रामाणी, शंकर : (२६ जून १९२३ – २८ नोव्हेंबर २००३). प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी. बा.भ. बोरकर आणि दा.अ. कारे यांच्या पिढीनंतरचे महत्त्वाचे गोमंतकीय मराठी कवी म्हणून शंकर रामाणी यांचे नाव घेतले जाते. मराठी काव्यविश्वात त्यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली. विशुद्ध कवितेचे ते पुरस्कर्ते होते. काव्यसाधना हीच आपली जीवनसाधना असे त्यांनी मानले. “एकल्याने गावे, एकट्याचे गाणे” या अंतर्मुख आणि आत्ममग्न वृत्तीने कातरवेळ  ते गर्भागार  या कवितासंग्रहापर्यंत त्यांचा काव्यप्रवास चालला.उर्मिला हे त्यांचे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी कोकणीतून काव्यनिर्मिती केली. त्यांचे ब्रह्मकमळ, निरंजन, निळें निळें ब्रह्म  आणि जोगलांचे झाड हे कवितासंग्रह कोकणीतून प्रसिद्ध झाले. मराठी काव्यक्षेत्रात पृथगात्म प्रतिमासृष्टीमुळे काव्यरसिकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. समर्थ शब्दकळा त्यांना लाभलेली होती. प्रतिकूलतेवर मात करीत त्यांचा काव्यप्रवास घडलेला आहे. मनुष्यमात्राच्या अंतर्मनाला व्यापून राहिलेल्या दु:खसंवेदनेचे सूक्ष्म स्तर हे शंकर रामाणी यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आहे.

शंकर रामाणी यांचा जन्म गोव्यातील बारदेश तालुक्यातील वेरे गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे रुक्मिणीबाई. त्यांचे मूळ नाव आनंद ठेवण्यात आले होते. पण मागाहून आजोबांचे शंकर हे नाव त्यांना लावण्यात आले. बालपणी आईवडिलांचे रामाणींवर दृढ संस्कार झाले. त्यांच्या आईला जुनी गाणी मुखोद्गत होती. तिच्या प्रेमळ स्वभावाचे आणि काव्यगायनाचे संस्कार रामाणींवर झाले. त्यांचे वडील शिस्तप्रिय होते. ते तत्कालीन पोर्तुगीज राजवटीत शासकीय सेवेत होते.ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले.

पोर्तुगीज भाषा हे त्या काळात शिक्षणाचे माध्यम होते. रामाणींचे दोन इयत्तांचे शिक्षण मराठीतून झाले. नंतर पाच वर्षे पोर्तुगीजमधून त्यांचे शिक्षण झाले. तत्कालीन शिक्षणपद्धतीनुसार त्यांनी आठ वर्षे इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतले. अनेक भाषांमधून त्यांचे शिक्षण झाल्यामुळे सहजगत्या त्यांना बहुभाषिकत्व प्राप्त झाले. इ.स. १९४३ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पोर्तुगीज आणि इंग्रजी साहित्याचा कोवळ्या तरुण वयात त्यांच्यावर प्रभाव पडला. घरी येणाऱ्या पुरुषार्थ, ज्ञानमंदिर आणि किर्लोस्कर  यासारख्या मासिकांमुळे त्यांच्यामध्ये वाचनविषयक अभिरुची निर्माण झाली. वास्को शहरात त्यांचे शिक्षण झाले. १९३७ साली त्यांच्या शाळेला मान्यता मिळाल्यानंतर हस्तलिखित  नावाचे मासिक काढण्यात आले. ‘पाखरा! येशील का परतून?’ या ना. वा. टिळकांच्या मूळ कवितेवरुन आचार्य अत्रे यांनी ‘परिटा, येशील कधी परतून?’ ही विडंबनपर कविता लिहिली होती. त्यावरची विडंबनकविता रामाणींनी लिहिली. ती सर्वांना आवडली. हा त्यांच्या कवितालेखनाचा प्रारंभबिंदू होता. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्यात हेडक्लार्क म्हणून ते रुजू झाले. १ जुलै १९८० मध्ये ते सेवानिवृत्त झाले. उत्तम प्रकारचा ड्राफ्ट तयार करणे ही त्यांची खासियत होती. वाचन, चिंतन आणि मनन यांचा त्यांनी सतत ध्यास बाळगला. मराठीच्या मुख्य धारेतील नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. ते एकांतप्रिय होते खरे; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकारलेपणा नव्हता. तरुण वयात त्यांना माधव जूलियन, अनिल, ना. घ. देशपांडे, बोरकर आणि कुसुमाग्रज यांच्या कविता आवडायच्या. १९३९ साली पणजीच्या प्रकाश  साप्ताहिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. दा. अ. कारे या कवीशी त्यांची जवळीक होती. त्यांचे सुरुवातीच्या काळात त्यांना मार्गदर्शन लाभले. ‘अंधारात विराट विश्व विरते…’ या कवितेच्या रूपाने त्यांना अंत:सूर गवसला. सत्यकथा, दीपावली  या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत राहिल्या. सुरुवातीच्या काळात त्यांच्या कविताप्रकाश, नयन, झारापकर आणि किर्लोस्कर या नियतकालिकांत यायच्या. १९४२ पासून नाशिकच्या स्वदेश  साप्ताहिकात आणि कोल्हापूरच्या महाद्वार  मासिकात त्यांच्या कविता नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या. शंकर रामाणी यांच्या सूर्यफुले  हा बालकवितांचा संग्रह १९४९ मध्ये प्रसिद्ध झाला. हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यांतील काही कवितांचा पोर्तुगीजकालीन मराठीच्या पाठ्यपुस्तकांत समावेश केला गेला. त्यांचा पुढचा काव्यप्रवास प्रौढ गंभीर कवितेच्या दिशेने झाला. कातरवेळ हा त्यांचा कवितासंग्रह १९५७ साली प्रसिद्ध झाला. त्याला नामवंत कवी पु. शि. रेगे यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांचा पुढील काव्यप्रवास आभाळवाटा (१९६७), पालाण (१९७९), दर्पणीचे दीप (१९९२), आणि गर्भागार (२०००) असा चढत्या श्रेणीने होत राहिला. हे सगळे संग्रह मौज प्रकाशनगृहाने प्रसिद्ध केले. एक प्रतिभाशाली कवी म्हणून मराठी काव्यविश्वात त्यांचे स्थान निश्चित झाले.

