मुखर्जी, ब्रतिंद्रनाथ : (१ जानेवारी १९३४ — ४ एप्रिल २०१३). प्राचीन इतिहास, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र या ज्ञानशाखांतील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ संशोधक. ब्रतिंद्रनाथ मुखोपाध्याय या नावानेही परिचित. तसेच ‘बीएनएम’ या टोपणनावाने लोकप्रिय. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. धीरेंद्रनाथ मुखोपाध्याय आणि राधारानी देबी यांचे ते पाचवे अपत्य होत. मुखर्जी यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोलकाता येथील तीर्थपती संस्थेत झाले. १९५४ मध्ये शासकीय संस्कृत महाविद्यालय, कोलकाता येथून त्यांनी ऑनर्सची पदवी मिळविली. त्यानिमित्ताने त्यांना भारतीय पुरालिपी, पुराभिलेख, नाणकशास्त्र, कलेतिहास, संस्कृत व प्राकृत भाषा तसेच जगाच्या इतिहासाची पुरातत्त्वीय साधने अभ्यासण्याची संधी मिळाली. नाणकशास्त्र आणि पुराभिलेखविद्या यांबद्दल त्यांना अधिक आवड निर्माण झाली. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी याच दोन विषयांचा विशेष अभ्यास केला. प्रथम वर्गात एम. ए. उत्तीर्ण झाल्यानंतर एस. के. सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पश्चिमी क्षत्रप’ या विषयावर त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. १९६० मध्ये सरस्वती यांची कन्या रंजना हिच्याशी त्यांचा विवाह झाला.

मुखर्जी यांना १९६० मध्ये उच्च शिक्षणासाठी लंडनमधील कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती मिळाली. ए. एल. बाशम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘हिस्ट्री ऑफ लोअर इंडस व्हॅली (ए डी 1-150)’ या विषयावर लंडन विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली (१९६३). बाशम यांनी मुखर्जींना केंब्रिज विद्यापीठातील विद्वान सर हॅरॉल्ड बेली यांच्याकडे पाठवले. बेली हे संस्कृत व इराणी भाषा तसेच इतिहासाचे तज्ज्ञ होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  मुखर्जींनी अर्माइक, सोग्दीयन, बॅक्ट्रीयन, इराणी, खरोष्ठी इ. प्राचीन भाषा व लिपी आत्मसात केल्या व तदनुषंगिक हजारो पुरातत्त्वीय साधने तपासली. या सर्वांचा त्यांना पुढे कुषाणकाळाचा अभ्यास करताना अतिशय उपयोग झाला.

मुखर्जी १९६३ मध्ये भारतात परतले. कोलकाता येथील शासकीय संस्कृत महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षण व संशोधन विभागात त्यांना प्राच्यविद्येचे सन्माननीय साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली (१९६४). पुढे १९७५ मध्ये कोलकाता विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती विभागात मुखर्जी यांना ‘कारमायकेल प्रोफेसर’ हे सन्माननीय पद मिळाले. ते त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ म्हणजे १९९८ पर्यंत भूषविले.

मुखर्जी यांनी प्राचीन भारतीय इतिहासाच्या विविध शाखा लीलया हाताळल्या असल्या, तरी कुषाणकाळासंबंधी केलेल्या संशोधनामुळे त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. भारतातील कुषाण राजवट समजून घेण्यासाठी त्यांचे बॅक्ट्रीयन (आधुनिक अफगाणिस्तान व उझबेकिस्तान) मूळ समजून घेणे आवश्यक आहे, हे मुखर्जींनी आपल्या संशोधनातून साधार दाखवून दिले. सुरुवातीला या प्रांतात भटके जीवन जगणाऱ्या कुषाण टोळ्यांचे एकीकरण, लहानमोठ्या लढाया, एकछत्री लष्करी आणि राजकीय वर्चस्व या साऱ्या घडामोडी प्रचंड विस्तृत प्रदेशपटावर घडून आल्या. त्यात भारताच्या वायव्य सीमाभागापासून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचाही समावेश होतो. ससानियन राजवटीने कुषाणांचा बॅक्ट्रीयात पराभव केल्यानंतरच त्यांच्या भारतातील साम्राज्याला ओहोटी लागली, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

