पत्की, हेमकिरण दत्तात्रेय : ( २० नोव्हेंबर १९६०). मराठी काव्यसृष्टीतील चिंतनशील, भावोत्कट कवी तसेच काव्यसमीक्षक व ललित लेखक. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वचिंतनाचे अभ्यासक. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी या गावी झाले. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात ते स्थापत्य अभियंता या पदावर कार्यरत होते. याच विभागातून त्यांनी शाखा अभियंता म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे वडील मराठीचे अध्यापक आणि उत्तम कवी असल्याने काव्यलेखनाचे आणि काव्य आस्वादनाचे संस्कार शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर झाले. अनुष्टुभ, साधना, कवितारतीप्रतिष्ठान आदी नियतकालिकांमधून प्रारंभी त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यांचे पाऊसफुले (१९८९), एकांतवाटेने ( २००० ), शाई आकाशाची ( २०१५ ), कवडसे कोवळ्या उन्हाचे (२०१९) आदी काव्यसंग्रह प्रकाशित आहेत तसेच कवितेला शोधीत जावे (२०००) हा कवितांच्या निवडक रसग्रहणांचा संग्रह प्रकाशित आहे. याखेरीज त्यांचे मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती (२०१६), सोनकवडसे (२०१६), अंतरीच्या कला उमलताना (२०२०) आदी साहित्यकृती प्रकाशित आहेत.

पत्की यांना मानवी अस्तित्वाचे म्हणजे अस्तित्वाच्या मूलभूत निखळ सौंदर्याचे चिरंतन आवाहन आहे. त्यांनी ते झाडांत आणि पाखरांत पाहिले आहे. अस्तित्वाचे चेतनसौंदर्य शबल करणारी, सतत द्वंद्वात्मक विभाजनशील जीवनप्रणाली आपण अनुभवत असताना एकात्म सहजीवनाचे वास्तव जवळजवळ पाठमोरे झाले आहे. याचे उद्विग्न करणारे चित्र त्यांच्या काव्यलेखनात प्रतिबिंबित झाले आहे. त्याचप्रमाणे निर्मळ अस्तित्व मोहिनीच्या कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कविता वाचताना एक वेगळ्या ज्ञातीचे आर्त, चिंतनशील, भावोत्कट मन आपल्या सान्निध्यात असल्याचा प्रत्यय खोलवर येत राहतो. अस्तित्वाशी निगडित असलेलं एक तुटलेपण, एकाकीपण त्यांच्या कवितेत आहे. पत्की यांनी ते सूक्ष्मरीतीने समजून घेतले आहे. त्यांच्या कवितेला अंत:स्वर आहे. एखाद्याने एकांतवाटेने चालताना मनातल्या मनात स्वतःशीच बोलावे. स्वतःलाच ऐकावे अशी त्यांची कविता आहे. ‘श्रोतृनिरपेक्ष बोल’ हे पत्की यांच्या कवितेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आवाजी कवितेच्या कोलाहलात संयतपणे व्यक्त होणारी त्यांची कविता वाचकांना अंतर्मुख करते. त्यांच्या प्रेमकवितेचे वेगळेपण तिच्यातील अवघडल्या मौन भाषेत, आत्मसन्मानात आणि प्रियेच्या भावशोधनात साठलेले आहे. शाई आकाशाची हा कवितासंग्रह त्यांच्या या संवेदनेचा प्रत्यय वाचकांना देतो.

