श्लाईख, योर्ग :  (१७ ऑक्टोबर १९३४ – ) योर्ग श्लाईख या जर्मन अभियंत्याचा जन्म जर्मनीतील बादेन-ब्युटेंबर्गमधील केर्नेन येथे झाला. त्यांनी १९५१ ते १९५५ या कालावधीत स्टुटगार्ट येथील टेक्निकल स्कूलमध्ये अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करुन त्या विषयातील पदवी घेतली. पदवीनंतर १९५९सालापर्यंत बर्लिन येथील टेक्निकल युनिव्हर्सिटीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एक वर्षभर त्यांनी अमेरिकेतील क्लीव्हलंड येथील केस वेस्टर्न रिझर्व युनिव्हर्सिटीत पुढील शिक्षण घेतले. १९६० ते १९६३च्या दरम्यान स्टुटगार्ट टेक्निकल युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट (Dr. Eng.) चा अभ्यास चालू करत असतानाच एल. बॉवर (L. Bauer) या कंत्राटदाराकडे काम केले आणि त्यानंतर १९६३ साली त्यांनी फ्रिट्झ लिओनार्ड या जगप्रसिद्ध संरचनात्मक अभियंत्याने स्थापन केलेल्या लिओनांर्ड-अँद्रा या अभियांत्रिकी सल्लागार कंपनीत प्रवेश घेतला. तेथे त्यांनी स्वकर्तृत्वावर काही काळातच त्या कंपनीत भागीदार म्हणून १९७९पर्यंत काम केले. अखेरीस १९८०मध्ये वयाच्या ४६ वर्षी त्यांनी श्लाईख- बर्गेरमन पार्टनर्स (Schlaich- Bergmann Partners) अशी स्वतःचीच कंपनी स्थापना केली.

ऑलिंपिक स्टेडिअम, म्यूनिक

आपल्या प्रदीर्घ व्यावसायिक कारर्किदीत श्लाईख यांनी अनेक वैविध्यपूर्ण अधिकल्प हाताळले. त्यात स्टेडिअम, अनेक पूल, सौरमनोरा वगैरेंचा समावेश आहे. हे करताना आपण अभिकल्पिलेल्या प्रत्येक संरचनेत सौंदर्यशास्त्राला प्राधान्य असलेच पाहिजे पण त्याचबरोबर अशा संरचनेच्या नियोजनात कमीत कमी मालाचा वापर करुन ती वजनाने हलकी झाली पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असायचा! अशा प्रकारे प्रत्येक अभिकल्प नाविन्यपूर्ण असला पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

‘लिओनार्ड-अँद्रा’ या कंपनीत असताना १९७२मध्ये म्नियूकमधील ऑलिंपिक स्टेडिअमच्या छताच्या अत्यंत नाविन्यपूर्ण अभिकल्पाचे काम श्लाईख यांनी केले. ६९,२५० प्रेक्षक मावतील असे ७४,००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे छत असलेला स्टेडिअम हा भव्य खराच, पण त्यापेक्षाही त्याचे आरेखन हे सर्वच दृष्टीने वैशिष्टयपूर्ण होते. पोलादी नळयांचे (Steel Tubes) योग्य अशा वेगवेगळया ठिकाणी उभारलेले स्तंभ, त्यावरुन आकर्षकरित्या टांगलेल्या लोखंडी जाळया आणि त्यावर लावलेले ॲक्रिलिक काचेचे बाह्य आवरण अशी एक वजनाने अतिशय हलकी संरचना निर्माण झाली. त्यानंतर जवळजवळ दोन दशकांनी गटलेब-डेम्लर स्टेडिअम (Guttleb- Daimler Stadium)च्या छताचे संयोजन श्लाईख यांनी केले.