निसर्गानुभूतीचे सौकुमार्य रामाणींच्या शब्दकळेत आढळते. अंत:प्रेरणेने निर्माण झालेली ही कविता रसिकांच्या मनाला प्रसन्नता प्राप्त करून देते. अमूर्तानुभवाला आकार देणारे हे देखणे अक्षरशिल्प आहे. त्यांचे काव्य लौकिकाच्या अतीत वेगळ्या सृष्टीत नेणारे आहे. रामाणींच्या कवितेतील दु:खानुभवाची आविष्कारपद्धती आधुनिक आहे, तरी दु:खानुभूतीची जातकुळी सनातन आहे. सांताला लागलेली अनंताची ओढ तिच्यात अभिव्यक्त झालेली आहे. विराट दु:खाचे प्रस्तर भेदून अंतरीच्या आनंदजळाचे तरंग निवांतपणे अनुभवणे हा या कविमनाचा स्थायी भाव आहे. त्यातून त्यांच्या आत्मतृप्तीची लय प्रकट होताना दिसते. ती छंदरूप धारण करते. या कवीची वृत्ती मूलत: अंतर्मुख आहे. अज्ञेयाच्या माळावरुन उधळलेल्या आभाळवाटांचा शोध हे कविमन घेत राहिले. त्यांच्या कवितेतील वेदनेचे गाणे त्यांचे एकट्याचे असले तरी त्याला वैश्विक संदर्भ आहे. विश्वजनांच्या नि:श्वसितांचे आणि आर्तावस्थेचे प्रतीकात्म चित्र कवी रेखाटतो.आभाळवाटामधील बहुतेक कवितांमधून दु:खसंवेदना आढळत असली तरी, निराशा व्यक्त होत असली तरी या अनुभूतीला आशेची किनार आहे. मरणगंधाच्या सीमारेषेवर नवसर्जनोत्सुक अंकुराचे आश्वासनदेखील आहे. या संग्रहातील बहुतांश कविता छंदोबद्ध आहेत.

