काळसेकर, सतीश : (१२ फेब्रुवारी १९४३). मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते. काळसेकर यांचा जन्म वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे मूळगाव काळसे ता. मालवण जि.सिंधुदुर्ग हे आहे. त्यांच्या शालेय शिक्षणास सुरुवात प्राथमिक शाळा काळसे ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग या शाळेत झाली. या शाळेत त्यांना थेट इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तेथे त्यांनी तिसरी ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर इयत्ता आठवीचे शिक्षण सोशल सर्विस लीग मुंबईच्या नाईट हायस्कूलमध्ये तर नववी, दहावी व अकरावीचे शिक्षण वालावल हायस्कूल, वालावल ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे घेतले. भवन्स महाविद्यालय, मुंबई येथून बि.ए.(ऑनर्स) केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ मासिक ज्ञानदूत  व टाइम्स ऑफ इंडिया  मध्ये त्यांनी नोकरी केली. यानंतर त्यांना बँक ऑफ बडोदा येथे नोकरी लागली. १९६५ ते २००१ म्हणजे सेवानिवृत्ती पर्यंत ते बँक ऑफ बडोदा येथे कार्यरत होते.

काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनाने झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून,नवा-काळ, मराठा  यासारख्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला.या कविता संग्रहापासूनच कवी म्हणून त्यांची ओळख ठळक होत गेली. काळसेकर यांची साहित्य संपदा इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७) हे कवितासंग्रह तसेच कविता:लेनिनसाठी (१९७७, लेनिनवरच्या विश्वातील कविता-अनुवाद व संपादन), नव्या वसाहतीत (२०११, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद) हे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. वाचणार्याची रोजनिशी (२०१०), पायपीट (२०१५) हे त्यांचे गद्यलेखन प्रकाशित आहे. मी भयंकराच्या दारात उभा आहे (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह, २००७), आयदान: सांस्कृतिक ठेवा ( संपादन- सिसिलिया कार्व्हालोसह, २००७), निवडक अबकडइ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२) ही त्यांनी केलेली संपादने प्रकाशित आहेत.

सतीश काळसेकर यांच्या कवितांचा समावेश अनेक महत्त्वाच्या संकलनात झाला आहे. हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यासह अन्य भारतीय भाषांत त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत. त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. महाश्वेता देवी आणि रस्किन बाँण्ड यांच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत. ‘अत्त दीप भव’ (वृत्तमानस), ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ (आपले वाङ्‌मय वृत्त) हे त्यांचे सदर लेखन प्रकाशित आहे. प्रवास लेखन, सांस्कृतिक चळवळी, खाद्यजीवन या सारख्या विषयांवर त्यांनी वेळोवेळी केलेले लेखन नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नवसाहित्याची सुरुवात करणाऱ्या या चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते. काळसेकर यांनी मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्‌मय , फक्त, तापसी, चक्रवर्ती आणि आपले वाङ्‌मय वृत्त  इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी सांभाळलेली आहे. मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रातील लोकवाङ्‌मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय अभिनव प्रकाशन या प्रकाशन संस्थेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९९८-२००२), महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)च्या भारतीय पुरस्कार निवड समितीचे दहा वर्ष सभासदत्व (१९९४-२००३), आणि २००८ पर्यंत निवड समितीचे निमंत्रक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्यत्व (डिसेंबर २००५ ते डिसेंबर २०११) या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.

महानगरीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव हा काळसेकर यांच्या कवितेचा गाभा आहे. त्यांच्या कवितेतील माणूस हा महानगरातील कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेला चाकरमानी असून तो स्वतःची तीव्र संवेदनशीलता जपत कवितेतून व्यक्त होत राहतो. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील संघर्ष, अनिश्चितता, सुख दुःखे, सोशिकपणा हे त्यांच्या कवितेचे विषय आहेत. यातली त्यांची जीवनदृष्टी मानवतावादी आहे. त्यांचा कविता लेखनाचा प्रवास ऐंद्रीय संवेदनात्मकतेपासून पुढे वैचारिक अनुभवापर्यंत झाला आहे. त्यांच्या कवितेतून जगण्याविषयीची आस्था स्पष्टपणे जाणवत राहते. इंद्रियोपनिषदमध्ये दुर्बोध वाटणारी त्यांची कविता नंतर साक्षात  आणि विलंबित  या संग्रहांमध्ये साधीसोपी, सरळ, सहजासहजी भिडणारे रूप घेऊन येते. कवितेत असणारी अंतर्गत लय, त्यातील संथपणा, सूचकता वैशिष्ट्यपूर्ण आहे. भाषेतील तीव्र उत्कटता, तीव्र संवेदनशीलता, संयत व समजूतदार सूर या कवितेला प्रौढ व गंभीर बनवतात. काळसेकर यांची कविता मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहातील अतिशय महत्त्वाची कविता आहे.

वाचणाऱ्याची रोजनिशी  या गद्य लेखनाच्या पुस्तकात त्यांचे स्तंभलेखन एकत्रितपणे प्रकाशित करण्यात आले आहे. आपले वाङ्‌मय वृत्त  व साधना  या नियतकालिकांमधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले हे सदर लेखन आहे. अंशतः ललित, अंशतः वैचारीक, समीक्षात्मक अशा प्रकारचे हे लेखन आहे. काळसेकरांमधील सजग वाचक या लेखनामध्ये जाणवत राहतो. वाचणाऱ्याची रोजनिशी  या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. पायपीट  हे गद्यलेखन अंशतःअकादमिक आणि अंशतः व्यक्तिगत, आनंदाच्या सहलीच्या स्वरूपाच्या, भारतातील विविध ठिकाणी पायी केलेल्या भ्रमंतीच्या अनुभवावर आधारलेले आहे. कविताःलेनिनसाठी  हे लेनिन वरच्या वेगवेगळ्या वीस देशातील कवींनी लिहिलेल्या कवितांचे मराठी अनुवाद व संपादनाचे पुस्तक आहे. ऑक्टोबर क्रांतीला साठ वर्ष होत असल्याच्या प्रित्यर्थ, त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी हे संकलन प्रकाशित करण्यात आले होते. नव्या वसाहतीत  हा हिंदीतील प्रसिद्ध कवी अरुण कमल यांच्या नये इलाके में या कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद आहे.

काळसेकर मार्क्सवादी विचारसरणीच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे ते सदस्य होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. समांतर लेखक संघात ते कार्यशील होते. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाचे ते महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे अध्यक्ष होते तसेच आजही ते या संघटनेत कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या वाङ्‌मयीन कार्यासाठी सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९७७), लालजी पेंडसे पुरस्कार (१९९७), बहिणाबाई पुरस्कारः कवी (१९९८), कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (१९९८), महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९९), कैफी आझमी पुरस्कार (२००६), महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार (२०१०-२०११), सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार (२०१३ ), साहित्य अकादमी पुरस्कार (२०१३), महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (२०१८) इत्यादी सन्मान लाभले आहेत.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा, टाकळकर उषा आणि सहकारी, संक्षिप्त मराठी वाङ्‌मयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.