मिलिकन, रॉबर्ट अँड्र्यूज : ( २२ मार्च १८६८ – १९ डिसेंबर १९५३ )

मिलिकन ओहियो येथून पदवीधर झाल्यावर त्यांनी दोन वर्षे भौतिकशास्त्राच्या अध्यापनाचे काम केले. नंतर त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली आणि कोलंबिया विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवू लागले.

प्रदीप्त पृष्ठाभागांनी (incandescent surfaces) उत्सर्जित केलेल्या प्रकाशाच्या ध्रुवीकरण (polarization) प्रक्रियेवर संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. मिळवली. त्यानंतर जर्मनीत बर्लिन आणि गटिंगेन येथे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक झाले.

पहिल्या महायुद्धात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पाणबुडी प्रतिरोधक व वातावरण विज्ञाननीय साधने विकसित करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. पॅसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टि‌ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकशास्त्राच्या नॉर्मन ब्रिज लॅबोरेटरीच्या संचालक पदावर, तसेच या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक झाली.

मिलिकन यांनी प्रामुख्याने प्रकाश विद्युत ( photo electricity) धारा आणि रेण्वीय भौतिकशास्त्र (Molecular Physics) या विषयात संशोधन केले. त्यांचे सर्वात प्रसिद्ध संशोधन कार्य म्हणजे इलेक्ट्रॉनवरील विद्युताप्रभार अचूकपणे मोजण्यासाठी त्यांनी केलेला तेलाच्या थेंबाचा प्रयोग ( Oil drop experiment) होय.

इलेक्ट्रॉनवरील विद्युताप्रभाराचे मापन जे. जे. थॉमसन आणि हेरॉल्ड ए. विल्सन यांनी केले. हे मापन करताना त्यांनी पाण्याच्या सूक्ष्म थेंबाचा म्हणजेच जलकणाचा वापर केला होता. या पद्धतीत सुधारणा करून मिलिकन यांनी विद्युत प्रभाराचे मापन केले. जलकणाऐवजी तेलाच्या सूक्ष्म थेंबाचा वापर त्यांनी आपल्या प्रयोगात केला. पाण्याऐवजी तेल वापरण्याचे कारण असे की, प्रयोग करत असताना तापमानात वाढ झाल्यावर पाण्याची वाफ होते आणि त्यामुळे जलकणाचे आकारमान बदलते. तेलाच्या थेंबाच्या बाबतीत मात्र असे होत नाही. त्यामुळे मिलिकन यांचा प्रयोग विश्वसनीय समजला जातो. इलेक्ट्रॉन कोणत्याही अणूतील असला तरी सर्व इलेक्ट्रॉन्सवरील विद्युत प्रभार सारखाच असतो, असेही त्यांनी सिद्ध केले.

मिलिकन यांनी आइन्स्टाइन यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रकाश विद्युतीय समीकरण (Photo electric equation) प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे पडताळून पाहिले. त्याचवेळी वेगवेगळ्या धातूंच्या प्रकाश विद्युतीय गुणधर्मांचा अभ्यास आलेखांच्या मदतीने करताना प्लँक यांच्या स्थिरांकाचे म्हणजे h चे मूल्य निर्धारित केले.

इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभाराचे मापन आणि प्रकाश विद्युत परिणाम या संदर्भातील संशोधन कार्याबद्दल मिलिकन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले (१९२३).

नोबेल पुरस्काराखेरीज नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचे एडिसन पदक, लंडनच्या रॉयल सोसायटीचे ह्यूज पदक असे बहुमान मिलिकन यांना मिळाले. विशेष म्हणजे पंचवीस विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळाल्या होत्या आणि अमेरिकेच्या अनेक व परदेशी वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. ते अमेरिकन फिजिकल सोसायटीचे अध्यक्ष आणि अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष होते. राष्ट्रसंघाच्या बौद्धिक सहकार्य समितीत त्यांनी अमेरिकेचे सदस्य म्हणून काम केले. ब्रुसेल्स येथे भरलेल्या सॉल्व्हे काँग्रेस या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेमध्ये त्यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्त्व केले.

संशोधन कार्य करत असतानाच मिलिकन यांनी अनेक शास्त्रीय नियतकालिकातून लेखन केले, तसेच भौतिकशास्त्राच्या विविध शाखांवर एच. जीगेल, सी. आर. मान, जे मिल्स, ह्या लेखकांबरोबर आणि स्वतंत्रपणेही त्यांनी पाठ्यपुस्तके लिहिली. भौतिकशास्त्रात सुलभता आणण्यात बहुमोल मदत केली. त्यांनी लिहिलेला, विश्वाकिरणांवर आधारीत असलेला इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स, फोटॉन्स, न्यूट्रॉन्स, मेसोट्रॉन्स अँड कॉस्मिक रेज हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. सायन्स अँड लाइफ, इव्होल्यूशन इन सायन्स अँड रिलीजन, सायन्स अँड द न्यू सिव्हिलायझेशन, टाइम,मॅटर अँड व्हॅल्यूज या ग्रंथाखेरीज त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

संदर्भ :

 समीक्षक : रघुनाथ शेवाळे