पालाणमधील अनुभवविश्वाला जीवनचिंतनाचा प्रगल्भ सूर गवसलेला आहे. जाणिवेकडून नेणिवेकडे आत्मानुभवाचा प्रवास घडलेला आहे. दिशा पालाणिल्यावर एका अनोळखी गावात कविमनाचा प्रवेश होतो. येथे निवाऱ्याला घरटे आहे. घराला अंगण आणि अंगणात एक निराकाराचे झाड आहे. त्याकडे अदृष्टाच्या नजरेने पाहिल्यावर कणाकणांवर किनारलेली त्याची प्रकाशपालवी कवीच्या रंध्रारंध्रांत मोहरताना दिसते. उन्नयनशील मनाला सलणारे दु:ख हा या काव्यानुभवाचा मूलकेंद्र आहे. पण त्याचे अनंत पापुद्रेपालाणमध्ये प्रकट झाले आहेत. ते येथे अथांगाचा शोध घेतात. नेणिवेला, अगम्य आशयाला कवी दृक् स्वरूपात रेखाटतो.दर्पणीचे दीपमध्ये उत्कटता हा मनोधर्म असलेल्या कवीच्या परिणत प्रतिभेचा विलोभनीय आविष्कार दिसून येतो. मनस्वी कवीच्या दु:खसंवेदनेची परिसीमा जशी या कवितासंग्रहात दिसून येते. तशीच अभंग आत्मनिर्भर वृत्तीही आढळते. या दोहोंच्या अंतर्विरोधातून त्यांची प्रतिमासृष्टी साकार झाली आहे. आजवरच्या जीवनप्रवासाचा मर्मबंधच ‘चढणीच्या घाट अंत नाही’ अशा शब्दात सूचकतेने व्यक्त झाला आहे. या कवीला अंतर्मनातील प्रकाशाचा आलोक सतत आवाहन करीत असला तरी आयुष्यभर साथसंगत करीत असलेल्या काळोखाचे कविमनाला आकर्षण वाटते. निसर्गानुभूती व्यक्त होताना येथे चित्रमयता, रंगसंवेदना आणि ओतप्रोत आनंदाच्या ऊर्मी ‘कविता: स्वप्नातील झाडांच्या’ या कवितेत व्यक्त झाल्या आहेत.दर्पणीचे दीप  या कवितासंग्रहाचे आणखी एक गुणवैशिष्ट्य म्हणजे कवित्वशक्तीविषयीचे या कवीचे चिंतन ‘कविता’, ‘कविता आकळण्याची वेळ’ आणि ‘कवी आणि एक अर्थशून्य कविता’ या कवितांतून कवी या नात्याने या जगातील आपले अस्तित्व, कवितेच्या निर्मितिप्रक्रियेचे स्वरूप, काव्यनिर्मितीनंतरच्या आनंदाची अवस्था आणि कठोर वास्तवातून मुक्त होण्याची प्रक्रिया या विविध स्थित्यंतराकडे त्याने केलेले भाष्य येथे आढळते.

शंकर रामाणी यांचे लौकिक अनुभवाला अलौकिकाकडे, तर्कातीताकडे नेणारे प्रतिभेचे वैलक्षण्य मनात ठसणारे आहे. रामाणींच्या श्रेष्ठ प्रतिभावंताविषयीच्या कवितांमध्ये आत्मनिष्ठ वृत्तीने त्या त्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाशी ह्रदयसंवाद केला आहे. त्यांच्या आईवरच्या कविता लक्षणीय स्वरूपाच्या आहेत. अल्पाक्षररमणीयत्व, सूचकता आणि प्रीतिविश्वातील एकात्म भाव ही दर्पणीचे दीपची गुणवैशिष्ट्ये आहेत. छंदोबद्ध कवितेबरोबरच येथे मुक्तछंदातील कविताही आढळतात. गोमंतकीय परिसरातील शब्द रामाणी नेमकेपणाने योजतात. शब्दांविषयीची साक्षेपी वृत्ती हाही त्यांचा गुणविशेष आहे. नव्याने घडविलेले नामधातू येथे अर्थाची नवी वलये निर्माण करतात. अनुप्रासासारखा शब्दालंकार रामाणींच्या कवितेत नितांत रमणीयता निर्माण करणारा घटक आहे. गर्भागारमध्ये कवीचा हा प्रवास परिणत होत गेल्याच्या खाणाखुणा दिसून येतात. आत्मशोधाची प्रक्रिया येथे आढळते. विरक्तीतून निर्माण झालेले एकाकीपण येथे आढळते. निसर्गप्रतिमांतून सखोल जीवनानुभव येथे व्यक्त होतो. अमूर्त अनुभवाला शब्दांनी आकळणारी शंकर रामाणी यांची कविता अंतर्मुख करणारी आहे. त्यांच्या प्रतिमाविश्वाची गर्भश्रीमंती ही आनंददायी स्वरूपाची आहे.

शंकर रामाणींना आजवर गोवा कला अकादमी पुरस्कार, गोवा राज्य साहित्य आणि संस्कृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमीचा कृष्णदास शामा पुरस्कार, गोवा कला अकादमीचा गोमंत शारदा पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार असे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी शंकर रामाणी यांचे बांबोळी येथे निधन झाले.

संदर्भ : कामत श्रीराम (संपा), मराठी विश्वचरित्र कोश,  खंड ४, विश्वचरित्र संशोधन केंद्र, गोवा.