झिओलाइट गटातील हे सिलिकेटी खनिज आहे. याला डेस्माइन (Desmine) असेही म्हणतात. याचे एकनताक्ष, प्रचिनाकार, वडीसारखे व पातळ स्फटिक जुडग्यांच्या रूपात आढळतात. याचे क्रूसाकार जुळे स्फटिकही आढळतात. पाटन (010) परिपूर्ण असून पाटनपृष्ठाची चमक मोत्यासारखी असते. यावरून चमक अर्थाच्या ग्रीक शब्दावरून स्टिल्बाइट हे नाव पडले आहे. स्फटिकांची चमक काचेसारखी असते. रंग पांढरा, पिवळा तसेच उदी व तांबडा; दुधी काचेप्रमाणे पारभासी; कठिनता ३.५ – ४; वि. गु. २.१-२.२. रा. सं. Ca (Al2Si7O18).7H2O. यात थोडे सोडियम व पोटॅशियम असते. हायड्रोक्लोरिक अम्लाने याचे अपघटन (रासायनिक दृष्ट्या तुकडे होण्याची क्रिया) होते, तसेच बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते.
स्टिल्बाइट हे बेसाल्ट व संबंधित खडकांतील पोकळ्यांत आढळते. क्वचित ग्रॅनाइट, पट्टिताश्म व धातुयुक्त शिरा यांतही हे आढळते. झिओलाइट, डॅटोलाइट, प्रेहनाइट व कॅल्साइट ही स्टिल्बाइटबरोबर आढळणारी इतर खनिजे आहेत. आइसलँड, स्कॉटलंड, नोव्हा स्कोशा, अमेरिका, फेअरो बेटे इ. ठिकाणी स्टिल्बाइट आढळते. महाराष्ट्रातील पुणे भोवतालच्या परिसरात हे विपुल प्रमाणात आढळते. समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर