथे पक्ष्यांच्या कातड्यांवरून त्यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण केले. ऑर्किडच्या ३८ नव्या जाती त्यांनी शोधल्या. हर्मन डेट्झनरच्या फोर इयर्स अमंग द कानिबाल्स इन जर्मन न्यूगिनी फ्रॉम १९१४ टु द ट्रस (‘Four Years among the Cannibals in German Guinea from 1914 to the Truce’) या पुस्तकातील विसंगती त्यानी दाखवून दिली. १९४२ मध्ये लिहिलेल्या सिस्टेमॅटिक्स अॅन्ड ओरिजिन ऑफ स्पेसिस (‘Systematics and the Origin of Species’) या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात सजीवांच्या जातीची सुधारित संकल्पना मांडली. वर्गीकरणशास्त्रज्ञ, विषुववृत्तीय संशोधक, पक्षी अभ्यासक, विज्ञानातील इतिहास घडवणारे मायर यांचा संख्या आनुवंशिकी आणि उत्क्रांतीच्या सिद्धांतांचा अभ्यास मांडला होता. पक्षीवर्गीकरण विज्ञानावर १०० हून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. सजीवांच्या जातीतील सुधारणा ही संकल्पना त्यांनी मांडल्यामुळे त्यांना डार्विन-वॅलॅस पदकाने गौरवण्यात आले. समान बाह्यलक्षणाबरोबर आंतरप्रजनन जाती ठरविणे आवश्यक आहे असे त्यानी सांगितले. त्यावरून पक्ष्यांच्या २५ नव्या जाती आणि ४१० उपजाती त्यांनी जगासमोर आणल्या.
हार्वर्ड विद्यापीठात १९६० पासून १९७० पर्यंत शिकवीत असताना म्युझियम ऑफ कम्पॅरीटिव्ह झूऑलॉजीचे ते संचालक होते.
अर्नस्ट वाल्टर मायर १०१ वर्षे जगले, त्यांना विसाव्या शतकातील एक मूलभूत संशोधन करणारे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते नॅशनल मेडल ऑफ सायन्स फॉर बायॉलॉजिकल स्टडीज या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. जीवशास्त्रातील मूलभूत संशोधनाबद्दल त्यांना इंटरनॅशनल प्राइझ फॉर बायॉलॉजी बहाल करण्यात आले. आयुष्यात अखेरच्या वर्षांमधे जीवनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी जीवशास्त्राची गरज हे विज्ञानाचे तत्त्वज्ञान म्हणून स्विकारले जावे यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. बेडफोर्ड या शहरात वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे निधन झाले. हार्वर्ड विद्यापीठाने त्यांच्या जीवशास्त्रातील योगदानाचा सन्मान म्हणून अर्न्स्ट मायर लायब्ररी ऑफ द म्युझियम ऑफ कंपॅरिटिव्ह झूलॉजी या संस्थेची स्थापना केली.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा