दस्तुर, रुस्तुमजी होरमसजी : (७ मार्च, १८९६ – १ ऑक्टोबर, १९६१) रुस्तुमजी होरमसजी दस्तुर यांनी अहमदाबादच्या गुजरात कॉलेजातून बी.एस्सी. पदवी मिळवली आणि त्याच महाविद्यालयात त्यांनी वनस्पतीशास्त्राचे प्रयोग सहाय्यक म्हणून नोकरीला सुरुवात केली. हे करीत असताना तेथेच संशोधन करून त्यांनी एम.एस्सी. पदवी मिळवली. या महाविद्यालयात त्यांचा संपर्क वनस्पतीशास्त्रज्ञ डब्ल्यू. टी. सॅक्स्टॉन (W.T. Saxton) यांच्याबरोबर झाला आणि त्यांनी त्यांच्याकडून वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्र यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. रुस्तुमजी दस्तुर एक वर्षासाठी ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंग येथे गेले व त्यांनी डब्ल्यू. स्टाईल यांच्या बरोबर उपलब्ध पाणी आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेचा परस्परसंबंध यावर काम केले. त्यांचे हे निष्कर्ष
ॲनल्स ऑफ बॉटनी (३८:७७९;१९२४) या सुप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाले. पुढे वेगळे वळण घेऊन त्यांनी प्रकाशसंश्लेषणक्रियेचा अभ्यास पाने झाडावर असतानाच केला आणि निष्कर्ष ॲनल्स ऑफ बॉटनी (३९: ७६९;१९२५) मध्ये प्रसिद्ध केले.
परदेशातून परतल्यावर रुस्तुमजी दस्तुर मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये वनस्पतीशास्त्र विभागात अध्यापन करू लागले. त्यावेळी त्यांनी येथे प्लांट फिजिओलॉजी विभाग स्थापन केला. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत प्रकाश संश्लेषण क्रिया, पाणी आणि वनस्पती यामधील हरितद्रव्य यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाबद्दल संशोधन केले. तसेच प्रकाशाची गुणवत्ता आणि धृविकरणाचा परिणाम भाताच्या रोपांवर कसा होतो याचाही अभ्यास केला आणि निष्कर्ष ॲनल्स ऑफ बॉटनी, जर्नल ऑफ इंडियन बोटेनिकल सोसायटी व जर्नल ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्समध्ये प्रसिध्द केले.
रुस्तुमजी दस्तुर यांची रुची १९३५ सालानंतर शिक्षण क्षेत्राकडून उपयोजित वनस्पतीशरीरविज्ञान केंद्राकडे वळली आणि पुढची सव्वीस वर्षे त्यांनी कापसावर संशोधन केले. हा काल त्यांच्या वैज्ञानिक संशोधन कारकीर्दीचा महत्त्वाचा काळ ठरला. त्यांचे १९३५ ते १९४३ या काळातील संशोधन मोनोग्राफ या स्वरूपात प्रकाशित झाले आहे.या काळात कापसावर `तिरक` हारोग पसरला होता. पौष्टिक द्रव्याच्या अभावी पाने पिवळी पडणे आणि बोंड फुटणे याचा कापसाच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होत होता.
रुस्तुमजी दस्तुर यांना इंडियन सेन्ट्रल कमिटीने वरील समस्येवर अभ्यासकरण्यासाठी आमंत्रित केले. त्यांचे यावरील संशोधन कार्य आणि त्याचे परिणाम याचे पुनरावलोकन नेचर या जगप्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाले. (१५८:५२४,१९४६)
ते वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी जरी निवृत्त झाले तरी कॉटन कमिटीने त्यांना मानद स्वरूपात मार्गदर्शन करण्यासाठी शेवटपर्यंत ठेवले. त्यांच्या येथील संशोधनावर दोन मोनोग्राफ प्रसिद्ध झाले आहेत.
रुस्तुमजी दस्तुर मांडत असलेला एक सिद्धांत अगदी प्रगतीपथावर होता. त्यात त्यांनी खतांचा वापर करताना वनस्पतीमधील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियममधील संतुलनावर भर दिला होता.
त्यांच्या पंजाबमधील कापसावरील शोधाची दखल म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांना १९४६ साली ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर (OBE) हा किताब बहाल केला होता. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे फेलो होते. १९३३ सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे आणि १९५९ सालच्या इंडियन सोसायटी फॉर प्लांट फिजिओलॉजीस्टचे अध्यक्ष होते.
मुंबईत त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- ‘Obitury’ Nature, vol.192.
समीक्षक : शरद चाफेकर