केल्हेम पादचारी पूल

पादचारी पुलांपासून मोठमोठया अवधींच्या (span) पुलापर्यंत अतिशय कल्पकतेने अभिकल्पलेले असंख्य पूल हे एक श्लाईख यांचे मोठे वैशिष्टय. उदाहरणादाखल १९८७साली जर्मनीतील डॅन्यूब कालव्यावरचा केल्हेम (Kelheim) पादचारी पूल, १९९२साली कोलकाता येथील हुगळी नदीवरील विद्यासागर सेतु, १९९८साली हाँगकाँगमध्ये बांधलेला तिंगलीन (Tinglean) पूल अशी नावे घेता येतील. केल्हेम पुलाचे अभिकल्प अत्यंत नाविन्यपूर्ण होते. मध्यभागी ३८मी. आणि शेवटी १९६ मी. त्रिज्या असलेला ६२ मी. अवधीचा हा ९२ मी लांब पूल एका खांबावरुन ३० मिमी. व्यासाच्या ३४केबल्सवरुन आधारलेला आहे. ८२३ मी. लाबींचा विद्यासागर सेतु हा १२८ मी. उंच खांबावरुन ताणल्या गेलेल्या १२१केबल्सवर उभारलेला केबलस्थित पूल, तर हाँगकाँगमधील सर्वात मोठा ४४८मी. अवधी असलेला तिंगलीन हा ११७७ मी. लांबीचा केबल स्थित पूल! जगातील बहुअवधी केबलस्थित अशा बांधलेल्या पहिल्या काही पुलांमध्ये या पुलाची गणना होते.

 

विद्यासागर सेतु कोलकाता

सौरऊर्जा ही मानवाला मिळालेली निसर्गाची देणगी आहे आणि तिचा उपयोग वीज निर्मितीसाठी कसा करता येईल हा एक श्लाईख यांच्या मनात सतत वसत असलेला विषय होता. त्यातूनच त्यांनी सौरमनो-याचे अभिकल्प केले. त्याला त्यांनी SUT (Solar Updraft Tower) असे म्हटले. ४६ हेक्टर जमिनीवर १९५ मी. उंचीचा मनोरा करुन त्यांनी ५० किलोवॅट वीज निर्माण केली. १०मी. व्यासाचा मनोरा त्यांनी निव्वळ १.२५मिमी जाडीच्या लोखंडी पत्र्यातून तयार केला.

लिओनार्द-अँद्रा या कंपनीत काम करताना आणि नंतर १९८० मध्ये स्वतःचीच कंपनी स्थापन केल्यानंतर सुद्धा श्लाईख यांनी आपल्या अत्यंत आवडत्या शिक्षणक्षेत्राशी संबंध चालू ठेवला होता. त्यांनी स्टुटगार्ट युनिव्हर्सिटीत प्रबलित काँक्रीट या विषयाचे अध्यापन केले. नंतर १९७४ ते २००० या कालावधीत इन्स्टिटयूट फॉर कन्स्ट्रक्शन अँड एंटवर्फ (Institute of Construction and Entwurf) या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या निरनिराळया कामाविषयी अनेक लेख लिहिले आहेत. परंतु त्याच बरोबर सौरऊर्जा या विषयावरील त्यांच्या अभ्यासामुळें त्यांनी दि सोलार चिमनी, इलेक्ट्रिसिटी फ्रॉम दि सन (The Solar Chimney Electricity form the Sun) हेही पुस्तक लिहिले.

तरुण अभियंत्यांमध्ये अभ्यासवृत्ती बाणविण्यासाठी आणि नवनवीन कल्पना रुजविण्यासाठी श्लाईख यांनी नेहमीच विशेष परिश्रम घेतले. व्यावसायिक जीवनात अत्यंत उच्चतेची नैतिकता असली पाहिजे, आपण अभिकल्पिलेल्या लहानमोठया प्रत्येक संरचनेत सौंदर्यशास्त्राला अग्रस्थान असावे, कमीतकमी मालाचा वापर करुन वजनाने हलकी अशा संरचनांचे नियोजन झाले पाहिजे आणि सौरउर्जेव्दारे आपण समाजाला काही उपयोगी असे दिले पाहिजे अशा तळमळीने श्लाईख यांनी आपले जीवन व्यतीत केले.

श्लाईख यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. त्यात इस्टिटयूशन ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्सचे सुवर्ण पदक, वेर्नेर फॉन सीमेन्स रिंगचे (Werner Von Siemens Ring) मॉर्श पदक यांचा समावेश आहे.

संदर्भ :

  • Bridge Building. Bridge Designs
  • The Solar Updraft Tower – Motivation and Concept by J. Schlaich and Rudolf Bergermann

समीक्षक : प्र. शं. अंबिके