बोस, सत्येंद्रनाथ : ( १ जानेवारी १८९४ – ४ फेब्रुवारी १९७४ )
बोसॉन हे अणूतील मुलभूत कण ज्यांच्या नावावरून ओळखले जातात ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे सत्येंद्रनाथ बोस. सत्येंद्रनाथ यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते. लहानपणापासूनच सत्येंद्रनाथांच्या हुशारीची चुणूक दिसली होती. हिंदू स्कूलमध्ये शिकत असताना सत्येंद्रनाथांना एका परीक्षेत त्यांचे गणिताचे शिक्षक उपेन्द्रनाथ बक्षी यांनी गणिताच्या पेपरात शंभरपैकी एकशे दहा मार्क दिले होते. शंभरपैकी एकशे दहा मार्क देण्याचे कारण म्हणजे ह्या मुलाने सगळी गणिते अचूक तर सोडवली होतीच; परंतु विशेष म्हणजे, पेपरमधली एकाच प्रकारची गणिते त्याने वेगवेगळ्या पद्धती वापरून सोडवून दाखवली होती.
अल्बर्ट आइनस्टाइन यांचा सापेक्षतावाद सिद्धांत जगासमोर आला (१९०५). सत्येंद्रनाथांचे तेव्हा वय होते अवघ्या अकरा वर्षांचे. याच वर्षी बंगालवर एक मोठे राजकीय संकट आले. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. बंगालचे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशा दोन तुकड्यांमध्ये विभाजन झाले. बंगालमध्ये जनक्षोभ उसळला. या सगळ्याचा परिणाम सत्येंद्रनाथांवर स्वाभाविकपणे झालाच. राजा राम मोहन रॉय, बंकिमचंद्र, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा सत्येंद्रनाथांवर प्रभाव होता.
सत्येंद्रनाथ यांचे पदवीपर्यंतचे सगळे शिक्षण कोलकाता इथेच झाले. कोलकत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी प्राप्त करतानाही (१९१५) त्यांनी पहिला क्रमांक सोडला नाहीच; यावेळी तर सत्येंद्रनाथ संपूर्ण विद्यापीठातून प्रथम आले होते. खरे तर विज्ञानाबरोबरच संस्कृत, इतिहास आणि भूगोल हे सुद्धा सत्येंद्रनाथांचे आवडीचे विषय. परंतु त्यांनी विज्ञानात उच्च शिक्षण घेण्याचे निश्चित केले होते.
सत्येद्रनाथांना पदवी मिळाली. मात्र त्यांच्या काळात विज्ञान शिक्षणाची फारशी सोय उपलब्ध नव्हती. सत्येंद्रनाथांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय या दोन महान संशोधकांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले.
लहानपणापासूनच सत्येंद्रनाथांची दृष्टी काहीशी अधू होती, तरी सुद्धा त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. केवळ विज्ञानच नव्हे तर साहित्य क्षेत्रातही त्यांचे दांडगे वाचन होते. बंगाली, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, इटालियन आणि जर्मन या भाषांवर सत्येंद्रनाथांचे प्रभुत्व होते.
सर आशुतोष मुखर्जी यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सची स्थापना केली (१९१५). त्यांनी या विद्यापीठात सर सी. व्ही. रामन आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांची प्राध्यापक म्हणून तर मेघनाद सहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांची अधिव्याख्याता म्हणून नेमणूक केली. बोस आणि सहा यांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना शिकवण्याचे असले तरी विषय चांगल्या प्रकारे शिकवता यावा आणि नवनवीन कल्पना सुचाव्यात यासाठी त्यांनी संशोधन करण्याचे ठरवले. संशोधन करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या विषयातले जे दर्जेदार साहित्य आहे त्याचे वाचन करणे. सुरुवातीला त्यांनी गिब्ज आणि प्लँक यांची पुस्तके वाचण्याचे ठरवले. मात्र यामध्ये एक अडचण अशी होती की ही पुस्तके फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये लिहिलेली होती. ही पुस्तके वाचता यावीत यासाठी सहा आणि बोस या दोन्ही भाषा शिकले. बंगाल इंजिनिअरिंग कॉलेजमधून चांगली चांगली पुस्तके आणायची आणि त्यांचे इंग्रजीत भाषांतर करायचे, याचा जणू सपाटाच बोस आणि सहा यांनी लावला. आइनस्टाइनच्या सापेक्षतावाद विषयावरच्या जर्मन भाषेत लिहिलेल्या लेखांचेही इंग्रजीत भाषांतर करायला बोस यांनी सुरुवात केली. या लेखांचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे सर्वाधिकार आइनस्टाइन यांनी इंग्लंडमधल्या मॅथेन यांना दिले होते. सत्येंद्रनाथ सापेक्षतावाद विषयावरच्या लेखांचे इंग्रजीतून भाषांतर करताहेत हे समजल्यावर मॅथेन यांनी त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खुद्द आइनस्टाइन यांनीच या प्रकरणात मध्यस्थी केली आणि भारतात सापेक्षतावाद विषयावरच्या लेखांचे भाषांतर करण्याची परवानगी अत्यंत उदार मनाने सत्येंद्रनाथांना दिली.
सत्येंद्रनाथांनी कोलकाता इथल्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये काम केले (१९१६-२१). पुढे ते ढाका इथल्या विद्यापिठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले (१९२१). दरम्यान सत्येंद्रनाथ आणि मेघनाद सहा यांनी ‘इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅसेस’ नावाचा शोधनिबंध इंग्लंड इथून प्रसिद्ध होणाऱ्या फिलॉसॉफीकल या जर्नलमध्ये पाठवला. हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला (१९१८). त्यानंतर फिलॉसॉफिकल जर्नलमध्ये सत्येंद्रनाथांचे आणखी दोन शोधनिबंध प्रसिद्ध झाले (१९१९ आणि १९२०).
सत्येंद्रनाथांनी मॅक्स प्लँक यांच्या प्रारणाच्या नियमाची अभिनव पद्धतीने मांडणी करून ते सिद्धही करून दाखविले (१९२४). बोस यांच्या याच संशोधनामुळे भौतिकशास्त्रात क्रांतिकारक कल्पनेचा उदय झाला. सत्येंद्रनाथांनी आपले हे संशोधन शोधनिबंधाच्या स्वरुपात फिलॉसॉफिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवले. मात्र यावेळी मात्र फिलॉसॉफिकलने हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यास साफ नकार दिला. सत्येंद्रनाथांनी मग त्यांचा हा शोधनिबंध थेट अल्बर्ट आइनस्टाइन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइनस्टाइन यांनी शोधनिबंधाचे अगदी काटेकोरपणे अध्ययन केले. सत्येंद्रनाथ यांनी खरोखरच अत्यंत तर्कशुद्धपणे मांडणी केली होती. मग आइनस्टाइन यांनी स्वत: तो शोधनिबंध जर्मन भाषेत भाषांतरित केला आणि जर्मनीमध्ये ZeitschriffFiir Physik या संशोधन नियतकालिकात तो छापूनही आणला. या शोधनिबंधाला जगभरातल्या गणितींनी पसंती दिली. विशेष म्हणजे, सत्येंद्रनाथांचा शोधनिबंध प्रसिद्ध करून आइनस्टाइन थांबले नाहीत. या शोधनिबंधावर त्यांनी सत्येंद्रनाथांशी चर्चा केली, त्यात मोलाची भर घातली आणि ते संशोधन बोस-आइनस्टाइन सांख्यिकी या नावाने जगभर प्रसिद्ध झाले. बोस-आइनस्टाइन सांख्यिकीचे नियम अणुतील ज्या मूलभूत कणांना लागू होतात त्यांना बोस यांच्या नावावरून बोसॉन असं संबोधण्यात आले. या विश्वातील निम्म्यापेक्षा अधिक मूलभूत कण हे बोसॉन प्रकारचे आहेत; म्हणजेच ते बोस-आइनस्टाइन सांख्यिकीचे नियम पाळतात.
भौतिकशास्त्रातल्या मूलभूत विषयाच्या संदर्भात सत्येंद्रनाथांनी एकूण २४ शोधनिबंध लिहिले. हे सगळे शोधनिबंध वैज्ञानिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून (१९४५) त्यांनी कोलकत्यात १९५६ पर्यंत प्राध्यापक म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्वभारती विद्यालयाचे उपकुलपती म्हणून त्यांची नेमणूक झाली. सत्येंद्रनाथ बोस भारताच्या राज्यसभेचे सदस्य होते (१९५२-५८).
सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले (१९५८) आणि त्यांना राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून मान्यता दिली. त्याच वर्षी लंडनच्या रॉयल सोसयटीने त्यांना सदस्यत्व देऊन सन्मानित केले.
सत्येंद्रनाथ बोस यांनी आपले निवृत्तीनंतरचे सगळे आयुष्य विज्ञान जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी व्यतीत केले. त्यासाठी त्यांनी बंगाल सायन्स असोसिएशनची स्थापना केली. याशिवाय ज्ञान-विज्ञान नावाचे एक मासिकही सुरू केले.
वयाच्या ८० व्या वर्षी कोलकता येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- चटर्जी, सांतिम; चटर्जी, एनाक्षी, सत्येंद्रनाथ बोस (चरित्र)
- biography.com/people/satyendra-nath-bose-20965455
समीक्षक : रघुनाथ शेवाळे