पत्की यांनी मोजकेच मात्र अत्यंत तरल असे लेखन केले आहे. ते त्यांच्या हळव्या, आत्मनिष्ठ आणि विशुद्ध भाववृत्तीचे निदर्शक आहे. प्रसिद्धीपराड्.मुख आणि स्वतःमधेच रमणारा कवी वाचकांना गर्दीतही हृदयाच्या निवांतपणाची अनुभूती देतो. ‘भ्रमांचा उत्सव’ ही पत्की यांची कविता त्यांच्या समग्र अस्तित्वाचे, जीवनदृष्टीचे निदर्शक आहे. “जगण्याशी संग करील तोच शब्द मागून घेईन, झालो जरी पुरता रिता वाळवंटी तुझ्या येईन” हा लीनभाव त्यांच्या ठायी आहे. पत्की यांनी स्वभावाची पाळेमुळे आत्यंतिक जाणिवेतून शोधली आहेत. त्यांच्या अनेक कवितांना आतल्या दुःखाचा रंग माखलेला असला तरी तो केवळ वैयक्तिक नाही. दुःखाची ही छटा सार्वत्रिक आणि सार्वकालिक असून त्यातून अंती आशावाद व्यक्त केला आहे. कवितेचा उजेड पत्की आरतीसाठी देऊ इच्छितात. त्यांच्या कवितांमधून शब्दांचा उल्लेख वारंवार येतो. मात्र आपल्याला जाणवते की शब्दापेक्षा नि:शब्दालाच त्यांच्या कवितेत महत्त्व आहे. भोवतीच्या मानवीविश्वाशी या कविमनाचा फारसा बंध दिसत नाही. हे कविमन सतत निसर्गाशी जोडून घेते. उन्हे देणारी, पाऊस पेलणारी, आकाश तोलणारी, फुले प्रसवणारी, पानोपानी फळून काळीज निववणारी झाडे या कविमनाच्या अस्तित्वाला आधार देणारी आहेत.

काव्यलेखनासोबतच काव्यआस्वादनाची पत्की यांची रीत अनोखी आहे. कवितांच्या संदर्भाने ते मानवी जीवनातील वास्तवाचे, प्रवृत्तींचे, आकांक्षांचे आणि स्वप्नांचे जे निदर्शन करतात ते लक्षवेधी आहे. कवितेचा हेतू, तिचा आशय, तिची अभिव्यक्ती आदींविषयीही त्यांतून पुष्कळ काही व्यक्त होते. त्यांच्या विवेचनातून वारंवार येणारी ‘केवल’ ही संज्ञा अस्तित्वाचे निखळपण, त्याचे सूक्ष्मसंवेदन, त्यातून होणारे ‘ स्व ‘ रूपदर्शन यांचा मागोवा घेत राहते. कवितेचा आस्वाद ही पूर्णतः बौद्धिक गोष्ट नाही तर उत्कट मनातून विचार भावरूप होऊन पुढे ते अभिव्यक्त होत असतात. पत्की यांचे हे असे आस्वादन म्हणजे ‘कवितेनंतरची कविता’ होऊन जाते. काव्यानुभवातले निखळ सौंदर्यतत्त्व पारखून तो आनंद आपल्या आस्वादनातून वाचकांसमोर मांडण्याची पत्की यांची शैली आस्वादक मराठी समीक्षेच्या प्रांतात त्र्यं. वि.सरदेशमुख यांच्या आस्वादक शैलीशी साधर्म्य दाखवणारी आहे.

सातारा येथे २००३ मध्ये साहित्य अकादेमीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात पत्की यांनी ‘ लोकप्रिय कवितेची तंत्रे व शैली ‘ या विषयावर व्यासंगपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला. मराठी काव्याभ्यासकांसाठी ते एक मौलिक संदर्भसाधन आहे. जे.कृष्णमूर्ती या जागतिक ख्यातीच्या तत्त्वचिंतकाच्या चिंतनाची पत्की यांच्या अंतःकरणाला ओढ आहे. दैनंदिन जीवनातल्या क्रिया – प्रतिक्रियांचे पूर्वग्रहरहित निरीक्षण करणे, त्यांतून प्रत्येक क्षणी नवीन गोष्टी शिकणे, संग्रहित करणाऱ्या ज्ञानापेक्षाही बोधातला स्वानंद अनुभवणे या गोष्टींशी ते समरस झालेले आहेत. मला उमजलेले जे .कृष्णमूर्ती हे त्यांचे पुस्तक याचे मूर्तरूप आहे. कृष्णमूर्तींच्या दृष्टिकोनातून सृजनशीलता  या महत्त्वाच्या विषयावरही त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. कुसुमाग्रज पुरस्कार , पु.शि.रेगे पुरस्कार , रा.ना.पवार पुरस्कार  यांसह अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांच्या काव्यप्रतिभेचा सन्मान झाला आहे.

संदर्भ :

  • पत्की, हेमकिरण, एकांतवाटेने, सुविद्या प्रकाशन ,सोलापूर, २०००.
  • पत्की, हेमकिरण, कवितेला शोधित जावे, सुविद्या प्रकाशन, सोलापूर,२०००.