चिमणी किंवा घर चिमणी हा पक्षिवर्गाच्या पॅसरिफॉर्मीस (Passeriformes) गणातील आणि पॅसरिडी (Passeridae) कुलातील पॅसर (Passer) प्रजातीच्या पंचवीस जातींपैकी एक पक्षी आहे. मूळचा युरोप, भूमध्य प्रदेश व आशियातील हा पक्षी आता सर्व जगभर पसरला आहे. मानवी वस्तीजवळ राहण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याची सर्वत्र स्वाभाविक वाढ झाली आहे. भारतात हिमालयाच्या २,००० मी. उंचीपर्यंत तो सगळीकडे आढळतो. भारतात हा पक्षी चिमणी या सामान्य नावाने परिचित असून काही ठिकाणी याला ‘तपकीर’ असेही म्हणतात.
चिमणीचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस (Passer domesticus) असे आहे. स्थानपरत्वे या जातीत बदल झाले आहेत. चिमणीची लांबी सु. १६ सेंमी. असून वजन १६–३९ ग्रॅ. भरते. नर चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असून गळा व डोळ्याभोवतीचा रंग काळा असतो. पाठ आणि पंख तांबूस काळसर असते. खालची बाजू पांढरी व शेपटी गर्द तपकिरी असते. मादी चिमणी भुरकट राखाडी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. खालची बाजू धुरकट पांढरी असते. नर व मादी चिमणीची चोच आखूड, जाड, मजबूत आणि तपकिरी रंगाची असून विणीच्या हंगामात ती काळी होते. चिमणीचे पाय तपकिरी असतात. पंख विशेष मजबूत नसल्यामुळे या पक्ष्याला एकसारखे लांब उडता येत नाही; जमिनीवर पावले टाकत चालता येत नाही. त्यामुळे तो टुणटुण उड्या मारतो.
चिमणी सर्वभक्षक आहे. सगळ्या प्रकारची धान्ये, किडे, सुरवंट, नाकतोडे, कोळी, कोवळ्या रोपांचे शेंडे वगैरे तिचे खाद्य आहे. शेतातील तयार कणसांवर चिमण्यांचे थवे हल्ला चढवून दाणे खातात आणि कणसांची नासाडी करतात. त्यांची घरटी सहसा झाडांवर आढळत नाहीत. घरातील झुंबरे, तसबिरींच्या मागची जागा, वापरण्यात नसलेले कोनाडे, भिंतीतली भोके, वळचणीची जागा इत्यादी ठिकाणी त्यांची घरटी असतात. गवत, कागद, लोकर, काथ्या, कापूस, चिंध्या, पिसे इत्यादींचा वापर करून नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात.
या पक्ष्याची वीण वर्षातून किमान तीनवेळा होते. घरटे तयार झाल्यावर मादी त्यात ३–५ अंडी घालते; ही अंडी पांढऱ्या रंगांची असून त्यात हिरव्या रंगाची छटा असते आणि त्यावर तपकिरी ठिपके असतात. अंड्यांच्या रंगांत स्थानिक प्रदेशानुसार बदल आढळतात. अंडी उबविणे तसेच पिलांचे संगोपन करणे ही कामे नर व मादी दोघे मिळून करतात.
रान चिमणी (yellow throated sparrow) : जिम्नोरिस प्रजातीतील या चिमणीचे शास्त्रीय नाव जिम्नोरिस झँथोकोलिस (Gymnoris xanthocollis) असे असून पूर्वीचे नाव पॅट्रोनिया झँथोकोलिस (Petronia xanthocollis ) होते. शहरी भागात ही फारशी आढळत नाही. ती प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात तसेच हरसूल, पेठ, इगतपुरी या भागांत आढळते. या चिमणीच्या गळ्यावर एक पिवळा ठिपका असतो, त्यामुळे तिला ‘पीतकंठी चिमणी’ असेही म्हणतात. पीतकंठी चिमणीमुळेच डॉ. सलीम अली पक्षीनिरीक्षणाकडे आकर्षिले गेले.
अलीकडे वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव चिमण्यांच्या संख्येवर तीव्रतेने दिसून येत आहे. आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची आणि अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा शेतातील वाढता वापर, नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, काही ठिकाणी अन्नासाठी म्हणून केली जाणारी शिकार यांसारख्या अनेक कारणांमुळे एकूणच चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यासंदर्भात नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागामार्फत जनजागृतीचे काम सुरू आहे. मोबाईल टॉवर्समधून होणाऱ्या विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे, याबाबत संशोधन सुरू आहे. घर चिमणीच्या संवर्धनासाठी दरवर्षी २० मार्च हा दिवस “जागतिक चिमणी” दिवस म्हणून साजरा केला जातो.
चिमण्यांचे आयुर्मान सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. चिमणीच्या डोक्यावर, मानेवर तसेच शरीरावर इतरत्र विविध रंगांचे आणि विविध आकाराचे ठिपके आढळतात. त्यावरून त्यांचे विविध जातींत वर्गीकरण करण्यात आले आहे (पहा चिमणी : विविध जाती).
संदर्भ :
- https://www.britannica.com/animal/sparrow
- https://www.britannica.com/animal/house-sparrow
- https://animaldiversity.org/accounts/Passer_domesticus/
- https://www.ijert.org/…/impact-of-electromagnetic-radiations-on-house-sparrows-passer-…
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/17454083
समीक्षक – कांचन एरंडे