व्हाव्हिलोव्ह, निकोलाय आयव्हानोविच :  (२५ नोव्हेंबर १८८७ – २६ जानेवारी १९४३) व्हाव्हिलोव्ह यांचा जन्म मॉस्कोच्या एका व्यापारी कुटुंबात झाला. मॉस्को कृषि-विज्ञान संस्थेतून पदवीधर होण्यासाठी त्यांनी वनस्पती-भक्षी गोगलगायींवर संशोधन केले. पुढील दोन वर्षे कवकविज्ञान आणि वनस्पतीचे रोग यावर संशोधन केल्यानंतर दोन वर्षे यूरोपमध्ये दौरे केले, विल्यम बेटसन या ब्रिटीश शास्त्रज्ञाच्या मदतीने वनस्पतींतील रोगमुक्तीचा अभ्यास केला, जनुकशास्त्रात प्रगती केली. हा वनस्पतीशास्त्रज्ञ लागवडीखालील अन्नधान्न्यांच्या जन्मस्थानांचा शोध घेणारा म्हणून प्रख्यात होता. वाढत जाणाऱ्या जागतिक मानववस्तीला गहू, मका आणि अन्य धान्ये पुरी पडावी यासाठी संशोधन करण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले. दुष्काळ आणि मर्यादित (rationed) अन्नधान्य पुरवठा यांनी ग्रासलेल्या खेड्यात वाढलेल्या व्हाव्हिलोव्ह यांना रशिया आणि जगातील दुष्काळाबद्दल लहानपणीच आत्मीयता निर्माण झाली.

सन १९२४ ते १९३५ व्हाव्हिलोव्ह लेनिनग्राड (आता – सेंट पिटर्सबर्ग) येथील लेनिन ऑल युनियन अकादमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस या संस्थेचे संचालक होते. त्यांनी अनेक अभ्यास दौरे काढून जगभरातील धान्य बियाणांचे नमुने गोळा केले आणि लेनिनग्राडमध्ये जगातील सर्वात मोठी बियाणे पेढी निर्माण केली. या बियाणांच्या अभ्यासातून लागवडीखालील धान्यांची जन्मस्थाने निश्चित करण्याचे शास्त्र मांडले. ते रशियाच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे सभासद आणि ऑल युनियन जिऑग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांना लेनिन पदकही प्राप्त झाले होते.

दुसऱ्या महायुद्धातील २८ महिन्यांच्या लेनिनग्राडच्या वेढ्या दरम्यान हर्मिटेज म्युझियममधील अमूल्य कलावस्तू हिटलरच्या सैनिकांच्या हाती पडू नये म्हणून स्टालिनने दुसरीकडे हलवल्या. काही देशभक्त रशियन वैज्ञानिकांनी व्हाव्हिलोव्ह यांनी कष्टपूर्वक जमवलेली जनुकपेढी सुरक्षित ठेवली. या पेढीत बियाणे, मुळे, कंदमुळे, फळे इत्यादींचे सुमारे अडीच लाख नमुने होते. व्हाव्हिलोव्ह संस्थेच्या त्या वैज्ञानिकांनी निवडक जनुक संपत्ती संस्थेच्या तळघरात हलवली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आळीपाळीने उचलली. जर्मन सैन्याचा वेढा उठेपर्यंत त्या जनुक-संपत्तीचे रक्षण करणाऱ्या त्या वैज्ञानिकापैकी नऊजण उपासमारीने मृत्यू पावले, परंतु त्यांनी आपली भूक भागवण्यासाठी त्या साठ्यामधील एकाही दाण्यास हात लावला नाही. अशा प्रकारे व्हाव्हिलोव्ह यांचे आशिया आणि यूरोपमधून गोळा केलेले जनुक-नमुने आणि त्यावर आधारित सिद्धांत वाचवले गेले. जगभरातील वैज्ञानिकांनी आवाज उठवल्यावर फालतू आणि अशास्त्रीय कारणामुळे व्हाव्हिलोव्ह यांना केलेली शिक्षा रशियन सरकारला उठवावी लागली, आणि लायसेन्कोइझमचे समूळ उच्चाटन करावे लागले. व्हाव्हिलोव्ह यांच्या मृत्युनंतर १४ वर्षांनी रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सैनिकी कॉलेजीयमने त्यांच्या मृत्युपश्चात मृत्युदंडाची शिक्षा मागे घेतली. एव्हढेच नव्हे तर त्यांना शूर रशियन शास्त्रज्ञ म्हणून नावाजले. सेंट पीटर्सबर्ग येथील सोव्हिएट वनस्पती उद्योग संस्थेचे एन.आय. व्हाव्हिलोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट इंडस्ट्री असे नामकरण केले. तेथे अजूनही जागतिक पातळीवरचा जनुक संग्रह जपलेला आहे.

व्हाव्हिलोव्ह यांना जनुक-संपत्ती शोधून तिचा संग्रह आणि रक्षण करण्याच्या जागतिक कार्याचे जनक म्हणून संबोधले जाते. त्यांनी रशियाव्यतिरिक्त पन्नासपेक्षा जास्त देशात फिरून आठ क्षेत्रे अन्न-धन्य वैविध्याची जन्मभूमी केंद्रे म्हणून निश्चित केली आहेत. ही केंद्रे म्हणजे, चीन, भारत, इंडो-मलायन केंद्र, मध्य आशिया, अफगाणिस्तान-इराण, भूमध्य सामुद्रिक प्रदेश, अबिसिनिया / इथिओपिया, दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, चिली आणि ब्राझील-पाराग्वे.

व्हाव्हिलोव्ह हे उत्कृष्ट संघटक, उच्च प्रतीचे छायाचित्रकार आणि प्रवास-वर्णन लेखक होते. भेट दिलेल्या स्थळांची त्यांनी लिहिलेली वर्णने आजही वेधक वाटतात. धान्यांची लागवड आणि उगमकेंद्रे यांच्या  जागतिक विचारांवर त्यांचा कायम पगडा असून आजच्या या क्षेत्रांतील जगभरातील संशोधकाना मार्गदर्शक ठरतो आहे.

त्यांचा मृत्यू साराटोवाच्या तुरुंगात झाला.

समीक्षक : चंद्रकांत लट्टू