भारताच्या वायव्य भागात सम्राट अशोकाचे ग्रीक व अर्माइक भाषेतील शिलालेख आढळून आले आहेत. त्यांच्या अभ्यासाशिवाय अशोकाचा आणि पर्यायाने मौर्य साम्राज्याचा अभ्यास होणे शक्य नव्हते. मुखर्जी हे या दोन्ही लिपींचे सखोल ज्ञान असलेले एकमेव तत्कालीन विद्वान होते. आपल्या अभ्यासातून त्यांनी दाखवून दिले की, हे शिलालेख म्हणजे अशोकाच्या प्राकृत लेखांच्या भाषांतरीत, लिप्यंतरीत व सारांशरूपी आवृत्याच होत. मुखर्जींच्या अभ्यासातून अशोकाचा बौद्ध धर्म, त्याचे धार्मिक व सामाजिक वर्तनाबद्दलचे नियम या सर्वांवर प्रकाश पडतो.

मुखर्जींचे पुराभिलेख अभ्यासातील सर्वोच्च योगदान म्हणजे तथाकथित शंखलिपीचा उलगडा. जवळपास दीड शतकाहून अधिक काळ एतद्देशीय तसेच परदेशी विद्वानांना कोड्यात टाकणारी शंखलिपी १९८३ मध्ये मुखर्जी यांनी उलगडली. या शोधाने त्यांना ब्राह्मीचा अन्वयार्थ लावणाऱ्या जेम्स प्रिन्सेपच्या पंगतीत नेऊन बसवले. ब्राह्मीव्यतिरिक्त खरोष्ठी लिपीवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. खरोष्ठीचा प्रकार असलेली ‘पूर्वीय खरोष्ठी’ ही आणखी एक लिपी त्यांनी १९८९ मध्ये उजेडात आणली. त्याचबरोबर ब्राह्मी व खरोष्ठी या दोन्ही लिपींचा संगम म्हणता येईल, अशी ‘विमिश्रित’ लिपीही त्यांनी उलगडली.

नाणकशास्त्रातील सखोल ज्ञानामुळे मुखर्जी यांना पारंपरिक राजकीय इतिहास व राजघराण्यांच्या वंशांवळींचा अभ्यास करणे सोपे झाले. त्यासाठी कोलकाता येथील ‘इंडीयन म्युझियम’मधील कुषाणकालीन सुवर्णनाण्यांचा मोठा संग्रह त्यांनी अभ्यासला. शक-कुषाणकाळाचा इतिहास तसेच इ. स. पू. सहाव्या-सातव्या शतकातील आहत नाण्यांपासून आधुनिक नाण्यांच्या कालावधीपर्यंत नाणी पाडण्याच्या तंत्रज्ञानाचा त्यांचा अभ्यास त्यांच्या व्यापक दृष्टीकोनाची ग्वाही देतो. मुखर्जी यांनी यथार्थ प्रतिपादन केले की, सर्वसामान्यपणे सत्ताधारी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नाणी चलनात आणत असले, तरी त्या व्यतिरीक्त भारतात समांतर व्यवस्थेद्वारेही नाणी पाडली जात. या साऱ्या चलनवलनाचा प्राचीन भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेत मोठा वाटा होता.

बंगालच्या त्रिभुज प्रदेशाच्या सुदूर पूर्वेकडील भागात इ. स. ६०० ते १२०० या दीर्घ काळात उच्च दर्जाची चांदीची नाणी अविरत पाडली जात होती, हे निर्विवादपणे सिद्ध करण्याचे श्रेय मुखर्जींना जाते. या निष्कर्षाने तत्कालीन शर्मा, यादव, झा, श्रीमाली प्रभृतीप्रणित प्रस्थापित इतिहासलेखनाला व “त्यांच्या भारतीय मध्ययुगाच्या पूर्वार्धातील सरंजामी राजव्यवस्थेत ‘चलनी अशक्तपणा’ जाणवतो”, या सिद्धांताला जबर धक्का दिला.

मुखर्जी यांनी जवळपास ५० पुस्तके व सुमारे ७०० संशोधनपर लेख लिहिले. मथुरा अँड इट्स सोसायटी : द शक-पहलव फेज (१९८१), स्टडीज इन द अर्माईक एडिक्टस ऑफ अशोक  (१९८४), द राइझ अँड फॉल ऑफ कुषाण एम्पायर (१९८९), इंडिया इन अर्ली सेंट्रल एशिया (१९९६), कुषाण स्टडीज : न्यू परस्पेक्टीव्ह (२००४), ओरिजिन ऑफ ब्राह्मी अँड खरोष्ठी स्क्रिप्ट्स (२००५) ही त्यांपैकी काही प्रमुख ग्रंथसंपदा. ऐतिहासिक समस्येवर मत वा निष्कर्ष मांडताना असंख्य पुराव्यांचा व पूर्वसुरींच्या लेखनाचा यथायोग्य परामर्श घेतलेले त्यांचे लेखन परिपूर्ण असे. अर्थात त्यामुळे कधीकधी ते काहीसे रुक्ष होत असले, तरी जातीवंत अभ्यासकाला त्यात भरगच्च तळटीपा व पुरवण्यांच्या रूपाने ज्ञानाचा खजिनाही गवसत असे.

हेमचंद्र रायचौधरी यांचा पॉलिटीकल हिस्ट्री ऑफ एन्शियण्ट इंडिया : फ्रॉम द ॲक्सेशन ऑफ परिक्षित टू द एक्स्टिंक्शन ऑफ द गुप्त डायनेस्टी हा ग्रंथ प्राचीन इतिहासलेखनातील मैलाचा दगड मानला जातो. १९९६ मध्ये त्याची नवीन आवृत्ती काढताना रायचौधरी यांना आदरांजली म्हणून मुखर्जी यांनी ३०० पानी विवेचन जोडले. हे करताना मूळ ग्रंथाला कुठेही बाधा न आणता नवीन संशोधन, पुरावे यांचा आधार घेऊन त्यांनी त्याचे महत्त्व कैकपट वाढवले. नाणकशास्त्रातील त्यांच्या सखोल ज्ञानाचे फलित म्हणजे न्युमिसमॅटिक आर्ट ऑफ इंडिया (२००७) हा द्विखंडात्मक सचित्र ग्रंथ. या कालावधीत त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती, तरीही त्यांनी हा ग्रंथ तडीस नेला.

मुखर्जी यांना अनेक मानसन्मान लाभले. कोलकाता येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेत त्यांनी ग्रंथालय सचिव (१९६६-६८), खजिनदार (१९६८-७०), सरचिटणीस (१९७०), इतिहास व पुरातत्त्वीय सचिव (१९७४-७६), संशोधन संचालक (१९७२-७७), उपाध्यक्ष (१९८३-८४) अशी विविध पदे भूषविली. कोलकाताच्या ‘इंडीयन म्युझियम’ या वस्तुसंग्रहालयाच्या विश्वस्त मंडळावर ते होते. नाणकशास्त्रविषयक संशोधन करणाऱ्या ‘न्युमिसमॅटिक सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचे उपाध्यक्ष (१९७२-७३) व सचिव (१९७३-७६) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. भारतात व जागतिक पातळीवरील अनेक सभा-परिषदांच्या अध्यक्षस्थानी ते असत. ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे ते सन्माननीय सदस्य व ‘इंडीयन हिस्ट्री काँग्रेस’ या संस्थेचे ते अध्यक्ष होते. कोलकाताच्या एशियाटिक सोसायटीने त्यांना ‘एच. सी. रायचौधरी शताब्दी पुरस्कार’ बहाल केला. न्युमिसमॅटिक सोसायटी ऑफ इंडियातर्फे त्यांना ‘द अकबर मेडल’ मिळाले. केंद्र सरकारने १९९२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

प्रकृती अस्वास्थ्य असतानाही खरोष्ठी शिलालेखांचा संकलनात्मक ग्रंथ पूर्ण करण्यात ते मग्न होते. वयाच्या ७९ व्या वर्षी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Bhattacharya, D. C. & Devendra, Handa, Praci-Prabha : Perspectives in Indology (Essays in Honour of Professor B. N. Mukherjee), New Delhi, 1989.
  • Chakravarti, R. ‘Prof. B. N. Mukherjee : A Tribute (1934-2013)’, Proceedings of the Indian History Congress, Vol. 73 (2012), pp. 1555-1559, 2012.
  • Chakravarti, R. ‘Remembering an Extra Large Scholar : B. N. Mukherjee’, Indian Historical Review, Vol. XLI (1):151-154, 2014.
  • Chakravarti, S. K. ‘Obituary : Bratindranath Mukhopadhyay (1934-2013) (B. N. Mukherjee)’, Kala : The Journal of Indian Art History, 2013-14.

                                                                                                                                                                                                                                   समीक्षक : स्नेहा दुगल